Tuesday, 29 July 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 29.07.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 29 July 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ जूलै २०२ सकाळी.०० वाजता

****

राज्यसभेत आज ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु होणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह या चर्चेला सुरुवात करतील. राज्यसभेतही या चर्चेसाठी १६ तासांचा वेळ देण्यात आला आहे. तर लोकसभेत काल सुरु झालेली ऑपरेशन सिंदूरवरची चर्चा आजही सुरु राहणार आहे.

****

जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर जिल्ह्यातल्या हरवान क्षेत्रात काल सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. ऑपरेशन महादेव अंतर्गत मारल्या गेलेल्या या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरु असल्याचं काश्मीरचे पोलिस महासंचालक व्ही के बिरदी यांनी सांगितलं.

****

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ला आज पाच वर्ष पूर्ण झाली. देशातल्या शाळांची एक इमारत ही ओळख बदलून, केवळ पुस्तकी शिक्षण, गुण आणि पाठांतर यांच्यापलिकडील ज्ञान मिळवण्याचं अवकाश, अशी ओळख घडवण्याच्या महत्वाकांक्षी योजनेचा हा पथदर्शी आराखडा आहे. गेल्या पाच वर्षात या धोरणामुळे अधिक समावेशक, विद्यार्थी केंद्रीत आणि भविष्यासाठी अनुकूल शिक्षण पद्धतीचा पाया रचला गेला. सर्व राज्यांमध्ये शिक्षण क्षेत्रात नवीन धोरणाचा प्रभाव दिसून येत आहे. निपुण भारत आणि विद्या प्रवेश या उपक्रमांचा चार कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे.

****

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन आज साजरा केला जात आहे. दरवर्षी २९ जुलै हा दिवस जागतिक स्तरावर वाघांच्या नैसर्गिक अधिवासांचं जतन करण्यासाठी, आणि जगभरातल्या संवर्धन प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी, साजरा केला जातो. जागतिक व्याघ्र दिनानिमित्त, केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी, वाघांच्या संवर्धनात भारताच्या उल्लेखनीय यशावर प्रकाश टाकला. भारत ५८ अभयारण्य आणि तीन हजार ६८२ वाघांसह, वाघ संवर्धनात जगासाठी एक उदाहरण म्हणून उदयास आला असल्याचं, त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

रोजगारात वाढ आणि विशेषतः कारखानदारी क्षेत्रात रोजगारक्षमता वाढवण्याच्या दृष्टीनं रोजगाराशी जोडलेली प्रोत्साहन योजना केंद्र सरकारने नुकतीच आणली आहे. या योजनेअंतर्गत युवकांना पहिल्या नोकरीत एक महिन्याचा पगार कमाल १५ हजार रुपयांपर्यंत दिला जाणार आहे. कारखानदार आणि उद्योजकांना रोजगारनिर्मितीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी दोन वर्षं विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत. चालू आर्थिक वर्षात याकरता दोन लाख कोटी रुपयांची तरतूद केली असून, दोन वर्षांच्या कालावधीत साडेतीन कोटी रोजगार निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे. या योजनेविषयी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या मुंबईच्या क्षेत्रीय कार्यालयात जनजागृतीपर कार्यक्रम राबवला जात आहे.

****

बिहारमध्ये वैशाली जिल्ह्यातल्या वैशालीगढ इथं नव्याने उभारण्यात आलेल्या बुद्ध सम्यक दर्शन संग्रहालयाचं उद्घाटन आणि स्मारक स्तूपाचं अनावरण आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते होणार आहे. सुमारे ७२ एकर जागेवर, ५५० कोटी रुपये खर्च करुन हे संग्रहालय उभारण्यात आलं आहे.

****

राज्य सरकार ॲप आधारित रिक्षा, टॅक्सी आणि ई बाईक सेवा सुरू करणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल सांगितलं. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्यानंतर हे ॲप कार्यान्वित केलं जाईल. यंत्रणेत पारदर्शकता ठेवण्यासाठी आवश्यक सर्व बाबींचा यात समावेश असेल; यामुळे राज्यातल्या लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, असं सरनाईक म्हणाले.

****

नागपंचमीचा सण आज साजरा होत आहे. वारुळांची पूजा, सर्पमित्रांकडून जनजागृती, आणि सापांविषयीच्या गैरसमजांवर प्रबोधन आदी विविध कार्यक्रम यानिमित्त होत असतात.

****

नांदेडमध्ये शीख धर्मीयांसाठी 'महाराष्ट्र आनंद विवाह नोंदणी नियम, २०२०' ची अंमलबजावणी करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. या निर्णयामुळे शीख नागरिकांना त्यांच्या विवाह नोंदणीसाठी सुलभ आणि कायदेशीर मार्ग उपलब्ध होणार आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर नंतर आनंद विवाह नोंदणी नियमाची अंमलबजावणी करणारी नांदेड ही दुसरी महापालिका ठरली आहे.

****

परभणी जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व शाळा इमारतींची तपासणी करून नादुरुस्त इमारतींचं काम तातडीने हाती घेऊन पूर्ण करावे आणि तसा अहवाल मुख्यालयाला सादर करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव दीपक कपूर यांनी दिले आहेत. जिल्हा वार्षिक योजनेसह विविध महत्त्वाच्या योजनांच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. अत्यावश्यक असलेल्या शाळा इमारत बांधकामासाठी आकस्मिक निधी उभा करून शाळा खोल्या बांधण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

****

फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावणार्या नागपुरच्या दिव्या देशमुखवर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्या, तसंच उपविजेती कोनेरु हंपी हिचंही अभिनंदन केलं आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन्ही बुद्धीबळपटू भारताच्या असणं हे भारतातल्या अपार प्रतिभेचं प्रतिक आहे, असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.

****

No comments: