Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 29 July
2025
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ जुलै २०२५ सकाळी ७.१० मि.
****
· ‘ऑपरशेन
सिंदूर’ देशाच्या सामर्थ्याचं
प्रतीक, दहशतवादाच्या समूळ उच्चाटनासाठी
सरकार कटिबद्ध- संरक्षणमंत्र्यांचं लोकसभेतल्या चर्चेत प्रतिपादन
· राष्ट्रीय
शैक्षणिक धोरणाला आज पाच वर्ष पूर्ण, नवी दिल्लीत अखिल भारतीय शिक्षण
संमेलनाचं आयोजन
· लाडकी बहीण
योजनेतली संशयास्पद २६ लाख खाती अपात्र ठरल्यास बंद करणार-मुख्यमंत्र्यांचा इशारा
· फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत नागपूरच्या दिव्या
देशमुखला अजिंक्यपद
आणि
· जायकवाडी
धरणात ८४ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा, गोदाकाठावरील गावांना
सावधानतेचा इशारा
****
ऑपरशेन सिंदूर हे भारताच्या
सामर्थ्याचं प्रतीक असून, दहशतवादाच्या समूळ उच्चाटनासाठी आपलं सरकार पूर्णपणे कटिबद्ध
असल्याचं प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी केलं आहे. काल लोकसभेत, ऑपरेशन
सिंदूरवर चर्चेला प्रारंभ करतांना ते बोलत होते. संरक्षणमंत्र्यांनी संपूर्ण
घटनाक्रमाची सदनाला माहिती देत, दहशतवादी धोरणांमुळे पाकिस्तानला विरोध असल्याचं स्पष्ट
केलं. ऑपरेशन सिंदूर स्थगित केलेलं असून, भविष्यात पाकिस्तानने कोणतीही
आगळीक केल्यास, ही मोहीम पुन्हा सुरू होईल, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला. या कारवाईत
आपल्या सैन्यदलाने पाकिस्तानातल्या सर्वसामान्य नागरिकांना कोणतीही हानी न पोहोचवता
दहशतवाद्यांचे नऊ तळ उध्वस्त केले, यात शंभरपेक्षा अधिक दहशतवादी आणि त्यांच्या संघटनांचे
हस्तक मारले गेले. भारतीय सेनेनं आपलं कोणतंही नुकसान न होऊ देता, अवघ्या
२२ मिनिटांत ही कारवाई पूर्ण केल्याचं राजनाथसिंह यांनी सांगितलं. ते म्हणाले...
बाईट- संरक्षणमंत्री
राजनाथसिंह
काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी
या चर्चेत सहभाग घेत, पहलगामध्ये दहशतवादी कसे आले, याची माहिती देण्याची मागणी
करत, त्या दहशतवाद्यांना सरकार पकडू शकलेलं नाही, अशी टीका केली. पाकिस्तानने
भारतीय वायूसेनेची विमानं पाडल्याचा दावा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष
डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धात केलेले मध्यस्थीचे दावे, आदी मुद्यांवरूनही विरोधी
पक्षांनी सरकारी पक्षावर टीका केली. पंचायतराज मंत्री राजीव रंजनसिंह यांनी विरोधकांचे हे
सर्व आरोप फेटाळून लावत, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून संपूर्ण जगाला भारताच्या
सामर्थ्याचं दर्शन झाल्याचं नमूद केलं. परराष्टमंत्री एस जयशंकर यांनी
या चर्चेत भाग घेत, या कारवाईनंतर विविध देशात गेलेल्या शिष्टमंडळाबाबत विरोधकांनी
केलेले दावे पुराव्यानिशी खोडून काढले.
दरम्यान, राज्यसभेत
आज ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होणं अपेक्षित आहे.
****
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०
ला आज पाच वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीनं
आज अखिल भारतीय शिक्षण संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या धोरणामुळे विद्यार्थ्यांना
त्यांच्या आवडीचे विषय शिकता येणार असल्याचं, छत्रपती संभाजीनगर इथले निवृत्त
प्राचार्य डॉ उल्हास शिऊरकर यांनी सांगितलं. ते म्हणाले...
बाईट- डॉ उल्हास
शिऊरकर
दरम्यान, नवीन शैक्षणिक
धोरणासंदर्भात एक विशेष कार्यक्रम आज आमच्या केंद्रावरून सकाळी दहा वाजून
४५ मिनिटांनी प्रसारित केला जाणार आहे.
****
लाडकी बहीण योजनेतली संशयास्पद
२६ लाख खाती सध्या निलंबित केलेली आहेत, या खात्यांची तपासणी करून, ती अपात्र
असल्यास, बंद केली जातील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. काल वर्धा
इथं वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले,
बाईट- मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस
दरम्यान, स्थानिक
स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढणार असल्याचं, फडणवीस
यांनी म्हटलं आहे. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे, मात्र अशा
जागा अपवादात्मक असतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
****
फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत नागपूरच्या दिव्या
देशमुखने अजिंक्यपद पटकावलं आहे. अशाप्रकारची कामगिरी करणारी दिव्या देशमुख पहिलीच
भारतीय बुद्धिबळपटू आहे. जॉर्जियात बटुमी इथं झालेल्या या स्पर्धेची अंतिम फेरी भारताच्या
कोनेरु हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात खेळली गेली. या फेरीचे पहिले दोन सामने
तसंच काल सकाळी झालेला तिसरा सामना अनिर्णित राहिला, मात्र दुपारनंतर झालेल्या
टायब्रेकर सामन्यात दिव्याने हंपीवर मात करत, अजिंक्यपद पटकावलं तर हंपी
उपविजेतेपदाची मानकरी ठरली. यंदाच्या स्पर्धेचं विजेतेपद तसंच उपविजेतेपद पटकावून
भारताने इतिहास घडवला आहे.
दिव्याच्या या कामगिरीबद्दल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिचं अभिनंदन केलं आहे. राज्यशासनातर्फे दिव्याचा
विशेष सन्मान केला जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
****
काल पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त
बारा ज्योतिर्लिंगांमध्ये समावेश असलेल्या राज्यातल्या शिवमंदिरांमध्ये तसंच इतर प्रसिद्ध
शिवमंदिरांमधे पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. मराठवाड्यात
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरुळ इथलं घृष्णेश्वर, बीड जिल्ह्यात परळी इथं वैद्यनाथ, हिंगोली
जिल्ह्यात औंढा इथल्या नागनाथ मंदिरासह नाशिक जिल्ह्यातलं त्र्यंबकेश्वर आणि पुणे जिल्ह्यात
भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. श्रावण
महिन्यात प्रत्येक गावात ग्रामदेवतेला अभिषेक करण्याची पूर्वापार प्रथा आहे, त्या अनुषंगाने
वेरूळ इथल्या पवित्र शिवालय तीर्थातून पाणी घेऊन जाण्यासाठी पंचक्रोशीतील गावं तसंच
इतरही खेड्यापाड्यातून भाविकांची लक्षणीय गर्दी झाल्याचं दिसून आलं.
****
छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यात सहा ऑगस्टपर्यंत महसूल सप्ताह राबवला जाणार आहे. यात विविध
लोकाभिमुख उपक्रम राबवले जाणार असून,
नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं
आहे.
दरम्यान, जिल्ह्यातल्या
प्रत्येक तालुक्यात येत्या १५ ऑगस्ट पर्यंत विवाहपूर्व संवाद केंद्र कार्यान्वित करण्याचे
निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी सर्व संबधितांना दिले आहेत. या
केंद्रातल्या संवाद साधणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावं निश्चित झाल्यानंतर त्यांना
राष्ट्रीय महिला आयोगामार्फत प्रशिक्षण दिलं जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
****
नांदेडमध्ये शीख
धर्मीयांसाठी 'महाराष्ट्र आनंद विवाह नोंदणी नियम, २०२०' ची
अंमलबजावणी करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. या निर्णयामुळे शीख नागरिकांना
त्यांच्या विवाह नोंदणीसाठी सुलभ आणि कायदेशीर मार्ग उपलब्ध होणार आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरनंतर आनंद विवाह नोंदणी नियमाची अंमलबजावणी करणारी
नांदेड ही दुसरी महापालिका ठरली आहे.
****
परभणी जिल्हा परिषदेअंतर्गत
सर्व शाळा इमारतींची तपासणी करून नादुरुस्त इमारतींचं काम तातडीने हाती घेऊन पूर्ण
करावे आणि तसा अहवाल मुख्यालयाला सादर करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव दीपक
कपूर यांनी दिले आहेत. जिल्हा वार्षिक योजनेसह विविध महत्त्वाच्या योजनांच्या आढावा
बैठकीत ते बोलत होते. अत्यावश्यक असलेल्या शाळा इमारत बांधकामासाठी आकस्मिक
निधी उभा करून शाळा खोल्या बांधण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
****
जागतिक काविळ दिनानिमित्त
काल जालना शहरात विविध उपक्रम राबवण्यात आले, तसंच जनजागृती फेरी काढण्यात
आली. नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी आणि काविळ प्रतिबंधक लसीकरणासाठी पुढाकार
घ्यावा, असं आवाहन यावेळी करण्यात आलं.
****
नांदेड ग्रामीण पोलीस
ठाण्यातले हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर तिडके याच्याविरुद्ध एक लाख रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅक्टर एजन्सी मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी
त्यानं ही लाच मागितली होती.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या
पैठण इथलं जायकवाडी धरण ८४ टक्क्यांपेक्षा अधिक भरलं आहे. धरणातून कोणत्याही क्षणी
पाणी सोडण्याची शक्यता असल्याने, गोदाकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक तसंच अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने नाथसागर जलाशयात १९
हजार ४३९ दशलक्ष घनफूट प्रति सेकंद वेगाने पाण्याची आवक सुरु आहे.
****
No comments:
Post a Comment