Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 28 July 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ जूलै २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
लोकसभेत आज ऑपरेशन सिंदूरवर चर्चा
सुरु होण्याची अपेक्षा आहे. या चर्चेसाठी लोकसभेत १६ तासांचा वेळ देण्यात आला आहे.
तर राज्यसभेत उद्या यावर चर्चा होईल, असं संसदीय कामकाज मंत्री
किरेन रिजिजू यांनी सांगितलं.
****
निसार अर्थात नासा-इसरो सिंथेटिक
अपर्चर रडार उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे इसरोच्या आंतरराष्ट्रीय सहयोगात वाढ होईल, असं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह
यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते. निसारचा उपयोग केवळ
भारत आणि अमेरिकेला होणार नसून जगभरातल्या देशांना महत्त्वाचा डेटा मिळण्यासाठी याचा
उपयोग होईल, असं ते म्हणाले. आपत्ती व्यवस्थापन, शेती आणि हवामान निरीक्षण अशा क्षेत्रासाठी
हे महत्त्वाचे ठरणार आहे. ३० जुलै रोजी श्रीहरीकोटा इथून निसार मोहिमेला सुरुवात होणार
आहे.
****
बिहारमधल्या मतदार याद्यांच्या विशेष
सखोल पुनरिक्षण करण्याच्या भारत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर
सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. आगामी बिहार विधानसभा निवडणुकांच्या अगदी
तोंडावर घेतलेल्या पुनरिक्षणाच्या निर्णयामुळे मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित
राहावं लागू शकतं असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.
****
पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त राज्यातल्या
ज्योतिर्लिंग असलेल्या शिवमंदिरांमध्ये आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी
केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या
घृष्णेश्वर, बीड जिल्ह्यातल्या परळी
वैजनाथ आणि हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ या मंदिरांसह अनेक मंदिरांमध्ये पारंपरिक
पद्धतीने पूजाअर्चा, धार्मिक कार्यक्रम होत
आहेत. मंदिरांना आकर्षक सजावट करण्यात आली असून, भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, वाहनतळ, दर्शन रांगेची व्यवस्था आदी सुविधाही
करण्यात आल्या आहेत.
तर औंढा नागनाथ इथल्या मंदीरात रात्री
दोन वाजता शासकीय महापूजा आणि दुग्धाभिषेक झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात
आलं. आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
यांनी सपत्नीक दुग्धाअभिषेक केला.
परळी इथल्या प्रभू वैद्यनाथ मंदिरात
दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
****
राज्यातल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार
समित्यांचं आधुनिकीकरण आणि बळकटीकरण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून
देण्याचं शासनाचं धोरण असून, आवश्यक निधी उपलब्ध करून
देण्यासाठी शासन वचनबद्ध असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवन आणि उपाहारगृहाच्या नवीन इमारतीच्या
लोकार्पण प्रसंगी बोलत होते. कृषी उत्पन्न बाजार समित्या या शेतकरी आणि समाजाच्या मालकीच्या
संस्था असून, त्या नफ्यात कशा चालतील, याचा विचार करायला हवा, असं ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, अहिल्यानगर शहरात मार्केट यार्ड चौक
इथल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण पवार यांच्या हस्ते झालं. अहिल्यानगर शहरात
लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावेला
साजेसं असं संविधान भवन उभारलं जाईल, यासाठी जिल्हा नियोजन
निधीतून पाच कोटी रूपये आणि शासन १० कोटी रूपये निधी उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही पवार यांनी दिली.
****
भारताने ३६ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र
ऑलिंपियाड २०२५ मध्ये दोन सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं पटकावली आहेत. फिलीपिन्सच्या क्वेझोन
इथं झालेल्या या स्पर्धेत गुजरातच्या रुद्र पेठाणी आणि मुंबईच्या वेदांत सक्रेला सुवर्ण
पदक, हरियाणाच्या भाव्या गुणवाल आणि पश्चिम
बंगालच्या सुभ्रजित पॉल यांनी रौप्य पदक जिंकलं. पदकतालिकेत भारत पाचव्या स्थानावर
राहिला.
****
राज्यात ठिकठिकाणी पावसाचा जोर कायम
असून, नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे
अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूर
आलेल्या नाल्यात वाहून गेल्यानं तीन जणांचा मृत्यू झाला. काल पावसाने विश्रांती घेतली
असली तरी सात मार्गांवर वाहतूक ठप्प आहे. गोंदिया जिल्ह्यात बाघ नदीनं धोका पातळी ओलांडली
आहे.
पुणे जिल्ह्यात खडकवासला आणि पवना, सातारा जिल्ह्यातल्या कोयना, सांगली जिल्ह्यात वारणा तर सोलापूर
जिल्ह्यात उजनी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु असून नदीकाठच्या रहिवाशांना
सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाचा
चौथा दरवाजा उघडला असल्यानं गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली आहे. नांदेड महापालिकेनं नदीकाठी जीवरक्षक दल तैनात केलं आहे.
रायगडमध्ये आणखी एक बोट बुडून एका
खलाश्याचा मृत्यू झाला तर नऊ जण सुखरूप परतले. दरम्यान, खांदेरी किल्ल्याजवळ बोट बुडून झालेल्या दुर्घटनेतील बेपत्ता
तीन मच्छिमारांचा ड्रोनच्या माध्यमातून शोध सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य
महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. किनारपट्टीवर सोसाट्याचे
वारे वाहतील, विदर्भ आणि मराठवाड्यातही
बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment