Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 30 April 2019
Time 7.10 AM to
7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० एप्रिल २०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø लोकसभा निवडणुकीच्या
चौथ्या टप्प्यात सरासरी ६४ टक्के मतदान; राज्यात १७ लोकसभा मतदारसंघात सरासरी ५७ टक्के मतदान झाल्याचा
अंदाज
Ø पुण्यातल्या जर्मन
बेकरी बॉम्ब स्फोटप्रकरणी मुख्य आरोपी यासीन भटकळविरोधात आरोप निश्चित
Ø हिंद महासागरातल्या फानी चक्रीवादळाची तीव्रता तीव्रता भीषण होण्याची शक्यता
हवामान खात्याकडून व्यक्त
आणि
Ø थकबाकी न
भरल्यामुळे ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्पातून नांदेड जिल्हा परिषदेचा
ग्रामीण पाणी पुरवठा थांबवण्याचा निर्णय
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात काल सरासरी
६४ टक्के मतदान झालं. सर्वाधिक मतदान ७६ पूर्णांक ६४ टक्के हे पश्चिम बंगालमध्ये नोंदवलं
गेलं. राज्यात काल १७ लोकसभा मतदारसंघात सरासरी ५७ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.
किरकोळ अपवाद वगळता हे मतदान शांततेत पार पडलं. मुंबई मधल्या सहा मतदार संघांसह ठाणे,
कल्याण, पालघर, भिवंडी, धुळे, नंदुरबार, नाशिक, दिंडोरी, शिर्डी, मावळ आणि शिरूर या
१७ लोकसभा मतदार संघांत हे मतदान झालं.
भाजप नेत्या पूनम महाजन, शिवसेनेचे अरविंद सावंत,
काँग्रेसचे मिलिंद देवरा, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष
भामरे, हीना गावित, समीर भुजबळ,
पार्थ पवार यांच्यासह एकूण ३२३ उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतदार यंत्रात बंद झालं.
काल १७ मतदार संघात
झालेल्या मतदानाबरोबरच राज्यातल्या सर्व ४८ लोकसभा मतदार संघातली निवडणूक प्रक्रिया
पूर्ण झाली आहे. राज्यामध्ये एकूण सरासरी ६० पूर्णांक ६८ टक्के मतदान झाल्याचा अंदाज
आहे.
****
महाराष्ट्रात काल मतदान झालेल्या सतरा लोकसभा मतदार
संघांपैकी अनेक ठिकाणी मतदान यंत्रात त्रुटी असल्याच्या तीस तक्रारी काँग्रेस पक्षानं,
निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत. यापैकी सर्वाधिक तक्रारी धुळे तसंच नंदुरबार मतदार संघातल्या
असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष
जयंत पाटील यांनीही यासंदर्भात ट्वीट करून, मतदान यंत्रांमध्ये गडबड असल्याचं म्हटलं
आहे. धुळे आणि नंदूरबार या दोन्ही मतदार संघात काँग्रेसचं प्राबल्य असल्यामुळे, मतदान
यंत्रात जाणूनबुजून गडबड केल्याचा आरोप पाटील यांनी केला.
****
जळगाव मतदार संघात भडगाव इथल्या एका मतदान केंद्रावर
काल फेर मतदान घेण्यात आलं. सुमारे ४५ टक्के मतदान झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे. या मतदान केंद्रावर गेल्या २३ तारखेला मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात, चाचणी मतदान
काढून न टाकताच, मतदान सुरु करण्यात आलं, त्यामुळे इथे फेरमतदान घेण्याचे निर्देश निवडणूक
आयोगानं दिले होते.
****
पालघर इथं बहुजन विकास आघाडीच्या ६७ कार्यकर्त्यांना,
शिवसेनेच्या आमदाराला मारहाण केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये
वसई विरार महापालिकेचे महापौर रूपेश जाधव यांचाही समावेश आहे. पालघरचे शिवसेना भाजप
महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या कार्यालयाबाहेर काल पहाटे एका चारचाकी वाहनातून
निवडणूक विभागाच्या पथकाने ६४ हजार पाचशे रुपयांची रोकड पकडली, यासंदर्भातल्या चौकशी
दरम्यान, शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक त्यांच्या समर्थकांसह तिथे आढळून आले. महापौर जाधव आणि
त्यांच्या समर्थकांनी इथे येऊन, फाटक यांना मारहाण केली, त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
****
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात अर्ज दाखल
करण्याचा काल शेवटचा दिवस होता, काल अखेरच्या दिवशी भारतीय जनता पक्षाकडून अभिनेता
सनी देओल यांनी पंजाबातल्या गुरदासपूर मतदार संघातून तर अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी
काँग्रेस पक्षाकडून बिहारमधल्या पाटणा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
****
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल सर्वोच्च
न्यायालयात, नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करून, राफेल विमान खरेदी प्रकरणी न्यायालयाच्या
विधानाचा विपर्यास केल्याबाबत पुन्हा एकदा खेद व्यक्त केला. भाजपाच्या खासदार मीनाक्षी
लेखी यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर, न्यायालयानं २३ एप्रिल रोजी राहुल गांधी
यांना नोटीस बजावली होती.
****
पुण्यातल्या जर्मन बेकरी बॉम्ब स्फोटप्रकरणी मुख्य
आरोपी यासीन भटकळ विरोधात काल पुणे न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आले. या प्रकरणी
पुढची सुनावणी १५ जून रोजी होणार आहे. या खटल्याची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग – दूरदृश्य
प्रणालीद्वारे सुनावणी घ्यावी, अशी विनंती दिल्ली पोलिसांनी न्यायालयात केली आहे. पुण्यात
कोरेगाव पार्क परिसरातल्या जर्मन बेकरीत १३ फेब्रुवारी २०१० रोजी हा बॉम्बस्फोट झाला
होता. यामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला, तर ५७ जण जखमी झाले होते. या प्रकरणी हाती आलेल्या
पुराव्यांवरून यासीन भटकळ याला ऑगस्ट २०१३मध्ये नेपाळच्या सीमेवर अटक करण्यात आली होती.
****
हिंद महासागरातल्या फानी या चक्रीवादळाची तीव्रता काल सायंकाळी
आणखी वाढली. उद्या दुपारनंतर या वादळाची तीव्रता भीषण होण्याची शक्यता हवामान खात्यानं
व्यक्त केली आहे. सध्या हे वादळ चेन्नईच्या पूर्व –दक्षिण भागात आठशे दहा किलोमीटर
आणि मछलीपट्टम किनाऱ्यापासून नऊशे पन्नास किलोमीटर अंतरावर केंद्रीत आहे. पाच किलोमीटर
प्रतितास या वेगानं ते उत्तर दिशेला जात असल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे.
उद्या हे वादळ उत्तर- पश्चिम दिशेला जाण्याची शक्यता असून त्यानंतर ते ओडिसा समुद्र
किनाऱ्याकडे वळण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. या वादळामुळे हलका ते
मुसळधार पाऊस होण्याची शक्यता लक्षात घेऊन केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश सरकारला सावधानतेचा इशारा
देण्यात आला आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
हिंगोली जिल्ह्याच्या औंढा तालुक्यातल्या गोजेगाव
इथल्या एका तरुणाचा काल उष्माघातानं मृत्यू झाला. संतोष कुंडलिक नागरे असं या तरूणाचं
नाव असून काल दिवसभर शेतात काम केल्यानंतर सायंकाळी तो घरी आला, त्यानंतर त्यानं लगेचच
पाणी पिल्यानं त्याला भोवळ आली, उपचारासाठी रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्याला
मृत घोषित केलं. परभणी जिल्ह्यात बारपूरवाडी इथंही उष्माघातानं एकजण मरण पावला. विदर्भातही उष्णतेची
लाट असून, अकोल्यामध्ये उन्हामुळे दोघांचा मृत्यू झाला.
परभणी जिल्ह्यात कालही ४७ अंश सेल्सियस तापमान होतं.
त्यामुळे दुपारच्यावेळी बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. नांदेड जिल्ह्यात मात्र काल
ढगाळ वातावरण होतं, कंधार भागात पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तसंच विदर्भात
उष्णतेची लाट येत्या दोन दिवसात कायम राहील, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
नांदेड
जिल्हा परिषदेनं, ग्रामीण पाणी पुरवठ्यासाठीची पाणीपट्टी न भरल्यानं, ऊर्ध्व
पेनगंगा प्रकल्पातून पाणी पुरवठा थांबवण्यात आला
आहे. संबंधित कार्यालयानं काल याबाबतचं पत्र जारी केलं. जून २०१८ अखेर जिल्हा
परिषदेकडे ५५ कोटी ८२ लाख रुपयांची आणि चालू वर्षाची
६३ लाख रुपये अशी एकूण ५६ कोटी ४५ लाख रुपयांची
पाणीपट्टी थकीत असल्यानं, पाणीपुरवठा
थांबवण्यात आला आहे.
दरम्यान, हिंगोली जिल्हा प्रशासनाकडेही सुमारे तीन
कोटी रूपयांची पाणीपट्टी थकलेली आहे, ही थकबाकी भरल्या शिवाय, ईसापूर धरणातून ग्रामीण
पाणी पुरवठ्यासाठी आरक्षित केलेलं पाणी सोडणार नसल्याचं, ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्पाकडून
सांगण्यात आलं आहे.
****
लातूर शहर महानगर पालिकेच्या स्थायी समितीमध्ये भारतीय
जनता पक्षाचे ॲडव्होकेट दिपक मठपती, चंद्रकांत बिराजदार, व्यंकट वाघमारे, वर्षा कुलकर्णी,
स्वाती घोरपडे, आणि श्वेता लोंढे, यांची तर कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नगरसेवक रवीशंकर
जाधव आणि दिप्ती खंडागळे यांची निवड झाली आहे. महापौर सुरेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली
काल झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. स्थायी समितीचे विद्यमान सभापती शैलेश गोजमगुंडे
यांचा निवृत्त झालेल्या सदस्यांमध्ये समावेश आहे. स्थायी समितीमध्ये भाजप आणि काँग्रेसचं
समान पक्षीय बलाबल असल्यामुळे आता नवीन सभापती कोण होणार याकडे सर्वांच लक्ष लागलं
आहे.
****
लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात आलमला इथं, काल
तीन जणांचा आडात गुदमरून मृत्यू झाला. एका अरुंद आडातला गाळ काढण्यासाठी, एकाच कुटुंबातले
हे तिघे एका मागोमाग उतरले, मात्र प्राणवायूच्या अभावाने ते बेशुद्ध झाले. या तिघांना
वाचवण्यासाठी अन्य चार जण आडात उतरले, मात्र त्यांनाही श्वास घेण्यास त्रास जाणवला,
या सर्वांना रुग्णालयात दाखल केलं असता, डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केलं, तर चौघांवर
रुग्णालयात उपचार करण्यात आले, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी
सांगितलं.
****
दिल्लीहून शिर्डीला आलेलं प्रवासी विमान काल धावपट्टीवरून
घसरून किरकोळ अपघात झाला. विमानात १६४ प्रवासी होते, सर्व प्रवासी सुखरुप असल्याचं,
विमान कंपनीकडून सांगण्यात आलं. या अपघातामुळे शिर्डी विमानतळावरची विमान वाहतुक काही
काळ ठप्प झाली होती.
****
अहमदनगर
जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रभाकर रुपवते
यांचं काल सकाळी अल्पशा आजारानं निधन झालं. अहमदनगर जिल्ह्यातल्या मागासवर्गीयांच्या
चळवळीतले ते अग्रणी नेते होते. जिल्हा बँकेचं उपाध्यक्षपदही त्यांनी
भूषवलं होतं.
*****
***
No comments:
Post a Comment