Monday, 28 July 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.07.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 28 July 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ जूलै २०२ दुपारी १.०० वा.

****

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज लोकसभेत विरोधकांच्या गोंधळामुळे प्रश्नोत्तराचा तास पुन्हा स्थगित करावा लागला. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच, विरोधी पक्ष सदस्यांनी बिहारमधल्या मतदारयाद्यांच्या पुनरिक्षणासह इतर मुद्दे उपस्थित करुन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. बिर्ला यांनी सदस्यांना कामकाज करु देण्याचं आवाहन केलं, मात्र विरोधकांनी फलक झळकावत गदारोळ सुरुच ठेवल्यानं सदनाचं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित झालं होतं.

कामकाज पुन्हा सुरु झाल्यावरही सदस्यांची घोषणाबाजी सुरुच होती. सदनात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करायची असून, सदस्यांनी आपल्या मर्यादेचं, नियमांचं पालन करावं, असं अध्यक्षांनी सांगितलं. ते म्हणाले,

बाईट - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

 

यानंतरही हा गदारोळ सुरुच होता. त्यामुळे लोकसभेचं कामकाज पुन्हा एक वाजेपर्यंत स्थगित झालं होतं.

राज्यसभेतही हेच चित्र पहायला मिळालं. कामकाज सुरु झाल्यावर उपसभापतींनी विविध मुद्यांवरुन विरोधकांनी दिलेले स्थगन प्रस्ताव फेटाळले. त्यामुळे सदनाचं कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित झालं होतं.

****

गेल्या तीन तारखेपासून सुरु झालेली अमरनाथ यात्रा आतापर्यंत ३ लाख ७७ हजार भाविकांनी पूर्ण केली आहे. श्रीनगरमधल्या दशनामी आखाडा इमारतीतील श्री अमरेश्वर मंदिरात उद्या 'नागपंचमी'ला 'छरी पूजन' केलं जाईल, तर छरी मुबारकची अंतिम यात्रा ४ ऑगस्ट रोजी पवित्र गुहेच्या दिशेने सुरू होईल.

****

पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त राज्यातल्या ज्योतिर्लिंग असलेल्या शिवमंदिरांमध्ये आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या घृष्णेश्वर, बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ आणि हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ या मंदिरांसह अनेक मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीने पूजाअर्चा, धार्मिक कार्यक्रम होत आहेत. मंदिरांना आकर्षक सजावट करण्यात आली असून, भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, वाहनतळ, दर्शन रांगेची व्यवस्था आदी सुविधाही करण्यात आल्या आहेत.

औंढा नागनाथ इथल्या मंदीरात रात्री दोन वाजता शासकीय महापूजा आणि दुग्धाभिषेक झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सपत्नीक दुग्धाअभिषेक केला.

परळी इथल्या प्रभू वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर इथंही भाविकांनी महादेव मंदिरात गर्दी केली आहे. गोदावरीचं उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेस भाविकांनी मध्यरात्रीपासून सुरुवात केली. श्रावणी सोमवारनिमित्तानं राज्य परीवहन महामंडळाने २५ ज्यादा बस नाशिकमधल्या बस स्थानकातून सोडल्या आहेत. गर्दीचं नियंत्रण आणि व्यवस्थापन करण्यासाठी नाशिक पेालीसांनी ड्रोनचा वापर केला असून, देवस्थानने अति महत्वाच्या व्यक्तींसाठी असलेली दर्शन सुविधा बंद केली आहे.

****

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची निवड झाली आहे. काल पुण्यात झालेल्या परिषदेच्या बैठकीत ही निवड बिनविरोध झाली. तर सचिवपदी विजय बर्हाटे यांची नियुक्ती करण्यात आली.

****

भंडारा जिल्ह्यात अनियमितता आढळलेल्या चार कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. जिल्हा भरारी पथकाने कृषी सेवा केंद्रांची अचानकपणे तपासणी केली असता, चार केंद्रात प्रत्यक्ष युरिया खतसाठा आणि पॉश मशीनवरील खतसाठा जुळत नसल्याचं लक्षात आल्यानं ही कारवाई करण्यात आली. तर तपासणीत दोषी आढळलेल्या ३१ कृषी केंद्रांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

****

भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत महायुती सहकार पॅनल विजयी झालं असून, तेरा उमेदवार निवडून आले आहेत. नाना पटोले यांच्या परिवर्तन शेतकरी पॅनलला दारुण पराभव पत्करावा लागला असून, त्यांचे केवळ तीन उमेदवार निवडून आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथलं सिद्धार्थ उद्यान आजपासून पर्यटकांसाठी खुलं करण्यात येत आहे. उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या डोमचा काही भाग पडून दोन महिन्यापूर्वी दोन महिलांचा मृत्यू झाला होता तेव्हापासून हे उद्यान पर्यटकांसाठी बंद करण्यात आलं होतं.

****

रायगड जिल्ह्यात खान्देरी जवळ बुडालेल्या तुळजाई बोट दुर्घटनेत बोटीवरील आठ पैकी पाच जण पोहत सासवणे किनार्‍यावर आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. तीन बेपत्ता मच्छिमारांपैकी सासवणे, किहीम आणि दिघोडे किनारी मृतदेह आढळून आले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

जॉर्जीयात बटुमी इथं सुरू असलेल्या फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीचा टायब्रेकर सामना आज भारताच्या कोनेरु हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात होणार आहे. अंतिम स्पर्धेचे पहिले दोन्ही सामने अनिर्णित राहीले.

****

हवामान

येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील, विदर्भ आणि मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

No comments: