आकाशवाणी औरंगाबाद
मराठी बातमीपत्र
२८ एप्रिल २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या ब्रिटिश
लष्करी अधिकारी कॅप्टन जॉन स्मिथ यांनी केलेल्या पुनर्शोधाला आज २०० वर्षे पूर्ण होत
आहेत. यानिमित्त भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण तर्फे अजिंठा इथं विशेष कार्यक्रमाचं
आयोजन करण्यात आलं आहे. लेणीच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या पर्यटक स्वागत कक्षाचं
उद्घाटन विभागाचे प्रादेशिक संचालक डॉ. एम. नंबिराजन यांच्या हस्ते होत आहे. तसंच युनेस्कोनं
जाहीर केलेल्या एशिया पॅसिफिक प्रदेशातील सर्व जागतिक
वारसा स्थळांच्या छायाचित्रांचं प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे. यावेळी अजिंठा लेणीच्या
संवर्धन कार्यातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या, दहाव्या क्रमांकाच्या लेणीतील तीन खांबांच्या संवर्धनाच्या कामाचा प्रारंभही आजच्या दिवसाचं औचित्य साधून होणार असल्याचं पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक डॉ. दिलीप
कुमार खमारी यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.
****
अजिंठा लेणीच्या पुनर्शोधाच्या दिवसानिमित्त, तसंच
नुकतंच निधन झालेले प्रख्यात अजिंठा चित्रकार मारोतीराव पिंपरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी
औरंगाबाद शहरात अजिंठा चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. काल्डा कॉर्नर इथल्या
मालती आर्ट गॅलरीत इतिहासतज्ज्ञ डॉ. दुलारी कुरेशी आणि रफत कुरेशी यांच्या हस्ते आज
सकाळी या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. हे प्रदर्शन सात मे पर्यंत चालणार आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड-सोयगाव मार्गावरील
हळद्याच्या प्राचीन घाटात उभ्या असलेल्या वेताळवाडीच्या किल्ल्यावरील तोफेला सह्याद्री
प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी दणकट सागवानी तोफगाडा
बसवला आहे. आज सकाळी जैन इरिगेशनचे अशोक जैन यांच्यासह राज्यभरातून आलेल्या शेकडो किल्लेप्रेमींच्या
उपस्थितीत ही तोफ नव्या गाड्यावर स्थापित करण्यात
आली. या तोफगाड्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानच्या कन्नड, चाळीसगावच्या किल्लेप्रेमींनी
परिश्रम घेतल्याचं, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांनी आकाशवाणीशी बोलताना
सांगितलं.
****
औरंगाबाद शहरातल्या महात्मा गांधी मिशनच्या एपीजे
अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्रातर्फे येत्या ६ मे रोजी रात्री कुंभ राशीतील
उल्का वर्षाव पाहण्यासाठी खास आकाशदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात आकाशातील
तारे-नक्षत्रांची ओळख करून दिली जाणार असून, खगोलप्रेमींनी सहभागी होण्याचं आवाहन केंद्र
संचालक श्रीनिवास औंधकर यांनी केलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित तीन टप्प्यांच्या प्रचाराला
वेग आला आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते देशभरात प्रचार फेऱ्यांत सहभागी होत आहेत.
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आज बिहार इथं
सीतागढी आणि सारण, तसंच उत्तर प्रदेशातल्या बाराबंकी आणि मोहनलालगंज इथं नागरिकांना
संबोधित करणार आहेत.
काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या
बहराइच इथं आज प्रचार फेरी आणि धौराहरा इथं रोड शोमध्ये सामील होणार आहेत.
बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती आज राजस्थानच्या
अलवर आणि भरतपूर इथं प्रचार फेरीला संबोधित करणार आहेत.
****
समग्र
विकासाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी
जिल्ह्यावर आधारित विकास आराखडे तयार करण्याचं काम सुरु असल्याचं केंद्रीय वाणिज्य, उद्योग आणि नागरी उड्डयन मंत्री सुरेश प्रभु यांनी म्हटलं आहे. कलकत्ता
इथं एका समारोहात ते बोलत होते. या आराखड्यांनुसार देशातल्या विविध भागातल्या
सहा जिल्ह्यांची
निवड केली जाईल. तसंच सरकारनं
एक नवीन औद्योगिक धोरण तयार केल्याचंही प्रभू
यांनी यावेळी सांगितलं.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत राजस्थान रॉयल्सनं सनराइजर्सचा
सात गडी राखून पराभव केला आहे. जयपूर इथं झालेल्या या सामन्यातल्या विजयामुळे राजस्थानचा
संघ १२ सामन्यांत दहा गुण प्राप्त करुन सहाव्या स्थानावर पोहचला आहे.
आज दिल्ली कॅपिटलचा
सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली इथं, तर कोलकाता नाईट राइडर्सचा सामना
मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता इथं होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment