Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 30 July 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जूलै २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरो
आणि अमेरिकेच्या नासा यांचा संयुक्त उपक्रम असलेला नासा - इसरो सिंथेटिक अपर्चर रडार
म्हणजे निसार या उपग्रहाचं आज सायंकाळी श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून
प्रक्षेपण होणार आहे. काल दुपारी दोन वाजेपासून त्याची उलटगणना सुरु झाली. या उपग्रहाच्या
माध्यमातून दर बारा दिवसांनी संपूर्ण पृथ्वीचं निरिक्षण करण्यात येणार असून, हवामान बदल संशोधन आणि आपत्ती प्रतिसादासाठी
उच्च प्रतीच्या प्रतिमा मिळणार आहेत. सेंटीमीटर पातळीवर अचूकतेसह पृथ्वीच्या पृष्ठभागावरील
बदलांचा मागोवा घेण्यासाठी यामध्ये नासाचे एल - बँड आणि इसरोचे एस - बँड रडार आहेत.
****
संरक्षण, संशोधन आणि विकास संस्था - डीआरडीओने
स्वदेशी बनावटीच्या 'प्रलय' क्षेपणास्त्राची काल यशस्वी चाचणी
घेतली. भारताच्या संरक्षण शक्तीला अधिक बळकट करण्यासाठी बनवलेलं 'प्रलय' हे जमिनीवरून जमिनीवर
मारा करणारं, लक्ष्यावर जलद आणि अचूकपणे
मारा करण्यास सक्षम असलेलं जलद प्रतिक्रिया देणारं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे.
****
येत्या एक ऑगस्टपासून युपीआयद्वारे
व्यवहार करण्यापूर्वी ज्यांना पैसे पाठवायचे आहे त्यांच्या बँकेचं नावंही दिसणार आहे.
त्यामुळे योग्य व्यक्तीला किंवा दुकानदाराला पैसे पाठवले जात आहेत याची खात्री होईल.
तसंच प्रत्येक व्यवहार झाल्यावर खात्यातली रक्कमही दिसणार आहे. याशिवाय अनेक नवीन अटी
लागू करण्याचा निर्णय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशननं घेतला आहे. त्यानुसार प्रलंबित असलेल्या
व्यवहारांची माहिती दिवसातून केवळ तीन वेळा पाहता येईल. याशिवाय युपीआय अॅपमधून दिवसाला
जास्तीत जास्त ५० वेळा खात्यातली रक्कम तपासता येईल. युपीआयच्या माध्यमातून ऑटो पे
चे व्यवहार यापुढे केवळ ठराविक वेळांमध्येच होतील, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
सात ऑगस्ट हा दिवस शाश्वत शेती दिन
म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या
जन्मशताब्दीनिमित्त हा उपक्रम राबवला जाणार असल्याची माहिती, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी
दिली. डॉ. स्वामिनाथन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राज्यातल्या सर्व कृषी विद्यापीठांमध्ये
डॉ. एम एस स्वामिनाथन बायो - हॅपिनेस सेंटर ची स्थापना करण्याचा निर्णय घेतल्याचंही
कोकाटे यांनी सांगितलं.
****
येत्या तीन ते १५ ऑगस्ट दरम्यान राज्यात
अवयवदान चळवळ राबववण्याचे निर्देश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. ते
काल मुंबईत याबाबतच्या राज्यस्तरीय बैठकीत बोलत होते. या चळवळीत अवयवदानाबाबत सकारात्मक
मत परिवर्तन करून याविषयीची भीती कमी करावी, तसंच येत्या १५ ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात अवयव दात्यांचा
सत्कार करण्याच्या सूचनाही त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहे.
****
मराठवाड्यात गेल्या जानेवारी ते जून
या सहा महिन्यांत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जवळपास साडे तीन हजार रुग्णांना लाभ
झाला आहे. या रुग्णांना साडे पाच कोटी रुपयांहून अधिक निधीची वैद्यकीय मदत करण्यात
आली आहे. या योजनेमुळे आरोग्य शिबिर, रक्त संकलन आदी उपक्रम
प्रभावीपणे राबवणं सहज शक्य होत असल्याचं, मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष
प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातल्या
सर्व टपाल कार्यालयांमध्ये येत्या चार ऑगस्टपासून प्रगत टपाल तंत्रज्ञान प्रणाली कार्यान्वित
होणार आहे. या प्रणालीच्या अंमलबजावणीपूर्वी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पार पाडण्यासाठी, शनिवार दोन ऑगस्ट रोजी नियोजित देखभाल कार्य केलं जाणार
असल्यानं दोन्ही जिल्ह्यातल्या कोणत्याही कार्यालयात टपाल व्यवहार सेवा उपलब्ध होणार
नाही, असं टपाल कार्यालयातर्फे कळवण्यात
आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या
सार्वजनिक गणेश, दुर्गा उत्सव मंडळांना
कायमस्वरूपी नोंदणी करण्याचं आवाहन धर्मादाय सहआयुक्त रा. स. पावसकर यांनी केलं आहे.
दरवर्षी मोठ्या संख्येने मंडळांकडून वर्गणी संकलनासाठी परवानगी मिळवण्यासाठी अर्ज येतात.
मात्र, जर मंडळांनी संस्था नोंदणी अधिनियमांतर्गत
नोंदणी केली असेल, तर त्यांना वारंवार परवानगी
घेण्याची गरज भासणार नाही, असं त्यांनी सांगितलं.
****
सैन्यात करिअर करण्यासाठी ध्येय निश्चिती, शिस्त, आत्मविश्वास, वेळेचं नियोजन, यासह इतर अनेक गोष्टी पाळण्याची गरज
असल्याचं, लेफ्टनंट कर्नल संतोष मोहिते यांनी
सांगितलं. परभणी इथं श्री शिवाजी महाविद्यालयातल्या एनसीसी विभागाच्या वतीने कारगिल
विजय दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. सैन्यामध्ये मुलींना विशेष
संधी उपलब्ध झाल्या आहेत त्याचा फायदा विद्यार्थिनींनी घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं.
****
बीड शहरातले अंकुशनगर आणि धानोरा
मार्ग हे दोन मुख्य रस्ते दुरुस्त करावे या मागणीसाठी काल नागरिकांनी लोटांगण आंदोलन
केलं. आमदार संदीप क्षीरसागर यानी आंदोलकांची भेट घेऊन, येत्या चार ऑगस्टला जिल्हाधिकार्यालयात बैठक घेऊन या रस्त्यांचा
प्रश्न मिटवण्याचं आश्वासन दिलं.
****
No comments:
Post a Comment