Saturday, 26 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 26.07.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 26 July 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ जुलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मालदीवच्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात सहभागी होणार; उभय देशांदरम्यान विविध सामंजस्य करार

·      संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सोमवारपासून सुरळीत कामकाजाबाबत सर्व पक्षांची सहमती

·      २६ व्या कारगिल विजय दिनानिमित्त आज हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी विविध कार्यक्रम

·      सहकार क्षेत्र बळकट करण्यासाठी महिलांचा सहभाग आवश्यक-मेघना बोर्डीकर यांचं प्रतिपादन

·      फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात आज अंतिम लढत

आणि

·      मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाचा आज ऑरेंज अलर्ट

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मालदीवच्या ६०व्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. या आमंत्रणाबद्दल मोदी यांनी मालदीव सरकारचे आभा मानले असून, तिथल्या नागरीकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, मलादीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईजू यांनी काल मोदी यांच्या सन्मानार्थ विशेष समारंभाचं आयोजन केलं होतं. त्याचबरोबर दोन्ही देशांमध्ये विविध सामंजस्य करारही करण्यात आले. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी,

भारत आणि मालदीव्ज यांच्यात काल ८ करार करण्यात आले. कर्ज पुरवठा, कर्ज परतफेड, मुक्त व्यापार करार, मत्स्योत्पादन, युपीआय यासारख्या क्षेत्रातले हे करार आहेत. दोन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंधांच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त दोन्ही नेत्यांनी काल एका विशेष टपाल तिकीटाचंही अनावरण केलं.

आकाशवाणी बातम्यांसाठी मालदीव्जची राजधानी मालेहून जीवन भावसार 

****

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सोमवारपासून सुरळीत कामकाजाबाबत सर्व पक्षांनी सहमती दर्शवली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल सर्व पक्षांची बैठक घेऊन कामकाज सुरळीत चालू देण्याचं आवाहन केलं. संसदेचं कामकाज व्यवस्थित सुरु असतानाच प्रश्नकाळात चर्चा करणं शक्य असल्याचं बिर्ला म्हणाले.

दरम्यान, बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्य यंत्रणा समितीच्या बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरबद्दल संसदेच्या दोन्ही सभागृहात पुढच्या आठवड्यात चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या चर्चेसाठी सोमवारी लोकसभेत आणि मंगळवारी राज्यसभेत प्रत्येकी १६ तासांचा अवधी मिळाला आहे.

****

२६ वा कारगिल विजय दिवस आज साजरा होत आहे. यानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं सायकल रॅली, हुतात्म्यांना अभिवादन, सैन्याच्या कामगिरीबाबत विशेष व्याख्यान, आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. कारगील युद्धात सहभागी झालेले छत्रपती संभाजीनगर इथले माजी सैनिक हवालदार संजय साबळे तसंच हवालदार पंढरीनाथ बत्तीसे यांनी आकाशवाणीशी बोलतांना या युद्धाच्या आठवणी या शब्दांत जागवल्या...

बाईट - माजी सैनिक हवालदार संजय साबळे आणि हवालदार पंढरीनाथ बत्तीसे

****

सहकार क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी महिलांचा सहभाग वाढवणं आवश्यक असून, त्यासाठी राज्यात महिलांच्या सहकारी पतसंस्थांचं जाळे उभारण्याची गरज, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केली. हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथं केशवराव सावंत बिगर शेतकरी सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी केंद्र तसंच राज्यसरकार विविध उपक्रमांतून प्रयत्न करत असल्याचं बोर्डीकर यांनी नमूद केलं.

****

नागपूर- गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी आवश्यक जमिनीच्या मोजणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचं, जमाबंद आयुक्त सुहास दिवसे यांनी सांगितलं. काल छत्रपती संभाजीनगर इथं याबाबतच्या कार्यशाळेत ते बोलत होते. या महामार्गाची मोजणी अचूक व्हावी यासाठी गतीने सीमांकन करण्याची सूचना दिवसे यांनी केली, तसंच या मोजणीत तंत्रज्ञानाच्या वापराबाबत मार्गदर्शन केलं.

****

फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताच्याच कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख या दोन ग्रँडमास्टरमध्ये आज अंतिम लढत होणार आहे. या अंतिम लढतीनंतर या स्पर्धेचं अजिंक्यपद आणि उपविजेतेपद भारताकडे येणार आहे. हा निकाल, भारताच्या बुद्धिबळ क्षेत्रात मोठा मैलाचा दगड ठरणार आहे. या दोन्ही बुद्धिबळपटूंच्या कारकिर्दीचा संक्षिप्त वेध घेणारा हा वृत्तांत…

‘‘कोनेरु हंपीने जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत १९९७ साली दहा वर्षांखालील गटात, १९९८ साली बारा वर्षाखालील गटात आणि २००० साली १४ वर्षांखालील मुलींच्या गटात सुवर्णपदकं पटकावलं. वयाच्या पंधराव्या वर्षी ग्रँडमास्टर पद मिळवणारी हंपी सर्वांत कमी वयाची महिला ग्रँडमास्टर ठरली. २००६ मध्ये दोहा इथं झालेल्या आशियाई खेळांमध्ये वैयक्तिक तसंच सांघिक प्रकारात हंपीने सुवर्णपदकं पटकावली.

या अंतिम लढतीतली दुसरी बुद्धिबळपटू नागपूरची दिव्या देशमुख वयाच्या १६ व्या वर्षी देशातली २१ वी महिला ग्रँडमास्टर बनली. तिने २०२२ ची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली, शिवाय त्याच वर्षी बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्येही वैयक्तिक कांस्यपदक पटकावलं आणि २०२३ चं आशियाई महिला बुद्धिबळ अजिंक्यपदही जिंकलं. भारताच्याच या दोन ग्रँडमास्टरमध्ये रंगणाऱ्या अंतिम लढतीकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.’’

हर्षवर्धन दीक्षित, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

****

मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात काल सर्वदूर चांगला पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर शहरासह सर्व नऊ तालुक्यांमध्ये काल दिवसभर जोरदार पाऊस झाला. नांदेडमध्ये दिवसभरात १० पूर्णांक सात मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जालना जिल्ह्यात मंठा तालुक्यात कानडीतून देवठाण मार्गे जाणारा पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेला. परभणी, बीड, लातूर हिंगोली तसंच धाराशिव जिल्ह्यातही काल पाऊस झाला. या सर्वदूर होत असलेल्या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळालं आहे.

दरम्यान, मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली आणि जालना जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यात सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी तसंच शेतकऱ्यांनी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचं आवाहन नांदेडचे निवासी जिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी केलं आहे.

****

नांदेड शहरात आसन क्षमतेपेक्षा जास्त शालेय विद्यार्थ्यांची वाहतुक करणाऱ्या एकूण ३७ ऑटोरिक्षा चालकांवर काल कारवाई करण्यात आली. या सर्व रिक्षाचालकांकडून दोन लाख २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक नियमांनुसार न करणाऱ्या ऑटोरिक्षांचे चालक, मालक यांच्यावर कठोर कारवाईचा इशारा नांदेडच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयानं दिला आहे.

****

पीपल्स फोरम फॉर सोशल कॉज या संस्थेच्या वतीनं आज छत्रपती संभाजीनगर इथं पहिलं विधीज्ञ साहित्य संमेलन होत आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ परिसरात न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर व्यासपीठावर हे संमेलन होणार आहे. संविधान दिंडीने संमेलनाला प्रारंभ होणार असून सकाळी १० वाजता संमेलनाचं उद्घाटन होईल.

****

लातूर जिल्ह्यात गोवर्गीय पशुधनात लंपी त्वचारोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा प्रशासन तसंच पशुसंवर्धन विभागाने शीघ्र कृती दल स्थापन केलं आहे. जिल्ह्यातल्या गोवर्गीय पशुधनासाठी सध्या १७ हजार लसी शिल्लक असून, पशुपालकांनी तातडीनं जनावरांना लसी टोचून घ्याव्यात असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

****

आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी गेल्या दहा दिवसापासून हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलकांनी काल औंढा - नांदेड रस्ता आणि नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर मसोड पाटी इथं रास्ता रोको आंदोलन केलं, यासंदर्भात प्रशासनाला निवेदनही सादर करण्यात आलं.

****

बीड जिल्ह्यातल्या बिबट्याच्या हल्ल्यात अकरा शेळ्या ठार झाल्या. वांगी नजिक गारटेंभी शिवारात हा प्रकार घडला. वनविभागाने बिबट्याला त्वरित जेरबंद करावं, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

****

कृषी विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विशिष्ट गुणांची अट शिथिल करण्यात आली असून, आता प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गासाठी ४५ टक्के तर आरक्षित प्रवर्गासाठी ४० टक्के गुण आवश्यक आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर उद्यापर्यंत प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

दक्षिण मध्य रेल्वे तिरूपती-साईनगर शिर्डी-तिरूपती या विशेष रेल्वे गाडीच्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात १८ फेऱ्या करणार आहे. रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 06.40 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 15 August 2025 Time 6.40 AM to 6.50 AM Language Marathi आकाशवाणी ...