Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 April 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २६ एप्रिल २०१९ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरित्रपटावर निवडणूक आयोगानं घातलेली बंदी हटवण्यास,
सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या बंदी आदेशाला आव्हान देणाऱ्या
याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. निवडणूक आयोगाच्या या निर्णयात हस्तक्षेप
करण्यास न्यायालयानं नकार दिला. आयोगानं, सातव्या टप्प्यातली मतदान प्रक्रिया पूर्ण
होईपर्यंत, म्हणजे येत्या १९ मे पर्यंत हा चित्रपट प्रदर्शित करण्यास बंदी घातली आहे.
ही याचिका निवडणूक आयोगाच्या आदेशाला आव्हान देणारी असल्याचं सांगतानाच, या चरित्रपटातून
मनोरंजन होणार नसल्याचं, सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं स्पष्ट
केलं. त्यामुळे निवडणूक आयोगानं घेतलेला निर्णय कायम ठेवला असल्याचं न्यायालयानं सांगितलं.
****
भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात वाराणसी मतदार संघातून
उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षांचे नेते शिरोमणी
अकाली दलाचे प्रकाशसिंह बादल, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, लोक जनशक्ती पक्षाचे
रामविलास पासवान, संयुक्त जनता दलाचे नीतीशकुमार, अपना दलच्या अनुप्रिया पटेल, यांच्यासह
भाजप नेत्या सुषमा स्वराज, नीतीन गडकरी, राजनाथसिंह आणि पक्षाध्यक्ष अमित शहा उपस्थित
होते.
दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधताना, मोदी
यांनी, देशात पहिल्यांदाच सरकारच्या बाजूने नागरिकांचा कौल दिसत असल्याचं, म्हटलं आहे.
आपण एक चांगलं सरकार देण्यासाठी प्रामाणिकपणे काम केल्याचं मोदी म्हणाले. पक्ष कार्यकर्ते
हेच खरे उमेदवार असल्याचंही मोदी यांनी यावेळी नमूद केलं.
दरम्यान, वाराणसी मतदार संघातून काँग्रेस पक्षानं अजय राय यांची उमेदवारी घोषित
केली आहे. या जागेसाठी उमेदवार म्हणून प्रियंका गांधी यांचं नाव चर्चेत होतं. आता वाराणसीमधून
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजय राय यांच्यात सरळ लढत होईल.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी
आज राज्यात प्रचारसभा घेणार आहेत. मोदी यांची सभा मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलावर होणार
आहे, तर राहुल गांधी यांची सभा शिर्डी लोकसभा मतदार संघात, अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर
इथं होणार आहे.
****
माहिती अधिकार कायद्यांतर्गत बँक तपासणी अहवालातली माहिती जाहीर करण्याचे निर्देश
सर्वोच्च न्यायालयानं रिजर्व्ह बँकेला दिले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते एस सी अग्रवाल
यांनी दाखल केलेल्या एका याचिकेवर, न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालच्या
पीठासमोर आज झालेल्या सुनावणीत, न्यायालयानं, बँकेला माहिती प्रसिद्ध करण्यासंदर्भातल्या
धोरणाचा आढावा घेण्याचे निर्देश देताना, माहिती देणं हे कायद्यानुसार आपलं कर्तव्य
असल्याचं नमूद केलं. पारदर्शकता कायद्यातल्या नियमांचं पालन करण्याची रिजर्व्ह बँकेला
ही अखेरची संधी असून, यापुढे याचं उल्लंघन झाल्यास, त्यावर गांभीर्यानं विचार केला
जाईल, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यातही न्यायालयानं बँकेला
माहिती जाहीर न केल्याबद्दल नोटीस बजावली होती.
****
काँग्रेस पक्षाला, भारतीय जनता पक्षाला केंद्रात सत्तास्थापनेपासून रोखण्याऐवजी,
दोन हजार २२ मध्ये उत्तर प्रदेशात राज्य सरकार स्थापन करण्यात अधिक रस दिसत असल्याचं,
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी
यांनी, लोकसभा निवडणुकीनंतर, उत्तरप्रदेश हे आपलं लक्ष्य असेल, अशा आशयाचं विधान केलं
होतं, त्या पार्श्वभूमीवर अखिलेश बोलत असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. भाजपकडे
पंतप्रधान पदासाठी फक्त एकच चेहरा आहे, मात्र आपल्याकडे अनेक पर्याय असल्याची प्रतिक्रिया
नोंदवताना, अखिलेश यांनी, मोदी यांच्यावर काळा पैसा, बेरोजगारी, आदी मुद्यांवरून टीका
केली.
****
औरंगाबाद इथल्या
ओंकार विद्यालयाच्या वतीनं उद्या “जाणून घेऊया सूत्र शाळा निवडण्याचे” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. शहरातल्या
भानुदास चव्हाण सभागृहात सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
प्रसिध्द
शिक्षण तज्ज्ञ, भाषा सल्लागार समितीचे सदस्य अनिल गोरे या व्याख्यानातून पालकांना, पाल्यासाठी शाळेत प्रवेश
घेतांना कोणत्या निकषांवर शाळेची निवड करावी, या विषयावर मार्गदर्शन करतील.
//************//
No comments:
Post a Comment