Monday, 28 July 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 28 July 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ जूलै २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत नागपूरची दिव्या देशमुख अजिंक्य-कोनेरु हंपीला उपविजेतेपद

·      लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेला सुरुवात-दहशतवादाच्या समूळ उच्चाटनासाठी सरकार कटिबद्ध-संरक्षणमंत्र्यांचं प्रतिपादन

·      लाडकी बहीण योजनेतली संशयास्पद २६ लाख खाती अपात्र ठरल्यास बंद करणार-मुख्यमंत्र्यांचा इशारा 

आणि

·      श्रावणी सोमवारनिमित्त ठिकठिकाणच्या शिवमंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी

****

फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत नागपूरच्या दिव्या देशमुखने अजिंक्यपद पटकावलं आहे. जॉर्जियात बाथुमी इथं झालेल्या या स्पर्धेची अंतिम फेरी भारताच्या कोनेरु हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात खेळली गेली. या फेरीचे पहिले दोन सामने तसंच आज सकाळी झालेला तिसरा सामना अनिर्णित राहिला, मात्र दुपारनंतर झालेल्या टायब्रेकर सामन्यात दिव्याने हंपीवर मात करत, अजिंक्यपद पटकावलं तर हंपी उपविजेतेपदाची मानकरी ठरली. यंदाच्या स्पर्धेचं विजेतेपद तसंच उपविजेतेपद पटकावून भारताने इतिहास घडवला आहे.

****

लोकसभेत आज ऑपरेशन सिंदूरवर चर्चेला सुरुवात झाली. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी या चर्चेला प्रारंभ करतांना, संपूर्ण घटनाक्रमाची सदनाला माहिती दिली. पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणांमुळे पाकिस्तानला विरोध असल्याचं संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ऑपरशेन सिंदूर हे भारताच्या सामर्थ्याचं प्रतीक असल्याचं सांगत, दहशतवादाच्या समूळ उच्चाटनासाठी आपलं सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन संरक्षणमंत्र्यांनी केलं. ऑपरेशन सिंदूर हे फक्त स्थगित केलेलं असून, भविष्यात पाकिस्तानने कोणतीही आगळीक केल्यास, ही मोहीम पुन्हा सुरू होईल, असा सज्जड इशारा संरक्षण मंत्र्यांनी दिला. या कारवाईत आपल्या सैन्यदलाने पाकिस्तानातल्या सर्वसामान्य नागरिकांना कोणतीही हानी न पोहोचवता दहशतवाद्यांची नऊ ठिकाणं उध्वस्त केली, यात शंभरपेक्षा अधिक दहशतवादी आणि दहशवादी संघटनांचे हस्तक मारले गेले. भारतीय सेनेनं आपलं कोणतंही नुकसान न होऊ देता, अवघ्या २२ मिनिटांत ही कारवाई पूर्ण केल्याचं राजनाथसिंह यांनी सांगितलं. ते म्हणाले...

बाईट - संरक्षणमंत्री राजनाथसिंह

काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी या चर्चेत सहभाग घेत, पहलगामध्ये दहशतवादी कसे आले, याची माहिती देण्याची मागणी करत, त्या पाच दहशतवाद्यांना सरकार अजूनही पकडू शकलं नाही, अशी टीका केली. समाजवादी पक्षाचे रामशंकर राजभर, तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत, यांच्यासह विरोधी पक्षांच्या अनेक सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला. पाकिस्तानने भारतीय वायूसेनेची विमानं पाडल्याचा दावा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धात केलेले मध्यस्थीचे दावे, आदी मुद्यांवरूनही विरोधी पक्षांनी सरकारी पक्षावर टीका केली. पंचायतराज मंत्री राजीवरंजनसिंह यांनी विरोधकांचे हे सर्व आरोप फेटाळून लावत, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून संपूर्ण जगाला भारताच्या सामर्थ्याचं दर्शन झाल्याचं नमूद केलं.

****

त्यापूर्वी सकाळी लोकसभेचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवर गदारोळ सुरू केला, त्यामुळे सदनाचं कामकाज तीन वेळा तहकूब झालं.

राज्यसभेतही विरोधकांनी घोषणाबाजी केल्यानंतर कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब झालं. त्यानंतरही गदारोळ चालूच राहिल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं. त्यापूर्वी अण्णा द्रमुक पक्षाचे एम धनपाल आणि आय एस इंबदुराई यांना आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ देण्यात आली.

****

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढणार असल्याचं, मुख्यमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज वर्धा इथं वार्ताहरांशी बोलत होते. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यताही फडणवीस यांनी व्यक्त केली, मात्र अशा जागा अपवादात्मक असतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले....

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दरम्यान, लाडकी बहीण योजनेतली संशयास्पद २६ लाख खाती सध्या निलंबित केलेली आहेत, या खात्यांची तपासणी करून, ती अपात्र असल्यास, बंद केली जातील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले...

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अ‍ॅप आधारित प्रवासी वाहनसेवा राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. या ॲपला जय महाराष्ट्र, महा - राईड, महा-यात्री, महा-गो यापैकी एखादे नाव देणं प्रस्तावित असून लवकरच हे ॲप कार्यान्वित होईल असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या अ‍ॅग्रीगेटर मार्गदर्शक तत्वानुसार या ॲप ची नियमावली अंतिम टप्यात असून येत्या ५ ऑगस्टला या संदर्भात होणाऱ्या बैठकीत ॲपला अंतिम स्वरूप देण्यात येईल असंही सरनाईक यांनी नमूद केलं.

****

आज पहिला श्रावणी सोमवार बारा ज्योतिर्लिंगांमध्ये समावेश असलेल्या राज्यातल्या शिवमंदिरांमध्ये तसंच इतर प्रसिद्ध शिवमंदिरांमधे आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरुळ इथलं घृष्णेश्वर, बीड जिल्ह्यात परळी इथं वैद्यनाथ, हिंगोली जिल्ह्यात औंढा इथल्या नागनाथ मंदिरासह नाशिक जिल्ह्यातलं त्र्यंबकेश्वर आणि पुणे जिल्ह्यात भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. सर्व मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीनं अभिषेक, पूजाअर्चा आणि धार्मिक कार्यक्रम होत आहेत. मंदिरांना आकर्षक सजावट करण्यात आली असून, भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, वाहनतळ, दर्शन रांगेची व्यवस्था इत्यादी सुविधाही करण्यात आल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर शहरातील खडकेश्वर महादेव मंदिरामध्ये भक्तांनी पहाटे चार वाजल्यापासून दर्शनासाठी गर्दी केली होती. श्रावण महिन्यात प्रत्येक गावात ग्रामदेवतेला अभिषेक करण्याची पूर्वापार प्रथा आहे, त्या अनुषंगाने वेरूळ इथल्या पवित्र शिवालय तीर्थातून पाणी घेऊन जाण्यासाठी पंचक्रोशीतील गावं तसंच इतरही खेड्यापाड्यातून भाविकांची लक्षणीय गर्दी झाल्याचं दिसून आलं

****

पद्मगंधा प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवोदित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ज्येष्ठ लेखिका शुभांगी भडभडे यांचं आज नागपूर इथं निधन झालं. त्या ८० वर्षांच्या होत्या. ८० कादंबऱ्या, दोन कथासंग्रह, तसंच वैचारिक आणि स्फुट लेखनासह राष्ट्रपुरुषांच्या चरित्रात्मक कादंबऱ्या ही त्यांची विशेष ओळख होती. महाकवी कालिदास जीवनगौरव पुरस्काराने त्यांना नुकतंच गौरवण्यात आलं होतं. भडभडे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे.

****

जागतिक काविळ दिनानिमित्त आज जालना शहरात विविध उपक्रम राबवण्यात आले, तसंच जनजागृती फेरी काढण्यात आली. नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी आणि काविळ प्रतिबंधक लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन करण्यात आले.

****

परभणी इथल्या स्वराज्य ट्रेकर्स च्या २८ गिर्यारोहकांनी रायगड जिल्ह्यातील सुधागड आणि सरसगड हे अवघड किल्ले यशस्वीरित्या सर केले. गिर्यारोहक राजेश्वर गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या साहसी मोहिमेत महिला, पुरुष आणि लहान मुलांचाही समावेश होता.

****

हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया आजपासून सुरु झाली. आज पहिल्याच दिवशी ७ नामनिर्देशपत्र दाखल झाले तर ३४ उमेदवारांनी अर्जांची खरेदी केली.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथलं जायकवाडी धरण ८४ टक्के भरलं आहे. धरणातून पाणी सोडण्याची शक्यता असल्याने, गोदाकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिक तसंच अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने नाथसागर जलाशयात १९ हजार ४३९ दशलक्ष घनफूट प्रति सेकंद वेगाने पाण्याची आवक सुरु आहे.

दरम्यान, उत्तर मध्य महाराष्ट्राच्या घाट भागापैकी पुणे जिल्ह्याच्या घाट भागात आज ऑरेंज अलर्ट तर सातारा, कोल्हापूर च्या घाट भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

****

 

No comments: