Saturday, 27 April 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 27.04.2019....News at 20.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 April 2019

Time 20.00 to 20.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ एप्रिल २०१९ - २०.००

****

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातला प्रचार आज संपला. निवडणुकीच्या या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या १७, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधल्या प्रत्येकी १३, पश्चिम बंगालमधल्या आठ, ओडिशा आणि मध्य प्रदेशातल्या सहा, बिहारमधल्या पाच, झारखंडमधल्या तीन मतदारसंघात, तसंच जम्मू-काश्मीरमधल्या अनंतनाग लोकसभा मतदारसंघातल्या कुलगाम जिल्ह्यातल्या सर्व मतदार केंद्रांवर सोमवारी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातल्या १७ मतदार संघांमध्ये मुंबईतल्या सहा मतदार संघांसह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, धुळे, नंदूरबार, नाशिक, दिंडोरी, शिर्डी, मावळ आणि शिरुर या मतदार संघांचा समावेश आहे. सोमवारी या मतदार संघांमध्ये मतदान झाल्यावर, राज्यातल्या सर्व ४८ मतदार संघातली मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे. देशात मात्र सहा मे, बारा मे आणि १९ मे, अशा आणखी तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.

निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी देशभरात प्रचार सभा घेतल्या.

भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधल्या कन्नौज आणि हरदोई इथे प्रचार सभा घेतली. जनतेचा पैसा लुटता यावा, यासाठी विरोधी पक्षांच्या संधीसाधू एकजुटीला एक दुर्बल सरकार हवं आहे, अशा शब्दात त्यांनी महाआघाडीवर टीका केली. देशाला अतिरेक्यांकडून धोका आहे, मात्र विरोधी पक्षांकडे त्या धोक्यासाठी कोणतीही योजना नाही, असंही पंतप्रधान म्हणाले.

****

चौकीदारानं रायबरेली आणि अमेठीच्या उद्योगांची आणि रोजगारांची चोरी केली, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. ते आज रायबरेलीमध्ये एका प्रचार सभेत बोलत होते. काँग्रेस पक्ष जनतेचा लुटला गेलेला पैसा जनतेला परत मिळवून देईल, असंही गांधी म्हणाले.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रवादाच्या नावावर मतांचा जोगवा मागत आहेत, मात्र देशाचा प्रत्येक नागरिक वेळ आली तर देशासाठी बलिदान देण्याकरता सज्ज असल्यामुळे जनतेला मोदी आणि फडणवीस यांनी राष्ट्रवाद शिकवण्याची गरज नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. ते आज डोंबिवली इथल्या प्रचार सभेत बोलत होते.

****

विरोधकांनी मोदींना हवा तेवढा विरोध करावा, पण देशाच्या सैनिकांनी पाकिस्तानविरोधात दाखवलेल्या शौर्याविषयी शंका घेऊ नये, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथे प्रचार सभेत बोलत होते. युतीनं नाशिकमध्ये केलेल्या कामांचं श्रेय राज ठाकरे घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं.

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार पूनम महाजन यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत प्रचार फेरी काढली. लोकशाहीचा उत्सव साजरा करा, अशा शब्दांत त्यांनी मतदान करण्याचं आवाहन मतदारांना केलं. विक्रमी निकालासह देशात पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार बनेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदींना नोटबंदी करण्याचा अधिकार कोणी दिला, असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे नेते विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते आज भिवंडी इथं प्रचार सभेत बोलत होते. यावेळी मंचावर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी, आमदार वारीस पठाण यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 

****

लोकसभा निवडणुकीनंतर आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहोत, असं काँग्रेस नेते आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज लोणी इथं वार्ताहरांशी बोलत होते. अहमदनगरची जागा काँग्रेससाठी सोडावी, अशी मागणी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्याकडे केली, त्यावेळी पक्षनेतृत्व खंबीरपणे पाठीशी उभं राहिलं नसल्याची खंत विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

****

भाजप नेते प्रचारसभांमधे आचारसंहितेचा भंग करत असून सैन्य दलाचे राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी केला आहे. याबाबत कॉंग्रेस पक्षानं केलेल्या असंख्य तक्रारींची निवडणूक आयोगानं दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला. जर त्यांच्या तक्रारींचं निवारण झाले नाही तर निवडणूक आयोगाविरुद्ध कायदेशीर कारवाई करणारा असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

****

मुंबईत आज कामोठा भागात मतदारांना पैसे वाटप करतांना एका इसमाला पकडण्यात आलं. हा इसम शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता असल्याचं समोर आलं असून, तो मतदारांना प्रत्येकी चारशे रुपये वाटत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकाराबाबत माहिती मिळाल्यावर भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या इसमाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं, त्याच्या ताब्यातून २० हजार रुपये जप्त करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

जळगाव लोकसभा मतदार संघातल्या भडगाव इथल्या एका मतदान केंद्रावर सोमवारी फेरमतदान होणार आहे. इथं गेल्या मंगळवारी २३ तारखेला मतदान झालं होतं, मात्र मतदान केंद्रावरच्या कर्मचाऱ्यांनी चाचणी मतदान काढून न टाकताच, मतदान सुरू केल्यानं, इथलं मतदान रद्द करण्यात आलं.

****

No comments: