Saturday, 26 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 26 July 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ जूलै २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      भारताकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना चोख प्रत्यूत्तर दिलं जाईल - लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं प्रतिपादन

·      विविध कायर्यक्रमांच्या माध्यमातून कारगिल विजय दिवस साजरा

·      भारत आणि ब्रिटन दरम्यानचा मुक्त व्यापार करार परिवर्तनकारी ठरणार - केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची माहिती

आणि

·      राज्यात बहुतांश भागात पावसाचा जोर; अनेक ठिकाणी पाणीसाठ्यात वाढ

****

भारताकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना चोख प्रत्यूत्तर दिलं जाईल, असं लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. कारगिलमधल्या द्रास इथं आज २६ व्या कारगिल विजय दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. भारताचं सार्वभौमत्व, अखंडता किंवा जनतेला नुकसान पोहोचवण्याची योजना आखणाऱ्या दृष्ट शक्तिंना सडेतोड उत्तर दिलं जाईल, असं ते म्हणाले. सर्व देशवासियांना सन्मानाने, शांततेत जीवन व्यतित करता यावं, यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या पराक्रमी जवानांना नमन करत असल्याचं लष्कर प्रमुख म्हणाले. ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना ते म्हणाले,

बाईट - लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी

****

देशभर आज कारगिल विजय दिवस साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यानिमित्त देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना आदरांजली वाहिली. देशाच्या आत्मसन्मानाचं रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भारत मातेच्या वीर सुपुत्रांचं आपण स्मरण करतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कारगिल विजय दिनानिमित्त्त नवी दिल्ली इथल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून वीर सैनिकांना आदरांजली वाहिली. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह, संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग आणि नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनीही वीर जवानांना आदरांजली वाहिली.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा सैनिकांना अभिवादन केलं.

****

कारगिल विजय दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं विविध कार्यक्रम घेण्यात आले. योग अँड स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशन, सायकलिस्ट फाउंडेशन यांच्या वतीनं आज शहरात सायकल रॅली काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगर शहरात उभारण्यात आलेल्या कारगिल स्मृती वनाचे उद्घाटन महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते झालं.

नांदेड इथल्या वसरणी गावात आयोजित कार्यक्रमात युद्धात सुभेदार या पदावर लढलेले सेवानि‍वृत्‍त कॅप्‍टन सिताराम हिरामन जाधव यांनी युद्धाचे अनुभव कथन केले. सैन्‍यावर देशाचा विश्‍वास असल्‍यामुळे सैन्‍य हे केवळ युद्ध लढत नसून, संपूर्ण देशच युद्ध लढत असतो, असं ते म्हणाले.

परभणी जिल्हा सैनिकी कार्यालयाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. युद्धात सहभागी झालेल्या तीन माजी सैनिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा इथं केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीनं कारगिल विजय दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. उमरगा इथल्या श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अस्वले यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. आज देशाला युवा नेतृत्वाची गरज असून, युवा पिढीत त्याग, बलिदान आणि समर्पणाची भावना निर्माण करणारा हा दिवस असल्याचं ते म्हणाले. यावेळी माजी सैनिक, वीरमाता आणि वीर पत्नी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

****

भारत आणि ब्रिटन दरम्यान नुकताच झालेला मुक्त व्यापार करार परिवर्तनकारी ठरणार असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. या करारामुळे अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत, असं ते यावेळी म्हणाले. भारताने आतापर्यंत स्वाक्षरी केलेला हा सर्वात मोठा आणि सर्वसमावेशक व्यापार करार असून, भारताच्या जागतिक व्यापार भागीदारीसाठी त्याने ‘मानक’ प्रस्थापित केलं आहे, असं गोयल यांनी सांगितलं. ते म्हणाले,

बाईट - केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल

****

स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे भारतीय राज्यघटना आणि लोकशाहीचे आधारस्तंभ असून राज्यघटनेला अभिप्रेत असलेली मूल्यं टिकवायला न्यायव्यवस्था वचनबद्ध आहे, असं प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केलं आहे. अमरावती जिल्ह्यात दर्यापूर इथल्या न्यायालयातल्या ई - लायब्ररीचं उद्घाटन करताना ते बोलत होते. न्याय व्यवस्था ही लोकशाहीचा प्राण आहे, त्यामुळे न्यायाधीशांनी संविधानाला आदर्श मानून न्यायदानाचं काम करावं असं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला असून, विविध धरणांमधल्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्हाभरात आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. शहरातल्या सखल भागात पाणी साचून वाहतुकीवर परिणाम झालेला दिसून येत आहे.

जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरणात सध्या ८० पूर्णांक ७० टक्के इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे येत्या काळात धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात येऊ शकतो, असं पाटबंधारे विभागानं कळवलं आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठी असलेल्या गावातल्या नागरीकांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

नांदेड जिल्ह्यात आज दुपारपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे विष्णुपुरी प्रकल्प ९३ टक्के भरला आहे. गोदावरी नदीकाठच्या गावकऱ्यांना साधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

जालना शहरासह जिल्ह्यात आज पहाटेपासून ढगाळ वातावरण असून, पावसाची संततधार सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची कामं खोळंबली असून, जनजीवनही विस्कळीत झालं आहे. शहरातल्या काही भागांत रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक मंदावली आहे.

धाराशिव जिल्ह्यात कालपासून सतत सुरू असलेला पाऊस आज दुपारी ओसरल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

येत्या तीन ते चार तासात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान केंद्रानं ही माहिती दिली.

****

मुंबई आणि उपनगरांत आज सकाळपासून वातावरण ढगाळ असून, अधूनमधून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. रायगड जिल्ह्यात जोरदार पावसामुळे सावित्री नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. गोंदिया जिल्ह्यात संततधारेमुळे अनेक भागांतल्या नद्या, नाले तुडुंब भरून वाहत आहेत.

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढल्यानं धरणांमधली पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी कोयनेसह पाच धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातले २२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

****

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले इथं स्वाभीमानी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायट्यांच्या सचिवांच्या संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवशनाचे उद्घाटन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झालं. राष्ट्रीय सहकार धोरण यशस्वी करण्याचं आव्हान स्वीकारून, सहकार बळकट करा, सरकार सचिवांना पाठबळ देईल शी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

****

विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी खेळामध्ये सहभाग घेणं आवश्यक असल्याचं मत छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व्यक्त केलं. क्रीडा विभागाच्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. जिल्ह्यातल्या प्रत्येक शाळेत व्याख्यान आयोजित करुन, खेळाचं महत्व पटवून द्यावं, खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या सुविधा, योजना आदींची माहिती द्यावी, असे निर्देश स्वामी यांनी संबंधित विभागाला दिले.

****

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जिज्ञासू वृत्ती निर्माण व्हावी यासाठी परभणी शहरातल्या स्कॉटिश अकॅडमीमध्ये बाल विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. यात पर्यावरण संवर्धन, हवा आणि माती प्रदूषण, पारंपरिक ऊर्जेचा वापर, वाहतूक समस्या अशा विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रयोगाद्वारे माहिती दिली.

****

चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

****

क्रिकेट

मँचेस्टर कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतावर ३१० धावांची आघाडी मिळवली आहे. आज सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडच्या संघाचा पहिला डाव ६६९ धावांवर आटोपला. उपहारापर्यंत भारताच्या दुसऱ्या डावात एक बाद दोन धावा झाल्या आहेत.

****

 

No comments: