Friday, 26 April 2019

Text - AIR NEWS BULLETIN AURANGABAD 26.04.2019 7.10


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 April 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६  एप्रिल २०१ सकाळी ७.१० मि.

****

·       राधाकृष्ण विखेपाटील यांचा विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा काँग्रेस पक्षानं स्वीकारला

·       लोकसभा निवडणुकीच्या राज्यातल्या १७ मतदारसंघातला प्रचार उद्या संपणार

·       औरंगाबाद जिल्ह्यातट्रक आणि मोटारीच्या अपघातात तीन जण ठार तर तीन जण जखमी

आणि

·       अशियाई बँडमिंटन स्पर्धेत भारताच्या साईना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू महिला एकेरीच्या उपात्यंपूर्व फेरीत दाखल

****

महाराष्ट्र विधान सभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी दिलेला विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्विकारला आहे. मात्र त्यांनी पक्ष सोडला नसल्याचं काँग्रेस पक्षानं स्पष्ट केलं आहे. विखेपाटील यांचे पुत्र डॉक्टर सुजय विखे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून, भाजप शिवसेना महायुतीकडून अहमदनगर लोकसभा निवडणूक लढवली. सुजय यांना भाजपनं उमेदवारी जाहीर केल्यापासूनच विखे पाटील यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती.

अहमदनगर जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष करण ससाणे यांनीही राजीनामा दिला आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघातल्या काँग्रेसच्या उमेदवारानं केलेल्या वादग्रस्त विधानानंतर ससाणे यांनी राजीनामा दिल्याचं जिल्हा काँग्रेस समितीच्यावतीनं सांगण्यात आलं. दरम्यान, पक्षानं जिल्हा काँग्रेस समिती बरखास्त केली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठीच्या प्रचाराचे आता दोनच दिवस शिल्लक आहेत, उद्या संध्याकाळी या टप्प्यातला प्रचार थांबणार आहे, त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांचे नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ, जाहीर सभा, प्रचार फेऱ्या, घेत आहेत.

निवडणुकीच्या या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या १७, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधल्या प्रत्येकी १३, पश्चिम बंगालमधल्या आठ, ओडिशा आणि मध्य प्रदेशातल्या सहा, बिहारमधल्या पाच, झारखंडमधल्या तीन मतदारसंघात, तसंच जम्मू-काश्मीरमधल्या अनंतनाग लोकसभा मतदारसंघातल्या कुलगाम जिल्ह्यातल्या सर्व मतदार केंद्रांवर सोमवारी मतदान होणार आहे.



महाराष्ट्रातल्या सतरा लोकसभा मतदार संघांमध्ये मुंबईतल्या सर्व मतदार संघांसह, ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, धुळे, नंदुरबार, नाशिक, दिंडोरी, शिर्डी, मावळ, शिरूर या मतदार संघांचा समावेश आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज राज्यात प्रचारसभा घेणार आहेत. मोदी यांची सभा मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलावर होणार आहे, तर राहुल गांधी यांची सभा शिर्डी लोकसभा मतदार संघात, अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर इथं होणार आहे.

****

वंचित बहुजन आघाडीचे नेते विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी काल शिर्डी मतदार संघातले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय सुखदान यांच्या प्रचारासाठी कोपरगाव इथं सभा घेतली. विमुद्रीकरणामुळे देशातल्या काळ्या अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला. 

****

नोटा बंदीच्या काळात भारतीय जनता पक्षानं जो लाभ करून घेतला, तोच पैसा भाजप आज निवडणुकीत वापरत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पनवेल इथल्या जाहीर सभेत बोलताना केला. परस्परांवर प्रखर टीका करणारे भाजप आणि शिवसेना पक्ष युती कशी काय करू शकतात असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. पैसा आणि सत्तेसाठीच ही युती झाल्याचा आरोप त्यांनी केला.

****

भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बिहारमध्ये दरभंगा इथं प्रचार सभा घेतली. देशातला दहशतवाद समूळ नष्ट करणं आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यामुळे सुरक्षेवर होणारा खर्च गरिबांच्या कल्याणासाठी उपयोगात आणता येईल, असं ते म्हणाले.

****

काँग्रेस पक्ष सत्तेवर आला तर एका वर्षात २२ लाख लोकांना सरकारी नोकऱ्या दिल्या जातील, या आश्वासनाचा पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुनरूच्चार केला आहे. काल अजमेर इथं प्रचार सभेत ते बोलत होते. नोटबंदी आणि वस्तू सेवा करामुळे गरीब, कामगार तसंच छोट्या व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

****

कॉंग्रेस सरकार जेव्हा सत्तेवर होतं तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा किताब दिला नसल्याची टीका बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी केली आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासमवेत उत्तर प्रदेशात एका जाहीर सभेत त्या बोलत होत्या. भारतीय जनता पक्षाच्या कामांवर नाराजी व्यक्त करत सत्तेवर असणाऱ्या भाजपा सरकारनं कोणतंच आश्वासन पूर्ण केलं नसल्याचं त्या यावेळी म्हणाल्या.

****

उत्तर प्रदेशातल्या वाराणसी मतदार संघातून काँग्रेस पक्षानं अजय राय यांची उमेदवारी घोषित केली आहे. या जागेसाठी उमेदवार म्हणून प्रियंका गांधी यांचं नाव चर्चेत होतं. आता वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजय राय यांच्यात सरळ लढत होईल.

दरम्यान, मोदी यांनी काल वाराणसीत रोड शो केला, सायंकाळी त्यांच्या हस्ते गंगा आरती करण्यात आली. आज ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

****

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. १२ मे रोजी मतदान होत असलेल्या याटप्प्यात सात राज्यातल्या ५९ मतदार संघात निवडणूक होत आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.

****

विदर्भ आणि मराठवाड्यातल्या औद्योगिक ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यासाठी महावितरण कटीबध्द असल्याची ग्वाही महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिली आहे. संजीव कुमार यांनी, काल दूरदृष्य संवाद प्रणाली - व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे औद्योगिक ग्राहकांसोबत थेट संवाद साधला. दर्जेदार आणि अखंडित वीजपुरवठा मिळावा, यासाठी देखभाल आणि दुरुस्तीची कामं अधिक नियोजनबध्दपणे सातत्यानं करावीत. असे निर्देशही संजीव कुमार यांनी दिले. मराठवाड्यासह धुळे आणि विदर्भातल्या ग्राहक प्रतिनिधींनी या संवादात सहभाग नोंदवला.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातील शिवराई गावाजवळ ट्रक आणि मोटारीच्या झालेल्या अपघातात मोटारीमधील तीन जण ठार तर अन्य तिघे जखमी झाले आहेत. हा अपघात काल सकाळी घडला. ट्रकवर विरूद्ध बाजूने येणारी भरधाव मोटार धडकल्यानं हा अपघात झाला. जखमींवर औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय अर्थात घाटीत उपचार सुरू आहेत.

****

परभणी जिल्ह्यातल्या सावखेडा इथल्या महाराष्ट्र शेतकरी शुगर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित देशमुख यांचा अटकपूर्व जामीन नांदेडच्या अतिरिक्त सत्र न्यायालयानं फेटाळला आहे. महाराष्ट्र शेतकरी शुगर कारखान्याने २४० शेतकऱ्यांचे जवळपास दोन कोटी पाच लाख २५ हजार रूपये थकवल्याचा आरोप आहे. यासंदर्भात कारखान्याचे अध्यक्ष देशमुख आणि इतरांविरूद्ध फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.

****

औरंगाबाद महानगरपालिकेतील नऊ प्रभाग समित्यांच्या सभापतीपदासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया काल पार पडली. नऊ पैकी सहा प्रभागांसाठी प्रत्येकी एकाच नगरसेवकानं अर्ज दाखल केल्यामुळं या प्रभागातल्या सभापतींची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

दरम्यान, औरंगाबाद महापालिकेची आज सर्वसाधारण सभा होत असून यात एप्रिलअखेर निवृत्त होणाऱ्या स्थायी समितीतल्या आठ सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे.

****

चीनमधल्या बुहान इथं होत असलेल्या अशियाई बँडमिंटन स्पर्धेत भारताच्या ऑलिंपिक पदक विजेत्या साईना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी महिला एकेरीतून उपात्यंपूर्व फेरी गाठली आहे. यात सायनाची जपानच्या अकेन यामा गुमाशी तर सिंधूची चीनच्या यानयानशी लढत होईल.

****

नवी दिल्ली इथं होत असलेल्या आशियायी कुस्ती स्पर्धेत काल भारताच्या दिव्या काकरन आणि मंजू कुमारी यांनी कास्यपदक पटकावलं. दिव्या काकरन हिनं ६८ किलो गटात मंगोलियाच्या बॅटसेलसेलला पराभूत केलं तर मंजू कुमारीनं ५९ किलो गटात व्हिएतनामच्या थी ह्योंग दाओ हिचा पराभव करत कास्यपदक पटकावलं.

****

चित्रपट निर्माते - दिग्दर्शक सुभाष घई यांच्याविरूद्ध प्रतिलिपी अधिकार - कॉपी राईट कायद्यातर्गंत दाखल करण्यात आलेली तक्रार औरंगाबादच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयानं रद्द केली आहे. घई यांनी आपली कथा चोरून हा चित्रपट बनवल्याचा आरोप  करत मुश्ताक मोसीन मुबारक हुसैन सिद्दीकी यांनी ही तक्रार न्यायालयात दाखल केली होती. प्रतिलिपी अधिकार कायद्यानुसार या कथेची कुठेही नोंद न आढळल्यानं घई यांच्याविरूद्धचा हा आरोप रद्द करण्यात आला.

****

औरंगाबाद जिल्ह्यातले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी केल्यानंतर आता त्यांचे पुत्र अब्दुल समीर यांनी देखील काँग्रेस युवा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. अब्दुल समीर हे सध्या सिल्लोडचे उपनगराध्यक्ष आहे.

****

हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यामधल्या माळधावंडा इथल्या अलका टारफे या नववधूचा काल उष्माघातानं मृत्यू झाला. गेल्या २२ एप्रिलला विवाह झाल्यानंतर देवदर्शनासाठी गेले असता अलका हिला उन्हाचा तडाखा बसला, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

****

जिल्ह्यात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही यादृष्टीनं प्रत्येकानं जबाबदारीपूर्वक काम करण्याचं आवाहन लातूरचे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरिप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. २०१९-२० वर्षाच्या खरीप हंगामासाठी एक लाख क्विंटल बियाणे, तर ७७ हजार मेट्रीक टन खताची मागणी कृषी विभागाकडे नोंदवण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

****

भारतीय जनता पक्षाचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष आणि निलंगा नगर पालिकेचे नगरसेवक अशोक बाहेती यांच काल निलंगा इथं निधन झालं. ते ५८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर निलंगा इथं आज सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

***

नांदेड रेल्वे स्थानकावर काल राबवण्यात आलेल्या तिकिट तपासणी मोहिमेत २९६  अनधिकृत प्रवासी पकडण्यात आले. त्यांच्याकडून १ लाख १६ हजार ७२५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
***********






























No comments: