Wednesday, 30 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.07.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 30 July 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० जूलै २०२ दुपारी १.०० वा.

****

दहशतवादी कारवायांची सूत्रधार आणि अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या शमा परवीन या महिला दहशतवाद्याला आज बंगळूरुमधून अटक करण्यात आली. गुजरात दहशतवाद विरोधी पथकानं ही कारवाई केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशतवादी विचारधारा पसरवण्याचा तिच्यावर आरोप आहे. गेल्या आठवड्यात देखील अल कायदा चे तीन दहशतवादी पकडण्यात आले होते.

****

जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रणरेषेवर घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने आज हाणून पाडला. पूँछ सेक्टरमध्ये नियंत्रणरेषा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना लष्कराने ठार केलं. लष्कराच्या गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या अचूक माहितीनंतर ही तात्काळ कारवाई करण्यात आली. घटनास्थळावरुन शस्त्र देखील जप्त करण्यात आले.

****

राज्यसभेत आज ऑपरेशन सिंदूरवरच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी चर्चेला सुरुवात करताना, दहशतवादी तळ उध्वस्त करणं, हाच ऑपरेशन सिंदूरचा उद्देश होता, असं सांगितलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने विविध कारवायांच्या माध्यमातून दिलेल्या प्रत्यूत्तराबाबत त्यांनी माहिती दिली.

****

छत्रपती संभाजीनगर शहरातल्या रेल्वे स्थानकानजिक अपघातानंतर मदतीसाठी कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी काही उपाययोजना करण्यासंदर्भात छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी आज लोकसभेत विचारणा केली. यावर उत्तर देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी, कवच ही ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन सिस्टिम, ज्यामुळे रेल्वे अपघाताला आळा घालता येईल, याबद्दल माहिती दिली. महिला प्रवाशांची सुरक्षा, धावत्या गाडीत प्रवाशांना उपचार करण्यासाठी तत्काळ मदत, आदी मुद्दे देखील भुमरे यांनी उपस्थित केले. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना मदत देण्यासाठी डेटा सेंटर, ऑप्टिकल फायबर, यासारख्या डिजिटल पद्धतींचा उपयोग रेल्वे मंत्रालय करत असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरो आणि अमेरिकेच्या नासा यांचा संयुक्त उपक्रम असलेला नासा - इसरो सिंथेटिक अपर्चर रडार म्हणजे निसार या उपग्रहाचं आज सायंकाळी श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण होणार आहे. काल दुपारी दोन वाजेपासून त्याची उलटगणना सुरु झाली. या उपग्रहाच्या माध्यमातून दर बारा दिवसांनी संपूर्ण पृथ्वीचं निरिक्षण करण्यात येणार असून, हवामान बदल संशोधन आणि आपत्ती प्रतिसादासाठी उच्च प्रतीच्या प्रतिमा मिळणार आहेत. सेंटीमीटर पातळीवर अचूकतेसह पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदलांचा मागोवा घेण्यासाठी यामध्ये नासाचे एल - बँड आणि इसरोचे एस - बँड रडार आहेत.

****

सात ऑगस्ट हा दिवस शाश्वत शेती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हा उपक्रम राबवला जाणार असल्याची माहिती, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली. डॉ. स्वामिनाथन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राज्यातल्या सर्व कृषी विद्यापीठांमध्ये डॉ. एम एस स्वामिनाथन बायो - हॅपिनेस सेंटर ची स्थापना करण्याचा निर्णय घेतल्याचंही कोकाटे यांनी सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बिडकीन इथं जिल्हा परिषद शाळेची इमारत बांधण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर्स प्रायवेट लिमिटेड यांच्यात काल सामंजस्य करार झाला. टोयोटा किर्लोस्कर या कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हे बांधकाम होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत आणि टोयोटा किर्लोस्कर कंपनीच्या वतीने संचालक सुदीप दळवी यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यावेळी उपस्थित होते. जिल्हा प्रशासन आणि कंपनी मिळून विविध क्षेत्रात सहकार्य करुन जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान देऊ असा विश्वास यावेळी दोन्ही बाजूंनी व्यक्त करण्यात आला. टोयोटा किर्लोस्कर कंपनीच्या या सामाजिक उपक्रमातून ग्रामिण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सेवा उपलब्ध होतील, असं अंकीत यावेळी म्हणाले.

****

परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर इथं आज छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य समाधान शिबिर घेण्यात आलं. याअंतर्गत शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरीकांपर्यंत पोहोचवण्यात येते. नागरीकांनी या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन तहसीलदार माधवराव बोथीकर यांनी यावेळी केलं. तहसील कार्यालयामार्फत दिल्या जाणाऱ्या रहिवाशी, उत्पन्न आणि जातीचे दाखले, शिधा पत्रिका वाटप या सुविधांची माहिती नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी दिली.

****

लातूर जिल्ह्यातल्या औसा शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. शहरातल्या उंबडगा रोड वरील भाग्यप्रभू नगरात हातात कोयते, कुऱ्हाड आदी धारदार शस्त्रांसह सहा जणांची चड्डी बनियन गॅंग फिरत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. या गॅंगला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिक करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या परळी इथले व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातल्या आरोपींना लवकरात लवकर पकडावं आणि मुंडे कुटुंबियांना न्याय द्यावा, या मागणीसाठी येत्या एक तारखेला बीड जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व धर्मीय आणि सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

No comments: