Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 April 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ एप्रिल २०१९ सायंकाळी ६.००
****
इंडोनेशिया मध्ये प्रथमच एकत्रितरित्या घेण्यात आलेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या
आणि सार्वत्रिक संसदीय निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणीच्या धामधुमीत अतिश्रमामुळे तब्बल
२७२ निवडणूक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज समोर आली आहे. इंडोनेशियाच्या
निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आरेफ प्रियो सुसांतो यांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बल आठ
लाख मतपत्रिका तपासणीच्या कामाचा भार सहन न झाल्याने हे मृत्यू झाले. यात २७२ जणांचे
प्राण तर गेलेच, पण १८७८ निवडणूक कर्मचारी आजारीही पडले आहेत. निवडणूक खर्चात कपात
करण्यासाठी या दोन्ही निवडणुका एकत्रितरित्या घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
दक्षिण-पूर्व
बंगाल आणि आसपासच्या हिंद महासागरात तयार झालेल्या फनी या चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याची
भीती व्यक्त केली जात आहे. सध्या हे वादळ उत्तर-पश्चिम दिशेने फिरत आहे. मंगळवारपर्यंत
उत्तर-पश्चिम दिशेने आणि त्यानंतर ते उत्तरपूर्व दिशेने फिरेल, असा अंदाज हवामान विभागानं
व्यक्त केला आहे. सध्याच्या उष्ण हवामानामुळे उद्यापर्यंत वादळ अधिक तीव्र होण्यास
अनुकूल स्थिती आहे. समुद्र खवळलेला असल्यानं मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, अशी सूचना
हवामान विभागानं दिली आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वतरांगेतील वन परिक्षेत्रात निमखेडी बिटच्या
जंगलात पेटलेल्या वणव्यात अमूल्य वनसंपदा जळून खाक झाली. या जंगलात सागवान, धावडा,
सलाई, अंजनाच्या शेकडो झाडांचं नुकसान झालं आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी वन विभागाचे
प्रयत्न सुरू आहेत.
****
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यात उद्या नाशिक, अहमदनगर, धुळे,
नंदुरबार मतदारसंघांत मतदान होणार आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे ग्रामीण, धुळे
शहर, शिंदखेडा, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
एक हजार ९४० मतदान केंद्रांवर एकूण १९ लाख चार हजार ८५९ मतदार मतदानाचा हक्क बजावतील,
अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.
****
नंदुरबार १८ लाख ७१ हजार मतदार मतदानाचा
हक्क बजावणार असून, यासाठी दोन हजार १५० केंद्रे आहेत. यात सात ठिकाणी सखी मतदान केंद्रे
तयार करण्यात आली आहेत. यातील विविध तालुक्यांतल्या दहा टक्के मतदार केंद्रांची थेट
वेब कास्टिंग केली जाणार असल्याचं आमच्या वार्ताहारानं कळवलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या नाशिक
आणि दिंडोरी मतदार संघांसाठी आज मतदान केंद्रांसाठी कर्मचारी आणि साहित्य रवाना झाले
आहे. दोन्ही मतदार संघात चार हजार ७२० मतदान केंद्रे आहेत. या निवडणुकीसाठी २४ हजार
७२३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात या निवडणुकीसाठी २० उमेदवार रिंगणात आहेत. शिर्डी लोकसभा
मतदारसंघातील एक हजार ७१० मतदान केंद्रावर १५ लाख ८४ हजार ३०३ मतदार मतदान प्रक्रियेत
भाग घेणार आहेत. प्रत्येक मतदाराने मुक्त आणि निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे
आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी, अप्पर जिल्हाधिकारी
तथा निवडणुक निर्णय अधिकारी पी.एल. सोरमारे यांनी केले आहे.
****
तापमानात
अकोला शहराचा देशात आज प्रथम क्रमांक लागला आहे. अकोल्यात ४७ पूर्णांक २ अंश सेल्सिअस
तापमानाची नोंद झाली आहे. औरंगाबाद शहरात कमाल ४४, तर किमान २७ अंश सेल्सिअस तापमान
राहिलं.
***
बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यातल्या
घळाटवाडी इथं आज, ११ व्या शिवार साहित्य संमेलनाची सुरूवात मृदंगाचार्य भरत महाराज
पठाडे यांच्या हस्ते ग्रंथपूजन करून झाली. यावेळी काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीमध्ये
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या कलशधारी मुली, लेझीम पथक, हलगी पथक, ढोल पथक, भजनी
मंडळी सहभागी झाले होते. या ग्रंथदिंडीत संमेलनाध्यक्ष प्रा. रामप्रसाद तौर, स्वागताध्यक्ष
ज्ञानेश्वर चौधरी यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
No comments:
Post a Comment