Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 April 2019
Time 20.00 to 20.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६
एप्रिल २०१९ - २०.००
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातला प्रचार उद्या
सायंकाळी थांबणार आहे. प्रचाराला अवघा एकच दिवस राहिला असल्यानं, विविध राजकीय पक्षांच्या
जाहीर सभा, रोड शो आणि पदयात्रांमार्फतचा प्रचार शीगेला पोहोचला आहे. या चौथ्या टप्प्यात
महाराष्ट्रातल्या १७, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधल्या प्रत्येकी १३, पश्चिम बंगालमधल्या
आठ, ओडिशा आणि मध्य प्रदेशातल्या सहा, बिहारमधल्या पाच, झारखंडमधल्या तीन, तसंच जम्मू-काश्मीरमधल्या
अनंतनाग मतदारसंघातल्या कुलगाम जिल्ह्यातल्या सर्व मतदान केंद्रांवर येत्या सोमवारी
२९ तारखेला मतदान होत आहे.
चौथ्या टप्प्यात राज्यातल्या सतरा लोकसभा मतदार
संघात मुंबईतल्या सहा जागांसह, ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, धुळे, नंदुरबार, नाशिक,
दिंडोरी, शिर्डी, मावळ आणि शिरुर या मतदार संघांचा समावेश आहे.
****
या सर्वच मतदार संघात प्रचार सभा आणि प्रचार फेऱ्यांनी
राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज धुळ्यात, भाजप
शिवसेना महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. केंद्र
सरकारच्या थेट लाभ हस्तांतरण योजनेमुळे दलालांची फळी उध्वस्त झाली असून, गरीबीवर थेट
प्रहार केल्याचं, ते म्हणाले. गरीबी हटवण्याच्या आश्वासनावरून मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस
अध्यक्ष राहुल गांधी आणि आतापर्यंतच्या काँग्रेस सरकारांवर टीका केली.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातले भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या
प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांनी आज शिर्डीतही सभा घेतली. काँग्रेसच्या साठ वर्षांच्या
कार्यकाळाची आणि भाजपच्या पाच वर्षाच्या कामकाजाची तुलना होऊ शकत नाही असं मुख्यमंत्री
म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र
मोदी तसंच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज राज्यात प्रचारसभा घेत आहेत. मोदी यांची
मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलावर, तर राहुल गांधी यांची शिर्डी लोकसभा मतदार संघात,
अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर इथं सभा होत आहे.
****
भाजपचे वाराणसी मतदार संघातले उमेदवार पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी जनतेला, मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन करणं, हे त्यांचं
नैराश्य आणि पराभवाच्या भीतीचं लक्षण आहे, असं काँग्रेस पक्षानं म्हटलं आहे. मोदी यांनी
काल वाराणसी इथं, गंगा आरती केल्यानंतर नागरिकांशी संवाद साधताना, हे आवाहन केलं होतं.
पुढची पाच वर्ष परिणामांची असतील, या मोदी यांच्या विधानावरही काँग्रेसनं टीका केली.
पाच वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात मोदींना काहीही करता आलं नसल्याचं हे द्योतक
असल्याचं, पक्षाचे प्रवक्ते राजीव शुक्ला यांनी म्हटलं आहे.
****
वाराणसी मतदार संघातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय,
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचा स्वत:चा निर्णय असल्याचं, काँग्रेसचे ज्येष्ठ
नेते सॅम पित्रोदा यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज जयपूर इथं, पत्रकारांशी बोलत होते.
पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी हा निर्णय पूर्णत: प्रियंका यांच्यावर सोपवला होता.
मात्र सध्या प्रियंका यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या असल्याने, त्यांनी निवडणुकीत न उतरण्याचा
निर्णय घेतल्याचं, पित्रोदा यांनी सांगितलं. या मतदार संघातले भाजप आणि मित्रपक्षांचे
उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या विरोधात, काँग्रेसनं गेल्यावेळचे उमेदवार अजय राय यांनाच
उमेदवारी दिली आहे.
दरम्यान, मोदी यांनी आज वाराणसी मतदार संघातून उमेदवारी
अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षांचे नेते शिरोमणी अकाली
दलाचे प्रकाशसिंह बादल, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, लोक जनशक्ती पक्षाचे रामविलास
पासवान, संयुक्त जनता दलाचे नीतीशकुमार, अपना दलच्या अनुप्रिया पटेल, यांच्यासह भाजप
नेत्या सुषमा स्वराज, नीतीन गडकरी, राजनाथसिंह आणि पक्षाध्यक्ष अमित शहा उपस्थित होते.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरित्रपटावर निवडणूक
आयोगानं घातलेली बंदी हटवण्यास, सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. निवडणूक आयोगाच्या
या बंदी आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. निवडणूक
आयोगाच्या या निर्णयात हस्तक्षेप करण्यास न्यायालयानं नकार दिला. आयोगानं, सातव्या
आणि अखेरच्या टप्प्यातली मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, म्हणजे येत्या १९ मे पर्यंत
हा चित्रपट प्रदर्शित करण्यास बंदी घातली आहे.
****
भारतीय जनता पक्षाला केंद्रात सत्तास्थापनेपासून
रोखण्याऐवजी, दोन हजार २२ मध्ये उत्तर प्रदेशात राज्य सरकार स्थापन करण्यात, काँग्रेस
पक्षाला, अधिक रस दिसत असल्याचं, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्हटलं
आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी, लोकसभा निवडणुकीनंतर, उत्तरप्रदेश हे आपलं
लक्ष्य असेल, अशा आशयाचं विधान केलं होतं, त्या पार्श्वभूमीवर अखिलेश बोलत असल्याचं,
पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. भाजपकडे पंतप्रधान पदासाठी फक्त एकच चेहरा आहे, मात्र
आपल्याकडे अनेक पर्याय असल्याची प्रतिक्रिया नोंदवताना, अखिलेश यांनी, मोदी यांच्यावर काळा पैसा, बेरोजगारी,
आदी मुद्यांवरून टीका केली.
****
No comments:
Post a Comment