Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29
April 2019
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ एप्रिल २०१९ सायंकाळी ६.००
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातली मतदान प्रक्रिया आज
पूर्ण झाली. देशभरात आज नऊ राज्यातल्या ७२ जागांवर मतदान झालं. दुपारी चार वाजेपर्यंत
देशभरातल्या ७२ मतदार संघात सरासरी ४९ पूर्णांक ५ दशांश टक्के मतदान झालं. महाराष्ट्रात
आज सतरा मतदारसंघात मतदान घेण्यात आलं, राज्यातल्या सर्व ४८ मतदार संघातली मतदान प्रक्रिया
आज पूर्ण झाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत पालघर मतदार संघात ५७ टक्के तर नंदूरबार मतदार
संघात ६१ टक्के, तर धुळे मतदार संघात ५० टक्के मतदान झालं.
मुंबईत आज मतदारांमध्ये मतदानाचा
मोठा उत्साह दिसून आला. मुंबई दक्षिण-मध्य मतदार संघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५०
टक्के तर मुंबई -दक्षिण मतदार संघात ४७ टक्के, मतदान झालं. मुंबई उत्तर -पश्चिम मतदार
संघात दुपारी तीन वाजेपर्यंत ४० टक्के, मुंबई
उत्तर -पूर्व ४३ टक्के, मुंबई पूर्व -मध्य सुमारे ४० तर उत्तर -मुंबई मतदार संघात ४४
पूर्णांक ६५ शतांश टक्के मतदान झालं.
दिंडोरी ४६ टक्के, नाशिक सुमारे ४२, भिंवडी ३९, कल्याण सुमारे ३४ टक्के
, ठाणे ३८ टक्के, मावळ ४२ टक्के, शिरुर ४१
टक्के, तर शिर्डी मतदार संघात दुपारी तीन वाजेपर्यंत ४५ पूर्णांक ४८ दशांश टक्के मतदान
झाल्याची नोंद आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या
टप्प्यात अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता, आज अखेरच्या दिवशी भारतीय जनता पक्षाकडून
अभिनेता सन्नी देओल यांनी पंजाबातल्या गुरदासपूर मतदार संघातून तर अभिनेता शत्रुघ्न
सिन्हा यांनी काँग्रेस पक्षाकडून बिहारमधल्या पाटणा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल
केला.
****
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात
राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा गेल्या पाच वर्षांचा कार्यकाळ हा देशातल्या जनतेसाठी
एक आपत्ती ठरला असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पी चिदंबरम यांनी केली आहे.
ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. या निवडणुकीनंतर येणारं सरकार हे बिगर भाजप
सरकार असेल. निवडणूकीनंतरच्या आघाड्यांचा विचार करता, संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार
तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याची शक्यता असल्याचं, चिदंबरम यांनी म्हटल्याचं, पीटीआयचं
वृत्त आहे.
****
तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार
आपल्या संपर्कात असून, निवडणूक निकालानंतर हे सर्व भाजपात प्रवेश करणार असल्याचं, भाजपचे
ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज पश्चिम बंगालमध्ये श्रीरामपूर
इथं बोलत होते. मूठभर जागांच्या बळावर दिल्लीत पोहोचता येत नसून, दिदींसाठी दिल्ली
अजून खूप दूर असल्याचं मोदी म्हणाले.
****
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी
यांनी आज सर्वोच्च न्यायालयात, आज नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करून, राफेल विमान खरेदी
प्रकरणी न्यायालयाच्या विधानाचा विपर्यास केल्याबाबत पुन्हा एकदा खेद व्यक्त केला.
भाजपाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर, न्यायालयानं २३
एप्रिल रोजी राहुल गांधी यांना नोटीस बजावली होती.
****
लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात
आलमला इथं, तीन जणांचा आडात गुदमरून मृत्यू झाला. एका अरुंद आडातला गाळ काढण्यासाठी
आडात एकामागोमाग उतरलेले हे तिघेही एकाच कुटुंबातले असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे. या तिघांना वाचवण्यासाठी आडात उतरलेले अन्य चार जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर
रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयातल्या
नगर विकास विभागानं, नगर परिषद आणि नगर पंचायतींद्वारे आकारण्यात येणाऱ्या विविध करशुल्कात
मोठी वाढ केली आहे. ही वाढ तात्काळ रद्द करावी, अशी मागणी नगरसेवक संजय मेश्राम यांनी
केली आहे. १ मे २०१९ पासून नवीन कर लागू करण्यास नगर पालिका प्रशासन विभागानं सर्व
मुख्य अधिकाऱ्यांना सांगितलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात आजही
४७ अंश सेल्सियस तापमान होतं. त्यामुळे दुपारच्यावेळी बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला.
नांदेड जिल्ह्यात मात्र
आज ढगाळ वातावरण होतं, कंधार भागात पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment