Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 27
July 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ जूलै २०२५ दुपारी १.०० वा.
****
वस्त्रोद्योग हा भारताच्या
सांस्कृतिक वैविध्याचं उदाहरण असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या
मन की बात या कार्यक्रम मालिकेच्या १२४ व्या भागात ते आज बोलत होते. येत्या सात ऑगस्टला
साजरा होत असलेल्या दहाव्या ‘राष्ट्रीय हातमाग दिवसाच्या’ अनुषंगाने बोलतांना पंतप्रधानांनी
देशभरात आज तीन हजारांहून अधिक वस्त्रोद्योग स्टार्टअप कार्यरत असल्याचं सांगत, या स्टार्ट -अप्सनी भारताच्या हातमाग क्षेत्राला नवी
ओळख देत वैश्विक उंची प्राप्त करून दिल्याचं नमूद केलं. या संदर्भात बोलतांना पंतप्रधानांनी, पैठण इथल्या
पैठणी विणकर कविता ढवळे यांचा उल्लेख केला. ते म्हणाले...
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
कविता ढवळे यांनी यासंदर्भात
आकाशवाणीशी बोलतांना आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी फक्त आपलीच नव्हे, तर पैठण इथं
कार्यरत असलेल्या सर्व हातमाग विणकरांच्या कार्याची नोंद घेतल्याची भावना ढवळे यांनी
व्यक्त केली. त्या म्हणाल्या...
बाईट - पैठणी विणकर, कविता ढवळे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या
१२ किल्ल्यांना युनेस्कोचं मानांकन, शुभांशू शुक्ला यांचा अंतराळ प्रवास, २३ ऑगस्टचा
राष्ट्रीय अंतराळ दिवस, स्वातंत्र्यदिनासह स्वातंत्र्य लढ्यात ऑगस्ट महिन्यातल्या
विविध चळवळी, लोकमान्य टिळक तसंच खुदिराम बोस यांची पुण्यतिथी, हस्तलिखितांचं जतन आणि वारसा
हस्तांतरण, स्वच्छ भारत मिशन, 'जागतिक पोलिस आणि अग्निशमन स्पर्धा' विद्यार्थ्यांचे
ऑलिंपियाड तसंच क्रीडा स्पर्धा, यासह विविध विषयांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. नागपंचमी, रक्षाबंधन, जन्माष्टमी
आदी सणांच्या पंतप्रधानांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, तमिळनाडूत
महान चौल सम्राट राजेंद्र चौल यांच्या जयंती महोत्सवात पंतप्रधान आज सहभागी होणार आहेत.
राजेंद्र चौल यांच्या स्मरणार्थ एक नाणेही पंतप्रधानांच्या हस्ते जारी होणार आहे. सम्राट
राजेंद्र चौल यांच्या आग्नेय आशियाच्या सागरी मोहिमेला एक हजार वर्ष पूर्ण होत आहेत.
****
उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये
आज सकाळी मनसादेवी मंदिरात चेंगराचेंगरी झाली असून या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू
झाला तर अनेकजण जखमी झाले. वीजेची तार पडल्याने चेंगराचेंगरी झाल्याचं पोलिसांकडून
सांगण्यात आलं. या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
शोक व्यक्त केला आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे
जगातील सर्वात लोकप्रिय, अव्वल लोकशाहीवादी नेते ठरले आहेत. अमेरिकेतील माहिती
विश्लेषण संस्था मॉर्निंग कन्सल्टनच्या सर्वेक्षणात पंतप्रधान मोदींना ७५ टक्के गुणांकन
मिळालं. या सर्वेक्षणात दक्षिण कोरियाचे अध्यक्ष दुसऱ्या क्रमांकावर तर अर्जेंटिनाचे
अध्यक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहेत. काल पंतप्रधानांनी त्यांच्या कार्यकाळातील ४ हजार
७९ दिवस पूर्ण केले. आता ते भारताचे सलग जास्त काळ राहणारे दुसरे पंतप्रधान बनले आहेत.
****
जम्मू-काश्मीरमधील पवित्र
अमरनाथ यात्रा विनाअडथळा सुरू आहे. चोख सुरक्षा व्यवस्थेत जवळपास बावीसशेच्या आसपास
यात्रेकरुंचा २५ वा जत्था जम्मूच्या भगवतीनगर आधार शिबीरातून पुढच्या प्रवासाला आज
सकाळी रवाना झाला.
****
संसदरत्न पुरस्कारानं सतरा
खासदारांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी गौरवण्यात आलं आहे. नवी दिल्लीत यावर्षीचे
संसदरत्न पुरस्कार संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात
आले. यात महाराष्ट्रातील डॉक्टर मेधा कुलकर्णी, नरेश म्हस्के, वर्षा गायकवाड, सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, श्रीरंग बारणे, स्मिता वाघ
आदी ७ खासदारांचा समावेश आहे.
****
नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पात
पाण्याची आवक सुरूच असल्यानं आज सकाळी प्रकल्पाचा चौथा दरवाजा उघडण्यात आला. गोदावरी
नदीपात्रात सोळाशे अडूसष्ट क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नांदेड महापालिकेने
खबरदारीच्या उपायोजना म्हणून शहर परिसरात गोदावरी नदीकाठी जीवरक्षक दल तैनात केले आहेत.
****
भंडारा जिल्ह्यात पोलिसांनी
शालेय पोषण आहारातील तांदूळ अन्यत्र नेणारा ट्रक पकडला आहे. खरबी इथं साईबाबा राईस
मिल समोर काल ही कारवाई करण्यात आली. ट्रकमधील २१० तांदळाची पोती शालेय पोषण आहाराची
असल्याचं निष्पन्न झालं असून या प्रकरणी संबंधित मिल मालक, आणि ट्रकमधील दोघांवर गुन्हा
नोंदवण्यात आला.
****
कोकण, मध्य महाराष्ट्र
आणि विदर्भात तुरळक ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
****
No comments:
Post a Comment