Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 26 July 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ जूलै २०२५ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूच्या
दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज संध्याकाळी तूतिकोरिन इथं पोहोचतील. त्यानंतर ते तूतिकोरिन
विमानतळाच्या नव्या टर्मिनल भवनाचं उद्घघाटन करतील. तामिळनाडूमधल्या ४ हजार ६०० कोटी
रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचं उद्घघाटन आणि कोनशिला अनावरणही त्यांच्या हस्ते
होईल. या दौऱ्यात पंतप्रधान अरयालूर जिल्ह्यात गंगईकोंडा-चोलापुरम् मंदिरात चोल शासक
राजेन्द्र चोल प्रथम यांच्या आदि थिरुवथिरल या समारंभात सहभागी होतील.
****
स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे भारतीय संविधानाचे
आणि लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत. संविधानाचे अभिप्रेत मूल्यं टिकवण्यासाठी न्यायव्यवस्था
कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केलं आहे.
अमरावती मधल्या दर्यापूर इथं न्यायमंदीर, जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय तसंच
दिवाणी न्यायालय, वरिष्ठस्तर या नूतन न्यायालयीन इमारतीच्या कोनशीलेचे
अनावरण सरन्यायाधीश न्यायमूर्ती गवई यांच्या हस्ते काल करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.
न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा प्राण
आहे. यामुळे संविधानाला आदर्श मानून न्यायदानाचं कार्य करावं. न्यायाधीश आणि वकील यांचे
संबंध सलोख्याची असावेत, आदी
सूचना त्यांनी यावेळी केल्या.
****
महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांपैकी
एक, आणि
भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचं धार्मिक स्थळ असलेल्या घृष्णेश्वर मंदिर परिसरात
श्रावण महिन्यात विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता
आणि सुरक्षेकडे अन्न आणि औषध प्रशासन विभागाने, विशेष लक्ष द्यावं,
असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले
आहेत.
अन्न विक्रेत्यांनी योग्य परवाने
घेतलेले असावेत आणि स्वच्छतेच्या नियमांचं पालन केलं जावं, खराब, मुदत संपलेल्या
तसंच निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थ विक्रीवर त्वरित दंडात्मक कारवाई करावी,
आदी सूचनाही जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिल्या आहेत.
****
धर्मादाय रुग्णालयांमध्ये त्यांच्या
एकूण कार्यान्वीत खाटांपैकी १०टक्के खाटा निर्धन रुग्णांसाठी तर १० टक्के खाटा दुर्बल
घटकांतील रुग्णांवर सवलतीच्या दरात उपचार करण्यासाठी राखून ठेवणं बंधनकारक असल्याचं
ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलं आहे. निर्धन तसंच दुर्बल
संवर्गातील रुग्णांवर आवश्यक आणि दर्जेदार उपचार होण्यासाठी ही योजना अत्यंत महत्वपूर्ण
आहे, या
निकषांतर्गत आरक्षित खाटा लाभार्थ्यांना पारदर्शकपणे उपलब्ध करुन देण्याच्या योजनेची
प्रभावी अंमबजावणी करावी, असे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले
आहेत.
****
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास
प्राधिकरण म्हाडाच्या mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर म्हाडातील संबंधित सर्व विभागांचा वर्गवारीनुसार १५
कोटी दस्तऐवज नागरिकांना केवळ पाहण्यासाठी ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आला आहे,
अशी माहिती 'म्हाडा'चे उपाध्यक्ष
आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिली आहे. यामुळे नागरिकांचा कार्यालयात
येण्या-जाण्याचा त्रास कमी होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
लातूर शहर महानगरपालिकेच्या कर संकलन
आणि कर आकारणी विभागामार्फत गेल्या वर्षापासून नियमितपणे कर भरणाऱ्या मालमत्ता धारकांसाठी
विविध सवलती देण्यात येत आहेत. त्यानुसार ३१ जुलैपर्यंत मालमत्ता कर भरणाऱ्यांना पाच
टक्के सवलत तर ऑनलाईन कर भरणाऱ्यास अतिरिक्त पाच टक्के सूट देण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर
मनपा आयुक्त तथा प्रशासक मानसी मीना यांनी मालमत्ता धारकांना विहित कालावधीत कर भरून
शेवटच्या दिवसांत होणारी गर्दी टाळण्याचं आवाहन केलं आहे.
****
हिंगोली जिल्हा माहिती कार्यालयाच्या
वतीने उद्या रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांसाठी एकदिवशीय कार्यशाळेचं आयोजन
करण्यात आलं आहे. या कार्यशाळेत विविध वक्त्यांमार्फत मार्गदर्शन आणि पत्रकारांसाठीच्या
विविध योजनांबाबत माहिती देण्यात येणार आहे.
****
राज्यात मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये
सर्वदूर चांगला पाऊस होत असून पालघर आणि गोंदिया जिल्ह्यात संततधार पावसामुळे आज सर्व
शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, सातारा आणि सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला
असून कोयना, वारणा धरणांसह इतर धरणातील पाणी साठ्यात वाढ होत
आहे. या पार्श्वभुमीवर आज सकाळपासून साताऱ्यातल्या पाच धरणांमधून कोयना, तारळी, वेण्णा, कृष्णा नदीत मोठ्या
प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला, तर सांगली जिल्ह्याच्या
वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्यानं धरणातून एकूण १० हजार २६०
दशलक्ष घनमीटर प्रति सेकंद या वेगाने वारणा नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे
नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment