Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 25 April 2019
Time 20.00 to 20.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ एप्रिल २०१९ - २०.००
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या
टप्प्यासाठीच्या प्रचाराचे आता दोनच दिवस शिल्लक आहेत, शनिवारी सायंकाळी या टप्प्यातला
प्रचार थांबणार आहे, त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांचे नेते आपापल्या उमेदवारांच्या
प्रचारार्थ, जाहीर सभा, प्रचार फेऱ्या, घेत आहेत.
निवडणुकीच्या या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या 17, उत्तर
प्रदेश आणि राजस्थानमधल्या प्रत्येकी 13, पश्चिम बंगालमधल्या आठ, ओडिशा आणि मध्य प्रदेशातल्या
सहा, बिहारमधल्या पाच, झारखंडमधल्या तीन मतदारसंघात, तसंच जम्मू-काश्मीरमधल्या अनंतनाग
लोकसभा मतदारसंघातल्या कुलगाम जिल्ह्यातल्या सर्व मतदार केंद्रांवर सोमवारी मतदान होणार
आहे.
महाराष्ट्रातल्या सतरा लोकसभा मतदार संघांमध्ये मुंबईतल्या
सर्व मतदार संघांसह, ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, धुळे, नंदुरबार, नाशिक, दिंडोरी,
शिर्डी, मावळ, शिरूर या मतदार संघांचा समावेश आहे.
दरम्यान ओडिशातल्या आठ आणि
नागालँड, तसंच उत्तरप्रदेशातल्या प्रत्येकी एका मतदान केंद्रावर आज फेरमतदान घेण्यात
आलं.
****
भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमध्ये दरभंगा इथं प्रचार सभा घेतली
देशातील दहशतवाद समूळ नष्ट
करणं आवश्यक आहे, कारण त्यामुळे सुरक्षेवर होणारा खर्च गरिबांच्या कल्याणासाठी उपयोगात
आणता येईल, असं सांगतानाच, पंतप्रधानांनी, दहशतवादी तसंच त्यांना मदत करणाऱ्यांना त्यांच्या
घरात घुसून संपवलं जाईल, असा इशारा यावेळी दिला.
मोदी यावेळी पुन्हा वाराणसी
मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. आज त्यांनी वाराणसीत रोड शो केला, सायंकाळी त्यांच्या
हस्ते गंगाआरती करण्यात आली. मोदी उद्या वाराणसीतून उमेदवारी अर्ज भरणार आहेत
***
काँग्रेस पक्ष सत्तेवर आला
तर एका वर्षात २२ लाख लोकांना सरकारी नोकऱ्या दिल्या जातील अशी ग्वाही पक्षाचे अध्यक्ष
राहुल गांधी यांनी दिली आहे. ते आज अजमेर इथं प्रचार सभेत बोलत होते. नोटबंदी आणि वस्तू
सेवा करामुळे गरीब, कामगार तसंच छोट्या व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान
झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच काँग्रेसचे अध्यक्ष
राहुल गांधी उद्या राज्यात प्रचारसभा घेणार आहेत. मोदी यांची सभा मुंबईत वांद्रे कुर्ला
संकुलावर होणार आहे, तर राहुल गांधी यांची सभा शिर्डी लोकसभा मतदार संघात, अहमदनगर
जिल्ह्यातल्या संगमनेर इथं होणार आहे.
****
कॉंग्रेस सरकार जेव्हा सत्तेवर
होतं तेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा किताब दिला नसल्याची टीका बहुजन
समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी
केली आहे. समाजवादी पक्षाचे
अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासमवेत उत्तर प्रदेशात एका जाहीर सभेत त्या बोलत होत्या.
भारतीय जनता पक्षाच्या कामांवर नाराजी व्यक्त करत सत्तेवर असणाऱ्या भाजपा सरकारनं
कोणतंच आश्वासन पूर्ण केलं नसल्याचं त्या यावेळी म्हणाल्या.
***
वंचित बहुजन आघाडीचे नेते विधीज्ञ प्रकाश आंबेडकर
यांनी आज शिर्डी मतदार संघातले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय सुखदान यांच्या प्रचारासाठी
कोपरगाव इथं सभा घेतली. विमुद्रीकरणामुळे देशातल्या काळ्या अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन
मिळत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला.
****
महाराष्ट्र विधान सभेतले विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील
यांनी आज विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी
त्यांचा राजीनामा स्वीकारल्याचं वृत्त आहे. त्यासोबतच अहमदनगर इथली काँग्रेस कमिटीही
बरखास्त करण्यात आली आहे. विखेपाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी भाजपत प्रवेश करून,
भाजप शिवसेना महायुतीकडून अहमदनगर लोकसभा निवडणूक लढवली. सुजय यांना भाजपनं उमेदवारी
जाहीर केल्यापासूनच विखे पाटील यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती.
****
ईव्हीएम यंत्रांबरोबर व्हीव्हीपॅट पावत्यांची पडताळणी करण्याबाबत
न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा फेरआढावा घेण्याची मागणी विरोधी पक्षांच्या २१ नेत्यांनी
सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. किमान ५० टक्के व्हीव्हीपॅट पावत्यांची मोजणी केली
जावी अशी विनंती या नेत्यांनी पुन्हा एकदा केली आहे. न्यायालयानं याआधी यासंदर्भातली
याचिका फेटाळली होती, आणि या निवडणुकीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या किमान पाच
केंद्रांवर ईव्हीएम बरोबर व्हीव्हीपॅट पावत्यांची पडताळणी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला
दिले होते. मात्र, पाच मतदान केंद्रांतल्या मतदान पावत्यांची पडताळणी पुरेशी नसल्याचं
सांगत, या आदेशाचा फेरआढावा घेण्याची मागणी या नेत्यांनी केली आहे.
****
No comments:
Post a Comment