आकाशवाणी
औरंगाबाद
मराठी बातमीपत्र
२६ एप्रिल २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
लोकसभा
निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठीच्या प्रचाराचे आता दोनच दिवस शिल्लक आहेत, उद्या संध्याकाळी
या टप्प्यातला प्रचार थांबणार आहे, त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांचे नेते आपापल्या
उमेदवारांच्या प्रचारार्थ, जाहीर सभा, प्रचार फेऱ्या, घेत आहेत.
निवडणुकीच्या या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या १७,
उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधल्या प्रत्येकी १३, पश्चिम बंगालमधल्या आठ, ओडिशा आणि मध्य
प्रदेशातल्या सहा, बिहारमधल्या पाच, झारखंडमधल्या तीन मतदारसंघात, तसंच जम्मू-काश्मीरमधल्या
अनंतनाग लोकसभा मतदारसंघातल्या कुलगाम जिल्ह्यातल्या सर्व मतदान केंद्रांवर सोमवारी
मतदान होणार आहे.
महाराष्ट्रातल्या सतरा लोकसभा मतदार
संघांमध्ये मुंबईतल्या सर्व मतदार संघांसह, ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, धुळे, नंदुरबार,
नाशिक, दिंडोरी, शिर्डी, मावळ, शिरूर या मतदार संघांचा समावेश आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी
तसंच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज राज्यात प्रचारसभा घेणार आहेत. मोदी यांची
सभा मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलावर होणार आहे, तर राहुल गांधी यांची सभा शिर्डी लोकसभा
मतदार संघात, अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर इथं होणार आहे.
देशात पहिल्यांदाच सरकारच्या बाजूने नागरिकांचा कौल दिसत
असल्याचं, भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज वाराणसी मतदार
संघातून उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. आपण एक
चांगलं सरकार देण्यासाठी प्रामाणिकपणे काम केल्याचं मोदी म्हणाले. पक्ष कार्यकर्ते
हेच खरे उमेदवार असल्याचंही मोदी यांनी यावेळी नमूद केलं.
दरम्यान, वाराणसी मतदार संघातून काँग्रेस पक्षानं अजय
राय यांची उमेदवारी घोषित केली आहे. या जागेसाठी उमेदवार म्हणून प्रियंका गांधी यांचं
नाव चर्चेत होतं. आता वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजय राय यांच्यात सरळ
लढत होईल.
****
लोकांना भीती दाखवून त्यांच्यावर राज्य गाजवता येतं, असं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटत असावं, मात्र लोक भयमुक्त वातावरणातल्या देशासाठी
मतदान करतील, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे, ते आज नवी
दिल्लीत बोलत होते. काँग्रेस पक्ष देशाला सुरक्षा देऊ शकत नाही, या भाजप अध्यक्ष अमित
शहा यांच्या वक्तव्यावर टीका करताना चिदंबरम यांनी, १९४७, १९६५ आणि १९७१ साली झालेल्या
लढायांमध्ये देश सुरक्षित कोणी ठेवला, असा प्रश्न विचारला.
****
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. १२ मे रोजी मतदान होत असलेल्या याटप्प्यात
सात राज्यातल्या ५९ मतदार संघात निवडणूक होत आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरित्रपटाला आव्हान देणाऱ्या
याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. निवडणुक आयोगानं २२ एप्रिल ला
आपला अहवाल बंद पाकिटात न्यायालयात सादर केला होता. निवडणूक
आयोगानं निवडणुकीच्या काळात या चित्रपटाचं प्रदर्शन करण्यावर बंदी घातली आहे. या बंदी
आदेशाला चित्रपटाच्या निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.
*****
नोटा बंदीच्या काळात भारतीय जनता पक्षानं जो लाभ करून
घेतला, तोच पैसा भाजप आज निवडणुकीत वापरत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पनवेल इथल्या जाहीर सभेत बोलताना केला. परस्परांवर प्रखर
टीका करणारे भाजप आणि शिवसेना पक्ष युती कशी काय करू शकतात असा प्रश्नही त्यांनी यावेळी
उपस्थित केला. पैसा आणि सत्तेसाठीच ही युती झाल्याचा आरोप त्यांनी केला.
****
केंद्रीय तपास यंत्रणा एनआयए नं पाकिस्तानातली दहशतवादी संघटना जैश-ए- मोहम्मदच्या दोन दहशतवाध्यानां काल
अटक केली. भारतात दहशतवादी
कारवाया करण्यासाठी तरुणांची भरती करण्याचं काम जैश-ए- मोहम्मदचा तनवीर अहमद गनी आणि
बिलाल अहमद मीर हे दोन दहशतवादी करत असल्याचं केंद्रीय तपास यंत्रणेनं सांगितलं.
*****
आयपीएल क्रिकेट सामन्यात गुणतालीकेत आघाडीवर असलेल्या
चेन्नई सुपर किंग्ज या संघाचा सामना तिसऱ्या
क्रमांकावर असलेल्या मुबंई ईंडीयन्स सोबत होणार आहे. हा सामना चेन्नई इथं आज रात्री
आठ वाजता सुरु होणार आहे.
//*************//
No comments:
Post a Comment