Regional Marathi Text Bulletin,
Chhatrapati Sambhajinagar
Date – 27 July 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ जूलै २०२५ सायंकाळी ६.१०
****
· वस्त्रोद्योग हे भारताच्या सांस्कृतिक वैविध्याचं उदाहरण असल्याचं
पंतप्रधानांचं प्रतिपादन-पैठणी विणकर कविता ढवळे यांचा मन की बातमधून गौरवपूर्ण
उल्लेख
· कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आधुनिकीकरणासाठी निधी देण्यास शासन
कटिबद्ध-उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
· प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणच्या
छत्रपती संभाजीनगर परिमंडळाला थायलंडचा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स पुरस्कार
आणि
· तेंडुलकर अँडरसन कसोटी क्रिकेट मालिकेच्या चौथ्या सामन्यात पाचव्या दिवशी भारत
८८ धावांनी पिछाडीवर
****
वस्त्रोद्योग हे भारताच्या सांस्कृतिक वैविध्याचं उदाहरण
असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या
कार्यक्रम मालिकेच्या १२४ व्या भागात ते आज बोलत होते. येत्या सात ऑगस्टला साजरा
होत असलेल्या दहाव्या ‘राष्ट्रीय हातमाग दिवसाच्या‘ अनुषंगाने बोलतांना
पंतप्रधानांनी देशभरात आज तीन हजारांहून अधिक वस्त्रोद्योग स्टार्टअप कार्यरत
असल्याचं सांगत,
या स्टार्ट -अप्सनी भारताच्या हातमाग क्षेत्राला नवी ओळख
देत वैश्विक उंची प्राप्त करून दिल्याचं नमूद केलं. या संदर्भात बोलतांना
पंतप्रधानांनी,
पैठण इथल्या पैठणी विणकर कविता ढवळे यांचा उल्लेख केला. ते
म्हणाले...
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
कविता ढवळे यांनी यासंदर्भात आकाशवाणीशी बोलतांना आनंद
व्यक्त केला. पंतप्रधानांनी फक्त आपलीच नव्हे, तर
पैठण इथं कार्यरत असलेल्या सर्व हातमाग विणकरांच्या कार्याची नोंद घेतल्याची भावना
ढवळे यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या...
बाईट - कविता ढवळे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचं
मानांकन,
शुभांशू शुक्ला यांचा अंतराळ प्रवास, २३ ऑगस्टचा राष्ट्रीय अंतराळ दिवस, स्वातंत्र्यदिनासह
स्वातंत्र्य लढ्यात ऑगस्ट महिन्यातल्या विविध चळवळी, लोकमान्य
टिळक तसंच खुदिराम बोस यांची पुण्यतिथी, हस्तलिखितांचं जतन
आणि वारसा हस्तांतरण, स्वच्छ भारत मिशन, 'जागतिक पोलिस आणि अग्निशमन स्पर्धा' विद्यार्थ्यांचे
ऑलिंपियाड तसंच क्रीडा स्पर्धा, यासह विविध विषयांवर
पंतप्रधानांनी भाष्य केलं. आगामी काळात येणाऱ्या सणांच्या पंतप्रधानांनी
देशवासियांना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, राजा चोल आणि राजेंद्र चोल
यांची नावं भारताच्या इतिहासात गौरवाचं प्रतीक आहेत, असं
पंतप्रधानांनी म्हटलं आहे. आज तमिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यात आदि तिरुवथिरई
उत्सवाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. गंगैकोंडा चोलपुरम मंदिर उभारणीच्या एक
हजाराव्या वर्धापन दिनानिमित्त हा सोहळा साजरा झाला. राजेंद्र चोल प्रथम यांच्या
सन्मानार्थ पंतप्रधानांच्या हस्ते एक नाणंही जारी करण्यात आलं. कार्यक्रमानंतर
पंतप्रधानांनी रोड शोच्या माध्यमातून नागरिकांना अभिवादन केलं.
****
ज्येष्ठ शास्त्रज्ञ माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ एपीजे
अब्दुल कलाम यांच्या स्मृतीदिनानिमित्त देश आज त्यांना अभिवादन करत आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी डॉ कलाम यांना समाजमाध्यमावर आदरांजली वाहिली.
केंद्रीय राखीव पोलीस दल-सीआरपीएफ स्थापना दिनानिमित्त
सीआरपीएफचे जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
देशाच्या अंतर्गत सुरक्षेशी संबंधित आव्हानात्मक प्रसंगी, सीआरपीएफने
महत्त्वाची भूमिका बजावल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं
आहे.
****
भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या प्रवासात एक ऐतिहासिक
क्षण ठरलेला,
भारत-यूके मुक्त व्यापार करार झाल्यानिमित्ताने केंद्रीय
वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांचा आज मुंबईत सत्कार करण्यात आला.
बोरीवली इथं झालेल्या या सत्कार समारंभात, “यूके बाजारातील निर्यात संधी” या विषयावर एक विशेष सत्रही घेण्यात आलं, ज्यामध्ये भारतीय उद्योजक आणि निर्यातदारांसाठी या करारामुळे उपलब्ध झालेल्या
नव्या संधींबाबत माहिती देण्यात आली.
****
राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं आधुनिकीकरण
करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध आहे, अशी
ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अहिल्यानगर
जिल्ह्यातल्या राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवन आणि उपहारगृह
इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी ते आज बोलत होते. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा
वापर वाढवण्यासाठी शासनाने पाचशे कोटी रुपयांचा तरतूद केली असून, शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून उसाचं उत्पादन वाढवावं, असं अवाहन पवार यांनी केलं.
****
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या प्रभावी
अंमलबजावणीसाठी महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळाचा थायलंडच्या फुके इथं
रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते बोमन
इराणी यांच्या हस्ते महावितरणचे संचालक राजेंद्र पवार आणि विशेष कार्य अधिकारी
मंगेश कोहाट यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या सन्मानाबद्दल अध्यक्ष तथा
व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं
अभिनंदन केलं आहे.
****
नाशिक इथं आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं लोकार्पण करण्यात आलं. नाशिकरोड
परिसरात झालेल्या कार्यक्रमाला आमदार गोपीचंद पडळकर, आमदार
देवयानी फरांदे,
आमदार सदाभाऊ खोत आणि इतर मान्यवरही उपस्थित होते. दरम्यान, शिवसेनवा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी उपनेते सुनील बागुल, माजी महानगर प्रमुख मामा राजवाडे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी आज मंत्री
गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
****
आपल्या पूर्वजांनी जपलेली स्थानिक बीज संपदा ही केवळ कृषी
वारसा नाही,
तर अन्नसुरक्षेचं मूळ आहे, असं
प्रतिपादन पद्मश्री राहीबाई पोपरे यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर नगर
जिल्ह्यातल्या चितेपिंपळगाव इथं बीज प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत
होत्या. पारंपरिक आणि जैविक शेतीतूनच पर्यावरणयुक्त आणि आरोग्यदायी जीवनशैली शक्य
आहे,
असंही पोपरे यांनी सांगितलं. स्थानिक बियाण्यांचं जतन
संवर्धन आणि शाश्वत शेतीच्या प्रचारासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये जागृती
करावी,
असं आवाहन पोपरे यांनी केले. या प्रदर्शनात दिडशे पेक्षा
जास्त बियाणांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं.
****
जलसंधारणासोबत मनसंधारण करणंही आवश्यक असल्याचं, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं
प्रेरणा फाउंडेशच्या वतीने गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेसंदर्भात आज
घेण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणीत
उत्कृष्ट कार्य करणारे, जिल्हा जलसंधारण अधिकारी
विजय कांबळे,
उप अभियंता मनिष निरंजन, अनिल
मुंगीकर,
पर्यावरण तज्ज्ञ नितीन डोईफोडे यांना यावेळी मान्यवरांच्या
हस्ते सन्मानित करण्यात आलं. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी बोलतांना, गाळरुपी मातीचे फायदे शेतकऱ्यांच्या लक्षात यावेत यासाठी प्रात्यक्षिक क्षेत्र
तयार करण्याचं सूचित करून, जल संधारण तसंच माती
परीक्षणाबाबत जागृतीची गरज व्यक्त केली.
****
मुंबईतल्या दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनचा
भाईसाहेब सावंत स्मृती उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकार बँक अधिकारी पुरस्कार, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे महाव्यवस्थापक सुरेश रामराव पाटील यांना नुकताच
प्रदान करण्यात आला. जिल्हा बँकांमध्ये उत्कृष्ट कामाबरोबरच इतर क्षेत्रात
उल्लेखनीय कामासाठी हा पुरस्कार दिला जातो. त्यानुसार सन २०२३-२४ चा व्यवस्थापक
श्रेणीमधील पुरस्कार सुरेश पाटील यांना देण्यात आला.
****
तेंडुलकर अँडरसन कसोटी क्रिकेट मालिकेच्या चौथ्या सामन्यात
आज पाचव्या दिवशी उपाहारापर्यंत भारतीय संघाने ४ गड्यांच्या मोबदल्यात २२३ धावा
केल्या आहेत. कर्णधार शुभमन गिलने आपलं शतक पूर्ण केलं, मात्र
तो १०३ धावांवर बाद झाला. सध्या वाशिंग्टन सुंदर २१ तर रविंद जडेजा ० धावांवर खेळत
आहे. सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंड संघाने ६६९ धावा केल्या आहेत. या डावात
भारतीय संघ अद्याप ८८ धावांनी पिछाडीवर आहे.
****
छत्रपती संभाजीनगर विभागात विविध धरणांमधला पाणीसाठा सरासरी
५३ टक्क्यांवर पोहोचला आहे. पैठण इथल्या जायकवाडी धरण सुमारे ८२ टक्के तर नांदेड
इथला विष्णुपुरी प्रकल्प सुमारे ९० टक्के भरला आहे. हिंगोली जिल्ह्यात येलदरी
धरणात ७३ टक्के तर सिद्धेश्वर धरणात ५१ टक्के पाणी साठा झाला आहे.
****
No comments:
Post a Comment