Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 26 July 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ जूलै २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
आज २६ वा कारगिल विजय दिवस आहे, या औचित्यानं राष्ट्रपती द्रौपदी
मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल युद्धातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली.
हा दिवस देशाच्या सैनिकांच्या असाधारण शौर्य, धैर्य आणि दृढनिश्चयाचे प्रतीक असून राष्ट्रासाठी त्यांचे
समर्पण आणि सर्वोच्च बलिदान नागरिकांना कायम प्रेरणा देत राहील, असं राष्ट्रपती यांनी म्हटलं आहे
तर कारगिल विजय दिवस शूर सुपुत्रांच्या अतुलनीय धैर्याची आणि पराक्रमाची आठवण करून
देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राष्ट्राभिमान आणि मातृभुमीच्या
रक्षणासाठी त्यांचं बलिदान प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील असं पंतप्रधान आपल्या
संदेशात म्हणाले.
****
जम्मूच्या भगवतीनगर आधार शिबीरातून
आज दोन हजार ३०० हून अधिक भाविक अमरनाथ यात्रेसाठी मार्गस्थ झाले. यात एक हजार ८००
पुरुष, ३७७ महिला, सहा बालक, ४६ साधू आणि पाच साध्वींचा समावेश
आहे. यापैकी ७४१ भाविक बालटाल इथं तर एक हजार ५८३ भाविक पहलगाम इथल्या आधार शिबीराकडे
मार्गक्रमण करणार आहेत.
****
पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांविरुद्ध भारताचं लष्करी
अभियान 'ऑपरेशन सिंदूर' सुरूच असल्याचं तिन्ही सैन्यदलाचे
प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी स्पष्ट केलं आहे.
नवी दिल्लीतील ‘एअरोस्पेस पॉवर-भारताच्या
सार्वभौमत्वाचे संरक्षण आणि राष्ट्रीय हितसंबंधांची पूर्तता’ या विषयावर आयोजित परिषदेत
काल ते बोलत होते. पाकिस्तानच्या बाजूने
होणाऱ्या कोणत्याही आगळीकीला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य २४ तास सज्ज असल्याचंही
त्यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यातील धोकादायक शाळा इमारतींचं सर्वेक्षण करून शाळांमध्ये आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यास
प्राधान्य द्यावं, अशा सूचना शालेय शिक्षण
राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी काल दिल्या.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेच्या अनुषंगानं राज्यातील शाळा इमारत सुरक्षिततेसंदर्भात
घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार
जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिक क्षेत्रातील शाळा इमारतींचं
स्ट्रक्चरल ऑडिटही करावं आणि याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी
यांच्याकडे सादर करावा. धोकादायक शाळा इमारतींच्या बांधकामासाठी प्राधान्यक्रम ठरवून
जिल्हा नियोजन समितीमधून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी
यावेळी सांगितलं.
****
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी
अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांची नोकरी योग्यता आणि करिअर
सजगता वाढवण्यासाठी, विद्यापीठाच्या ई-समर्थ
पोर्टलवर ‘प्लेसमेंट आणि ट्रेनिंग’ हे नवीन मॉड्यूल सुरू करण्यात आलं आहे. या उपक्रमाच्या
माध्यमातून मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये नोंदणीकृत असलेले विद्यार्थी
आता या पोर्टलद्वारे इंटर्नशिप आणि नोकरीच्या संधी सहज शोधू शकतील. तसंच औद्योगिक आस्थापनाही
या पोर्टलवर नोंदणी करून त्यांना लागणाऱ्या मनुष्यबळाची गरज नोंदवू शकतील.
****
पंचावन्नाव्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड
स्पर्धेत भारताच्या पाच सदस्यीय संघानं संघानं तीन सुवर्ण आणि दोन रौप्यपदकं पटकावली.
पुण्याचा कनिष्क जैन, जबलपूरचा स्नेहिल झा
आणि इंदोरचा रिद्धेश बेंडाळे यांनी सुवर्ण, तर सूरतचा आगम शहा आणि कोटा इथला रजित गुप्ता यांनी रौप्य
पदक मिळवलं. पॅरिस इथं झालेल्या या स्पर्धेत भारतानं पदकतालिकेत पाचवा क्रमांक मिळवला
आहे.
****
रायगड जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार
पावसामुळे नद्यांना महापूर आले असून कुंडलिका आणि सावित्री या नद्यांनी आज सकाळी इशारा
पातळी ओलांडली आहे. गाढी, उल्हास, आंबा, पाताळगंगा या नद्याही दुथडी भरून वाहत असल्याने नागरिकांना
सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे
चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत आणि सध्या ५ हजार ७१२ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग
सुरू आहे, तर वीज निर्मितीसाठी पंधराशे क्यूसेक्स
असा ७ हजार २१२ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू झाला आहे. भोगावती आणि पंचगंगा
नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून पंचगंगेच्या पाणी पातळीत
चोवीस तासांत सहा फुटांनी वाढ झाली आहे.
****
तेंडुलकर - अँडरसन कसोटी क्रिकेट
मालिकेतल्या चौथ्या सामन्यात काल तिसऱ्या दिवशी यजमान इंग्लंडनं पहिल्या डावात भारतावर
१८६ धावांची आघाडी घेतली आहे. कालचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात
७ गडी गमावत ५४४ धावा केल्या होत्या. त्याआधी गुरुवारी भारतानं आपल्या पहिल्या डावात
सर्वबाद ३५८ धावा केल्या. पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघ १-२ अशा गुणफरकानं
मागे आहे.
****
No comments:
Post a Comment