Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 April 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २७ एप्रिल २०१९ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातला प्रचार आज संध्याकाळी संपेल. नऊ
राज्यांमधल्या एकूण एक्काहत्तर मतदारसंघांमधे येत्या सोमवारी मतदान होणार आहे. त्यामुळे
सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे नेते आजच्या शेवटच्या दिवशी मतदारांपर्यंत पोहचण्याचा
प्रयत्न करत आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तरप्रदेशात
कनौज इथं जाहीर सभा घेतली. ते आज उत्तर प्रदेशातल्या हरदोई, आणि सीतापूरमधेही प्रचार
सभा घेणार आहेत.
भाजप अध्यक्ष अमित
शहा यांनी आज झारखंडमधे पलामू इथं सभा घेतली. ते ओडिशात मयूरभंज आणि जयपूर इथंही सभा
घेणार आहेत.
काँग्रेस अध्यक्ष
राहुल गांधी आज उत्तरप्रदेशात अमेठी आणि रायबरेलीमधे तर काँग्रेस महासचिव प्रियंका
गांधी उन्नाव आणि बाराबंकीमधे प्रचार करणार आहेत.
तर बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती देखील
मध्यप्रदेशामधल्या रेवा इथं प्रचारसभा घेणार आहेत.
राज्यातही आज मोठ्या
संख्येनं प्रचार सभा होत आहेत.
****
दरम्यान, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक इथे जाहीर सभा घेतली. निवडणूक आता निर्णायक टप्प्यावर
आली असून, राष्ट्रवादी आणि मनसे यांनी आधीच मैदान सोडलं आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी
यावेळी केली. देशाच्या सेनेवर राज ठाकरे प्रश्न उभे करतात, खोट्या पुराव्याच्या आधारे
ते आरोप करत आहेत, असं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं. नाशिक महापालिकेला आपल्या सरकारनं
निधी दिला, असं सांगत, युतीनं नाशिकमध्ये केलेल्या कामांचं श्रेय मात्र राज ठाकरे घेण्याचा प्रयत्न करत आहेत,
असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं.
****
उत्तर प्रदेशमध्ये
२०१०-११ या वर्षात, एकवीस सरकारी साखर कारखान्यांची विक्री करताना झालेल्या कथित आर्थिक
घोटाळ्या संदर्भात केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयनं गुन्हे दाखल केले आहे. या काळात
बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती या मुख्यमंत्री पदावर होत्या. भारताच्या नियंत्रक
आणि महालेखा परिक्षक अर्थात कॅगच्या अहवालानुसार, या घोटाळ्यामुळे सरकारचं एक हजार
एकशे एकोणऐंशी कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. हे कारखाने अतिशय कमी किंमतीत विकले
गेल्याचं सीबीआयनं या प्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. मागच्या वर्षी भाजपच्या
योगी आदित्यनाथ सरकारनं या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी करत, अधिसूचना
जारी केली होती.
****
बंगालच्या उपसागरात
एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं असून, आज संध्याकाळी पर्यंत त्याची तीव्रता वाढून
त्याचं चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. सध्या हे
क्षेत्र चेन्नईच्या आग्नेय दिशेला तेराशे चाळीस किलोमीटर अंतरावर असून,तीव्र चक्रीवादळाच्या
रूपात ते येत्या मंगळवारी तामिळनाडूच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता हवामान खात्यानं
वर्तवली आहे.
****
सरकारी विमान सेवा
कंपनी एअर इंडियाची विमानसेवा आज पहाटे पासून
सकाळी सुमारे नऊ वाजेपर्यंत बंद झाली होती. एअर इंडियाला उड्डाणांच्या नियोजनाची
सेवा देणाऱ्या सीता या कंपनीचं सर्व्हर बंद झाल्यानं आज सुमारे सहा तास उड्डाणं बंद
होती. या अडचणीमुळे एअर इंडियाच्या विमानांच्या उड्डाणांवर आज दिवसभर परिणाम होणार
असून, एअर इंडियाची विमानसेवेला दिवसभर सुमारे दोन तास उशिर होण्याची शक्यता आहे. मात्र,
आंतरराष्ट्रीय उड्डाणांना काही समस्या नसल्याची माहिती एअर इंडियाचे अध्यक्ष अश्वनी लोहानी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी, प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल लोहानी यांनी दिलगिरी व्यक्त केली.
****
भारतातून आर्थिक
घोटाळा करून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या न्यायालयीन कोठडीत ब्रिटनच्या
एका न्यायालयानं येत्या चोवीस मेपर्यंत वाढ केली आहे. नीरव मोदीच्या हस्तांतरणासाठी
भारतानं दाखल केलेल्या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान काल न्यायालयानं हा निर्णय दिला
आहे. नीरव मोदी याला मागच्या महिन्यात लंडन मध्ये अटक करण्यात आल्यापासून तो ब्रिटनच्या
कारागृहात आहे. त्याच्या हस्तांतरणाबाबत आता चोवीस मेनंतरच सुनावणी होईल.
****
येत्या खरीप हंगामासाठी बुलडाणा जिल्ह्यात एक हजार
सातशे त्र्याहत्तर कोटी रुपये, इतकं पीक कर्ज वितरण करण्याचं लक्ष्य ठरवण्यात आलं आहे.
मागच्या वर्षीच्या तुलनेत हे पीक कर्ज एकोणतीस कोटी रुपयांनी वाढवण्यात आलं आहे.
जिल्हा सहकारी बँकेची स्थिती सक्षम नसल्यानं कर्ज
वाटपाची जबाबदारी मुख्यत्वे राष्ट्रीयीकृत बँकांवरच अवलंबून राहणार असल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment