Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 27 July 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ जुलै २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
पायाभूत सुविधा आणि ऊर्जा हे देशाच्या विकासाचा कणा असल्याचं
पंतप्रधानांचं प्रतिपादन
·
कारगिल विजय दिवस काल देशभरात विविध कार्यक्रमांनी साजरा
·
राज्यात पावसाचा जोर वाढला-विविध धरणांमधल्या पाणीसाठ्यात
झपाट्यानं वाढ
आणि
·
फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीचा पहिला
सामना बरोबरीत-आज दुसरा सामना
****
पायाभूत
सुविधा आणि ऊर्जा हे देशाच्या विकासाचा कणा असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी केलं आहे. काल पंतप्रधानांच्या हस्ते तामिळनाडूत तुतिकोरीन इथं चार हजार ८००
कोटी रुपयांच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आलं. त्यावेळी केलेल्या
भाषणात पंतप्रधान म्हणाले...
बाईट
- पंतप्रधान नरेंद्र मोदी
महान चौल
सम्राट राजेंद्र चौल यांच्या जयंती महोत्सवात पंतप्रधान आज सहभागी होणार आहेत. राजेंद्र
चौल यांच्या स्मरणार्थ एक नाणेही पंतप्रधानांच्या हस्ते जारी होणार आहे. सम्राट राजेंद
चौल यांच्या आग्नेय आशियाच्या सागरी मोहिमेला एक हजार वर्ष पूर्ण होत आहेत.
दरम्यान, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी आपला मालदीव दौरा अत्यधिक यशस्वी झाल्याचं म्हटलं आहे. काल आपला
मालदीव दौरा आटोपून ते तमिळनाडूत दाखल झाले. पंतप्रधानांच्या या मालदीव दौऱ्याचा संक्षिप्त
आढावा घेणारा हा वृत्तांत...
-
होल्ड व्हाईस कास्ट -
****
आकाशवाणीच्या
मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी अकरा वाजता संवाद साधणार
आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा १२४ वा भाग असेल. आकाशवाणी-दूरदर्शनचे सर्व वाहिन्यांवरून
सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण होईल.
****
भारत आणि
ब्रिटन दरम्यान नुकताच झालेला मुक्त व्यापार करार परिवर्तनकारी ठरणार असल्याचं केंद्रीय
वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत
बोलत होते. भारताने आतापर्यंत स्वाक्षरी केलेला हा सर्वात मोठा आणि सर्वसमावेशक व्यापार
करार असल्याचं, गोयल यांनी सांगितलं. ते म्हणाले,
बाईट
- केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल
****
कारगिल
विजय दिवस काल देशभरात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान
नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हुतात्मा सैनिकांना
अभिवादन केलं. तीनही संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख
जनरल उपेंद्र द्विवेदी, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग
आणि नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनीही वीर सैनिकांना आदरांजली वाहिली.
भारताकडे
वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना चोख प्रत्यूत्तर दिलं जाईल, असं जनरल
द्विवेदी यांनी म्हटलं आहे. द्रास इथं काल झालेल्या कार्यक्रमात ऑपरेशन सिंदूरबद्दल
बोलताना ते म्हणाले,
बाईट
- लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी
मुंबईत
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा सैनिकांना
अभिवादन केलं.
**
छत्रपती
संभाजीनगर इथं कारगिल स्मृतिवन समितीच्या वतीनं "वीरांचा शौर्यगौरव” हा कार्यक्रम
घेण्यात आला. मंत्री अतुल सावे यावेळी उपस्थित होते. सैन्याने दिलेला टी-55 रणगाडा इथं
ठेवण्यात आला आहे. त्याचं लोकार्पण सावे यांच्या हस्ते काल करण्यात आलं. कारगिल स्मृती
वनाचं लोकापर्ण महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते झालं.
योग अँड
स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशन, सायकलिस्ट फाउंडेशन यांच्या वतीनं काल
शहरात सायकल फेरी काढण्यात आली.
नांदेड
इथल्या वसरणी गावात आयोजित कार्यक्रमात, युद्धात सुभेदार या पदावर लढलेले सेवानिवृत्त
कॅप्टन सिताराम जाधव यांनी, युद्धाचे अनुभव कथन केले.
परभणी जिल्हा
सैनिकी कार्यालयाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात कारगिल विजय दिवस साजरा करण्यात
आला. धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा इथं केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीनं कारगिल विजय
दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. उमरगा इथल्या श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ संजय अस्वले यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. या सर्वच कार्यक्रमांमध्ये
माजी सैनिक, वीरमाता तसंच वीरपत्नी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
****
निवृत्तीप्रश्चात
कोणतंही शासकीय पद स्वीकारणार नाही, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई
यांनी म्हटलं आहे. अमरावती जिल्हा आणि सत्र न्यायालयात काल टी. आर. गिल्डा स्मृती ई-लायब्ररीचं
उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. कायदेविषयक सल्ला- मार्गदर्शन आणि लवाद या पर्यायी
तंटा निवारण व्यवस्थेसाठी काम करणार असल्याचा मानस सरन्यायाधीशांना व्यक्त केला.
****
वस्त्रोद्योग
क्षेत्रामध्ये सौर ऊर्जेच्या वापरासाठी वस्त्रोद्योग आणि ऊर्जा विभागाची समिती स्थापन
करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईत वस्त्रोद्योग
विभागाच्या आढावा बैठकीत काल ते बोलत होते. यासंदर्भात विविध विषयांचा मुख्यमंत्र्यांनी
कालच्या बैठकीत आढावा घेतला.
****
राज्यात
बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला असून, विविध धरणांमधल्या
पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे.
छत्रपती
संभाजीनगर शहरासह जिल्हाभरात काल दिवसभर जोरदार पाऊस झाला. कन्नड तालुक्यात पिशोर परिसरातल्या नदीला पूर आला
आहे. जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर पाऊस होत
असल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरणाचा पाणीसाठा सुमारे ८१ टक्क्यांवर पोहोचला
आहे. येत्या काळात धरणातून विसर्गाची शक्यता असल्याने, गोदावरी नदीकाठच्या
गावांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
नांदेडमधल्या
विष्णुपुरी प्रकल्पातला पाणीसाठा ९० टक्क्याच्या वर गेला असून प्रकल्पाच्या एका दरवाजातून
काही प्रमाणात विसर्ग केला जात आहे.
जालना शहरासह
जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची कामं खोळंबली असून, जनजीवनही
विस्कळीत झालं आहे.
धाराशिव
जिल्ह्यातला पाऊस काल दुपारी ओसरल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्यात
बेरोजगारांच्या फौजा तयार होत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
यांनी केली आहे. यासंदर्भात लिहिलेल्या पत्रात सपकाळ यांनी, काँग्रेस
सरकारच्या काळात पुण्याच्या हिंजवडीत आयटी उद्योग वाढीस लागला मात्र आता हा उद्योग
बंगळुरू आणि हैदराबादला जात आहे, याची जबाबदारी घेत उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
****
फिडे महिला
बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीचा पहिला सामना बरोबरीत सुटला. जॉर्जीयात बटुमी
इथं सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताच्या कोनेरु हंपी तसंच दिव्या देशमुख या दोघींमध्ये
अंतिम फेरी सुरू आहे. अंतिम फेरीतील दुसरा सामना आज होत आहे.
****
तेंडुलकर
अँडरसन कसोटी क्रिकेट मालिकेच्या चौथ्या सामन्यात आज पाचव्या दिवशी भारताला इंग्लंडवर
आघाडीसाठी १३७ धावांची गरज आहे. दुसऱ्या डावात भारत आज दोन बाद १७४ धावांवरुन पुढे
खेळास सुरुवात करेल. कालच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कर्णधार शुभमन गिल ७८ तर के
एल राहुल ८७ धावांवर फलंदाजी करत होते.
****
जर्मनीत
सुरू असलेल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेत भारताच्या साहिल जाधवने तीरंदाजीत कंपाऊंड
प्रकारात सुवर्णपदक जिंकलं. या स्पर्धेत दोन सुवर्ण, दोन रौप्य तसंच
एक कांस्यपदक जिंकून भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
****
विद्यार्थ्यांनी
सर्वांगिण विकासासाठी खेळामध्ये सहभाग घेणं आवश्यक असल्याचं, छत्रपती संभाजीनगरचे
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हटलं आहे. क्रीडा विभागाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत
होते. दरम्यान, फुलंब्री तालुक्यात खामगाव इथल्या श्री गोरक्ष
आयुर्वेदिक महाविद्यालय आणि शैक्षणिक संकुलात ‘वृक्षारोपण आणि युवा संवाद’ हा विशेष
उपक्रम जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काल पार पडला.
****
विद्यार्थ्यांमध्ये
वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जिज्ञासू वृत्ती निर्माण व्हावी यासाठी परभणी शहरातल्या स्कॉटिश
अकॅडमीमध्ये बाल विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. यात विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी
प्रयोगाद्वारे माहिती दिली.
****
श्रावण
महिन्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वेरुळ इथल्या घृष्णेश्वर
मंदिर तसंच खुलताबाद इथल्या भद्रा मारोतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी काल मोठी गर्दी
केली. वेरुळ लेणीतला धबधबा देखील प्रवाहीत झाला असून, पर्यटकांची
गर्दी वाढली आहे.
****
No comments:
Post a Comment