Regional Marathi Text Bulletin,
Chhatrapati Sambhajinagar
Date – 29 July 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ जूलै २०२५ सायंकाळी ६.१०
****
· संसदेच्या दोन्ही सदनात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू-दहशतवादाबाबत झिरो टॉलरन्स
धोरण असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन
· मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या स्थानिक
स्वराज्य संस्थांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
· स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्भय आणि पारदर्शी वातावरणात पार
पाडाव्यात-राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश
आणि
· नागपंचमीचा सण राज्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा
****
दहशतवादाबाबत आपल्या सरकारचं झिरो टॉलरन्स धोरण असल्याचं
प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. ते आज लोकसभेत ऑपरेशन
सिंदूरवरच्या चर्चेत बोलत होते. पहलगाम
दहशतवादी हल्ला,
ऑपरेशन सिंदूर तसंच काल राबवलेल्या ऑपरेशन महादेवची माहिती
शहा यांनी सदनाला दिली. युद्ध का थांबवलं, असा
प्रश्न विरोधकांनी काल विचारला होता, त्यावर बोलतांना, युद्धाचे परिणाम गंभीर असतात, असं मत शहा यांनी मांडलं.
मात्र दहशतवादाविरोधात देशाची कारवाई सुरूच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं, ते म्हणाले...
बाईट - केंद्रीय गृहमंत्री अमित
शहा
ऑपरेशन महादेव अंतर्गत काल काश्मीरमध्ये मारले गेलेले तीन
दहशतवादी,
सुलेमान, अफगाण आणि जिब्रान, हे लष्कर ए तैयबाचे अ श्रेणीचे कमांडर असून पहलगाम हल्ल्यात सामील असल्याचे
ठोस पुरावे तपास यंत्रणांकडे असल्याचं शहा यांनी सांगितलं.
बाईट - केंद्रीय गृहमंत्री अमित
शहा
लोकसभेत आज या चर्चेत द्रमुकच्या कनिमोळी तसंच ए राजा, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव तसंच डिंपल यादव, काँग्रेसच्या
प्रियंका गांधी वाड्रा तसंच के सी वेणुगोपाल, शिवसेनेचे
डॉ श्रीकांत शिंदे. भाजपचे निशिकांत दुबे, तृणमूल
काँग्रेसच्या सयानी घोष, मुस्लीम लीगचे मोहम्मद बशीर, शिरोमणी अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल, यांनी
सहभाग घेतला.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यावेळी बोलतांना, युद्ध थांबवण्याच्या सरकारच्या निर्णयावर टीका केली. ते म्हणाले...
बाईट - विरोधी पक्षनेते राहुल
गांधी
****
राज्यसभेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन
सिंदूरविषयी चर्चेला सुरुवात केली. ऑपरेशन सिंदूर ही कारवाई विस्तारासाठी नसून
स्वसंरक्षणासाठी होती, असं राजनाथ सिंह म्हणाले. मल्लिकार्जुन
खरगे यांनी चर्चेत सहभाग घेत, अमेरिकेच्या
राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या पाच जेट पाडल्याच्या विधानाबाबत संसदेत स्पष्ट खुलासा
करण्याचं आवाहन केलं. पाकिस्तानची अवस्था वाईट असतांनाही युद्धविरामावर सहमती का
झाली,
याबाबतही सरकारने स्पष्टीकरण देण्याची मागणी विरोधी
पक्षनेत्यांनी केली. तृणमूल काँग्रेसच्या सागरिका घोष, द्रमुकचे
तिरुची शिवा,
आदींनी या चर्चेत सहभाग घेतला.
****
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू होऊन आज पाच वर्ष झाली.
यानिमित्त नवी दिल्लीत अखिल भारतीय शिक्षण संमेलन हा कार्यक्रम घेण्यात आला. नव्या
शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण व्यवस्थेत परिवर्तन झाल्याचं केंद्रीय शिक्षणमंत्री
धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी नमूद केलं.
दरम्यान, देशभरातील २८ नवनिर्मित
शाळांचं प्रधान यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आलं.
वाशिम इथल्या पी एम श्री केन्द्रीय विद्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटनही प्रधान
यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवून
उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि
जिल्हा परिषदांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने
घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत
हा निर्णय घेण्यात आला. या अंतर्गत एकंदर १ हजार ९०२ पुरस्कार देण्यात येणार आहेत.
ग्रामीण भागातल्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या
उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद अभियानांतर्गत १०
जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली.
ई-नाम योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय नामांकित
बाजारतळ स्थापन करण्यासाठी कृषी उत्पन्न पणन विकास आणि विनियमन अधिनियम, १९६३मध्ये सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
फिडे महिला बुद्धिबळ विजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुख
हिच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.
****
राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये प्रतिबंधात्मक उपाय
म्हणून महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम राबवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांनी दिले आहेत.
मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. महिलांमध्ये
स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग याविषयी जागृती
वाढावी आणि उपचारापेक्षा प्रतिबंध यावर भर देण्यासाठी ही तपासणी मोहिम घेण्याचे
निर्देश त्यांनी दिले.
****
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन आज साजरा होत आहे. वाघांचा
नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवणं, वाघांच्या संवर्धनासाठी
जगभरात होत असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा देणं आणि याबाबत जनजागृती करण्यासाठी
दरवर्षी २९ जुलै हा दिवस व्याघ्रदिन साजरा केला जातो. राज्यात मेळघाट
व्याघ्रप्रकल्पातल्या वाघांची संख्या १५० वर गेली आहे. यात २५ नर, ४७ माद्या,
२ वर्षांपर्यंत वय असलेले ७८ बछडे आणि २७ तरुण वाघांचा
समावेश आहे.
****
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्भय
आणि पारदर्शी वातावरणात पार पाडाव्यात असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश
वाघमारे यांनी दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात
विभागातील आठ जिल्ह्यांमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाघमारे यांनी आढावा बैठक
घेतली त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्यासह सर्व
जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यावेळी उपस्थित होते. या निवडणुकांमध्ये एक जुलै २०२५
पर्यंतची मतदार यादी अंतिम ग्राह्य धरली जाणार असून याप्रमाणे मतदान केंद्राची
संख्या उपलब्ध करून देण्यात यावी अशा सूचना त्यांनी दिल्या. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील मतदारांची संख्या, मतदान
केंद्रांची संख्या, उपलब्ध मनुष्यबळ आणि मतदान केंद्रावरील
सेवा सुविधा याबाबतची तालुकानिहाय माहिती
दिली.
****
नागपंचमीचा सण आज राज्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात
साजरा होत आहे. श्रावण शुक्ल पंचमीला हा सण साजरा केला जातो. वारुळांची पूजा, सर्पमित्रांकडून जनजागृती, आणि सापांविषयीच्या
गैरसमजांवर प्रबोधन हे या सणाचं वैशिष्ट्य आहे.
****
राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरियाअंतर्गत मृद आरोग्य
आणि सुपीकता कार्यक्रम २०२५-२६ मध्ये
नांदेड जिल्ह्यात १५ ग्रामस्तरीय मृद नमुने तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्यास
मान्यता मिळाली आहे. प्रयोगशाळेसाठी शेतकरी उत्पादक कंपन्या आणि ईच्छूकांनी ८
ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत, असं आवाहन जिल्हा कृषी
अधिक्षक अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
****
परभणी जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांनी आज
आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भाजपा
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी वरपुडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं स्वागत
केलं. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, परभणीच्या
पालकमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर, आदी मान्यवर उपस्थित
होते.
****
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा
जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष
हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे. आपल्या वैयक्तिक
अडचणींमुळे आपण राजीनामा देत असल्याचं याबाबतच्या पत्रात नमूद आहे. गोरंट्याल हे
लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दरम्यान, आज जालना दौऱ्यावर आलेले प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी याबाबत बोलताना, भाजपकडे सक्षम नेतृत्व नसल्याने कॉँग्रेसच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना ब्लॅकमेल करून, आमीष दाखवून भाजपात घेतले
जात असल्याची टीका केली.
****
सोलापूर जिल्ह्यात उजनी,वीरा
धरणं भरल्याने धरणांमधून
पाणी सोडण्यात आलं. वीर धरणातून नीरा नदीमध्ये सकाळपासून विसर्ग सुरु झाला आहे. नीरेचे पाणी संगम इथून भीमा नदीत येते त्यामुळे भीमा नदीकाठी पूरपरिस्थिती
निर्माण झाली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील शिरपूर धरणाचे पाच पैकी तीन दरवाजे आज
उघडण्यात आले. बाघ नदी काठच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथलं जायकवाडी धरण
सुमारे ८९ टक्के भरलं आहे. धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडण्याची शक्यता
असल्याने,
गोदाकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक तसंच अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने नाथसागर जलाशयात
२३ हजार २७३ दशलक्ष घनफूट प्रति सेकंद वेगाने पाण्याची आवक सुरु आहे.
****
No comments:
Post a Comment