Thursday, 31 July 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 31 July 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ जूलै २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      ५७४ किलोमीटर लांबीच्या चार बहुमार्गिका रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, छत्रपती संभाजीनगर - परभणी दरम्यान रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचा समावेश

·      भारतीय वस्तूंवर अमेरिकनं जाहीर केलेल्या कर आकारणीच्या परिणामांची तपासणी करत असल्याची सरकारची माहिती

·      मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सर्व सात आरोपींची ठोस पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता

·      छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीतल्या सर्व मालमत्तांना शास्ती से आझादी योजना लागू करण्याचा निर्णय

आणि

·      जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९२ टक्क्यावर; जलपूजनानंतर विसर्गाला सुरुवात

****

केंद्रीय मंत्रिमंडळाने ५७४ किलोमीटर लांबीचे चार बहुमार्गिका रेल्वे प्रकल्प मंजूर केले आहेत. हे प्रकल्प महाराष्ट्र, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा आणि झारखंडमधल्या १३ जिल्ह्यांमध्ये राबवले जाणार आहेत. या प्रकल्पांची एकूण अंदाजित किंमत सुमारे ११ हजार १६९ कोटी रुपये असून, हे प्रकल्प २०२८-२९ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली.

यामध्ये छत्रपती संभाजीनगर ते परभणी दरम्यान रेल्वेमार्गाच्या दुहेरी करणाला मंजुरी दिली आहे. यामुळे मराठवाड्याची दिल्ली, मुंबई आणि दक्षिण भारताशी जलद कनेक्टिव्हिटी सुनिश्चित होईल. जालना ड्राय पोर्ट, दिनागाव आणि दौलताबाद गुड्स शेडशी देखील थेट जोडणी स्थापित केली जाईल, असं वैष्णव यांनी सांगितलं.

बाईट – रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

 

याशिवाय इटारसी - नागपूर दरम्यान सुमारे साडे पाच हजार कोटी रुपये खर्च करुन चौथा रेल्वे मार्ग उभारण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. यामुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला थेट फायदा होईल. या प्रकल्पांच्या बांधकामादरम्यान सुमारे दोन लाखाच्या वर थेट रोजगार उपलब्ध होणार आहेत.

प्रधानमंत्री कृषी संपदा योजनेसाठी सुमारे साडे सहा हजार कोटी रुपये आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला दोन हजार कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णयही केंद्रीय मंत्रीमंडळानं आज घेतला.

****

सरकार भारतीय वस्तूंवर अमेरिकनं जाहीर केलेल्या २५ टक्के कर आकारणीच्या परिणामांची तपासणी करत असल्याचं, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. आज लोकसभेत यासंदर्भात निवेदन देताना ते म्हणाले

बाईट - केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल

 

भारत आता जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे आणि काही वर्षांतच देश जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असा विश्वासही गोयल यांनी व्यक्त केला.

दरम्यान, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं निसार या कृत्रिम अपर्चर रडार उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल आज संसदेच्या दोन्ही सभागृहात इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन करण्यात आलं.

****

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व सात आरोपींची आज विशेष एनआयए न्यायालयाने ठोस पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. सुमारे १७ वर्षे चाललेल्या या प्रदीर्घ खटल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला. आरोपींमध्ये माजी भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांचा समावेश आहे. सरकारी वकिलांनी कोणताही ठोस पुरावा सादर न केल्यामुळे सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करत असल्याचं विशेष न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी आपल्या निकालात नमूद केलं.

२००८ मध्ये नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं हा बॉम्बस्फोट झाला होता. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक जण जखमी झाले होते.

या प्रकरणातल्या १२ आरोपींपैकी ३ जणांची यापूर्वीच निर्दोष सुटका झाली होती. तर दोन आरोपींवर फक्त शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत खटला चालवला जाईल, असं न्यायालयानं आज स्पष्ट केलं.

****

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालाचं भारतीय जनता पक्षानं स्वागत केलं आहे. या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहशतवाद कधीच भगवा नव्हता आणि नसेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. न्यायाला उशीर झाला हे खरं असलं तरी सत्य कधीच पराभूत होत नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तर मालेगाव प्रकरणातलं सत्य बाहेर आलं असून आता काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

****

काँग्रेस पक्ष नेहमीच दहशतवादाच्या विरोधात असून, दहशतवाद्याला शिक्षा झालीच पाहिजे, असं, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावर ते माध्यमांशी बोलत होते. मुंबई रेल्वे स्फोटाच्या निकालावर राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेलं, तसं मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावरही होईल का हे सरकारने स्पष्ट करावं, असं सपकाळ म्हणाले.

****

महसूल विभागाच्या सेवा, योजनांची माहिती आणि प्रत्यक्ष लाभ मिळावा यासाठी महसूल सप्ताहामध्ये अधिकाधिक नागरिकांना सहभागी करुन घ्यावं, असं अवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केलं आहे. उद्या एक ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या महसूल सप्ताहानिमित्त राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल छत्रपती संभाजीनगर विभागातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधून त्यांनी आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल सप्ताहानिमित्त राबवण्यात येणाऱ्या नाविण्यपूर्ण उपक्रमाबाबत माहिती दिली.

****

छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं शास्ती से आझादी योजना महानगरपालिका हद्दीतल्या सर्व मालमत्तांना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्या एक ऑगस्टपासून ते १५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण थकबाकी एकरकमी भरणाऱ्या महानगरपालिका हद्दितल्या सर्व मालमत्तांना ९५ टक्के शास्ती माफी लागू होणार आहे. शास्ती माफीसाठी महानगरपालिकेनं लोकप्रतिनिधी, व्यापारी संघटना सर्वांचं मत लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचं, यासंदर्भात जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

****

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीसाठी पक्षाच्या प्रत्येक माजी खासदार आणि आमदाराने पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील एक -एक मंडल दत्तक घ्यावं, असं आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलं आहे. ते आज मुंबईत प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीत बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनीती आखण्यात येत असून, या बैठकीत संघटनात्मक स्थितीचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला.

****

राष्ट्रीय सेविका समितीच्या चौथ्या मुख्य संचालिका प्रमिल मेढे यांचं आज निधन झालं, त्या ९७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा पार्थिव देह उद्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था - एम्सला दान करण्यात येणार आहे. राष्ट्र सेविका समितीच्या माध्यमातून त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी भरीव कार्य केलं. १९७८ पासून कार्यवाहिका म्हणून, तर २००३ ते २००६ या काळात प्रमुख संचालक पद त्यांनी भूषवलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमीला ताई यांना श्रद्धांजली अर्पण केली.

****

नीती आयोगाच्या वतीने जुलै ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत राबवलेल्या संपूर्णता अभियानात आकांक्षित किनवट तालुक्याने ६ निर्देशांकांपैकी ४ निर्देशांक शंभर टक्के पूर्ण करत राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीसाठी राज्य शासनाच्यावतीने जिल्हाधिकारी राहुल कर्डीले आणि तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचा नागपूर इथं दोन ऑगस्ट रोजी सन्मान करण्यात येणार आहे.

****

परभणी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं आज परभणी जिल्ह्यातल्या कातनेश्वर इथं कापूस उत्पादन वाढीचं नव तंत्रज्ञान आणि आणि गळ फांदी ओळख, या विषयावर शेती कार्यशाळा घेण्यात आली. कापसाच्या झाडाची वाढ, उंची, खत आणि फवारणी याविषयी यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं.

****

पंढरपूरच्या आषाढी वारीच्या समारोपानंतर शेगाव इथली संत श्री गजानन महाराजांची पालखी आज शेगावमध्ये परतली. खामगाव ते शेगाव अशा १८ किलोमीटर प्रवासात सुमारे एक लाख भाविक या दिंडीत सहभागी झाले होते. जागोजागी नागरिकांनी या दिंडीचं उत्साहात स्वागत केलं.

****

तेंडुलकर-अँडरसन कसोटी मालिकेतला पाचवा आणि शेवटच्या सामना आज ओव्हल मैदानावर सुरु झाला. इंग्लंडचा कर्णधार ऑलि पोपनं नाणेफेक जिंकत भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. पावसामुळे उपहारासाठी खेळ लवकर थांबवण्यात आला, त्यावेळी भारताच्या दोन बाद ७२ धावा झाल्या होत्या. कर्णधार शुभमन गिल १५, तर साई सुदर्शन २५ धावांवर खेळत आहेत.

****

पैठण इथल्या जायकवाडी प्रकल्पावरील नाथसागर इथं आज जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं. धरणातला पाणीसाठी ९२ टक्क्यांच्यावर पोहोचला आहे. धरणातून नऊ हजार ४३२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरु करण्यात आला असून, प्रशासनानं नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

****

No comments: