Monday, 29 April 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.04.2019 20.00




Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 April 2019

Time 20.00 to 20.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ एप्रिल २०१९ - २०.००

****

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातली मतदान प्रक्रिया आज पूर्ण झाली. देशभरात आज नऊ राज्यातल्या ७२ जागांवर मतदान झालं. यामध्ये महाराष्ट्रातल्या मुंबई मधल्या सहा मतदार संघांसह ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, धुळे, नंदुरबार, नाशिक, दिंडोरी, शिर्डी, मावळ आणि शिरूर या १७ लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे.

भाजप नेत्या पूनम महाजन, शिवसेनेचे अरविंद सावंत, काँग्रेसचे मिलिंद देवरा, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, हीना गावित, समीर भुजबळ, पार्थ पवार यांच्यासह राज्यातल्या १७ मतदार संघातल्या एकूण ३२३ उमेदवारांचं राजकीय भवितव्य आज मतदार यंत्रात बंद झालं.



या सर्व मतदार संघात दिग्गजांनी आज सकाळीसच आपापल्या मतदान केंद्रावर जावून मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव अश्वनी कुमार, ज्येष्ठ अणू शास्त्रज्ञ तसंच निवडणूक आयोगाचे ब्रँड एम्बेसेडर डॉ अनिल काकोडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप नेत्या पूनम महाजन, विनोद तावडे, धुळे मतदार संघातले उमेदवार केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, तसंच अपक्ष उमेदवार अनिल गोटे, माजी मंत्री तथा नवापूर चे आमदार सुरुपसिंग नाईक, नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, ज्येष्ठ उद्योजक अनिल अंबानी, यांनी सकाळच्या सत्रात मतदान केलं.



ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले, प्रसिद्ध गीतकार गुलजार, जावेद अख्तर, अभिनेत्री शबाना आझमी, अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन तसंच ऐश्वर्या रॉय, रेखा, माधुरी दीक्षित, सोनाली बेंद्रे, आमीर खान, माधवन, शाहरुख खान, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, टेनिसपटू महेश भूपती, यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

****



लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता, आज अखेरच्या दिवशी भारतीय जनता पक्षाकडून अभिनेता सन्नी देओल यांनी पंजाबातल्या गुरदासपूर मतदार संघातून तर अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेस पक्षाकडून बिहारमधल्या पाटणा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

****

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा गेल्या पाच वर्षांचा कार्यकाळ हा देशातल्या जनतेसाठी एक आपत्ती ठरला असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पी चिदंबरम यांनी केली आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. या निवडणुकीनंतर येणारं सरकार हे बिगर भाजप सरकार असेल. निवडणुकीनंतरच्या आघाड्यांचा विचार करता, संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याची शक्यता, चिदंबरम यांनी वर्तवल्याचं, पीटीआयचं वृत्त आहे.

****

तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार आपल्या संपर्कात असून, निवडणूक निकालानंतर हे सर्व भाजपात प्रवेश करणार असल्याचं, भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज पश्चिम बंगालमध्ये श्रीरामपूर इथं बोलत होते. मूठभर जागांच्या बळावर दिल्लीत पोहोचता येत नसून, दिदींसाठी दिल्ली अजून खूप दूर असल्याचं मोदी म्हणाले.

****

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सर्वोच्च न्यायालयात, आज नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करून, राफेल विमान खरेदी प्रकरणी न्यायालयाच्या विधानाचा विपर्यास केल्याबाबत पुन्हा एकदा खेद व्यक्त केला. भाजपाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर, न्यायालयानं २३ एप्रिल रोजी राहुल गांधी यांना नोटीस बजावली होती.

****

पालघर इथं बहुजन विकास आघाडीच्या ६७ कार्यकर्त्यांना, शिवसेनेच्या आमदाराला मारहाण प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये वसई विरार महापालिकेचे महापौर रूपेश जाधव यांचाही समावेश आहे. पालघरचे शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावीत यांच्या कार्यालयाबाहेर आज पहाटे एका चारचाकी वाहनातून निवडणूक विभागाच्या पथकाने ६४ हजार पाचशे रुपयांची रोकड पकडली, यासंदर्भातल्या चौकशी दरम्यान, शिवसेनेचे आमदार रवींद्र पाठक त्यांच्या समर्थकांसह तिथे आढळून आले. महापौर जाधव आणि त्यांच्या समर्थकांनी इथे येऊन, पाठक यांना मारहाण केली, त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

****

No comments: