Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 28 April 2019
Time 7.10 AM to
7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ एप्रिल २०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø लोकसभा निवडणुकीच्या
चौथ्या टप्प्यासाठी उद्या मतदान: काल प्रचार संपला
Ø विधानसभेचे
माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, लोकसभा निवडणुकीनंतर आपली राजकीय भूमिका स्पष्ट
करणार
Ø राज्यात उष्णतेची
लाट, उष्माघातामुळं तीन जणांचा मृत्यू
Ø लातूर
शहराला येत्या १ मे पासून दर दहा दिवसांनी पाणी पुरवठा करण्याचा निर्णय
आणि
Ø नांदेड
- लातूर जिल्ह्यात तीन अपघातात सात जण ठार तर तेरा जण जखमी
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
या निवडणुकीचा प्रचार काल संपला. या चौथ्या टप्प्यात
राज्यातल्या १७, उत्तर प्रदेश
आणि राजस्थानमधल्या प्रत्येकी १३, पश्चिम बंगाल मधल्या आठ, ओडिशा आणि मध्य प्रदेशातल्या
सहा, बिहार मधल्या पाच, झारखंड मधल्या तीन मतदार संघात, तसंच जम्मू-काश्मीर मधल्या
अनंतनाग लोकसभा मतदार संघातल्या कुलगाम जिल्ह्यात उद्या
मतदान होणार आहे. राज्यातल्या
१७ मतदार संघांमध्ये मुंबईतल्या सहा
मतदार संघांसह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, धुळे, नंदूरबार, नाशिक, दिंडोरी, शिर्डी,
मावळ आणि शिरुर या मतदार संघांचा समावेश आहे. निवडणुकीच्या या टप्प्यात भाजपा नेत्या
पूनम महाजन, शिवसेनेचे अरविंद सावंत, काँग्रेसचे मिलिंद देवरा, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर,
केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, हीना गावित, समीर भुजबळ, पार्थ पवार यांच्यासह
राज्यातल्या १७ मतदार संघातल्या एकूण ३२३ उमेदवारांचं राजकीय भवितव्य उद्या
मतदान यंत्रात बंद होणार आहे.
दरम्यान, काल विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचाराच्या अखेरच्या
दिवशी प्रचार सभा घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
यांनी ठाणे जिल्ह्यात डोंबिवली इथं घेतलेल्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. हे दोघे राष्ट्रवादाच्या
नावावर मतांचा जोगवा मागत आहेत, मात्र देशाचा प्रत्येक नागरिक वेळ आली तर देशासाठी
बलिदान देण्याकरता सज्ज असल्यामुळे जनतेला मोदी आणि फडणवीस यांनी राष्ट्रवाद शिकवण्याची
गरज नाही, असं ते म्हणाले.
****
विरोधकांनी मोदींना
हवा तेवढा विरोध करावा, पण देशाच्या सैनिकांनी पाकिस्तान विरोधात दाखवलेल्या शौर्याविषयी
शंका घेऊ नये, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक इथं प्रचार सभेत बोलत
होते. युतीनं नाशिकमध्ये केलेल्या कामांचं श्रेय राज ठाकरे घेण्याचा प्रयत्न करत आहेत,
असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा
मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार पूनम महाजन यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस
यांनी काल मुंबईत
प्रचार फेरी काढली. लोकशाहीचा उत्सव साजरा करा, अशा शब्दांत त्यांनी मतदान करण्याचं
आवाहन मतदारांना केलं. विक्रमी निकालासह देशात पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार
बनेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदींना नोटबंदी करण्याचा अधिकार कोणी दिला, असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे नेते विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते काल भिवंडी
इथं प्रचार सभेत बोलत होते. यावेळी मंचावर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी,
आमदार वारीस पठाण यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
****
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
यांची काल पालघरमध्ये प्रचारसभा झाली. धुळ्यात डॉक्टर सुभाष भामरे यांच्या समर्थकांनी
प्रचार फेरी काढली. दरम्यान, भाजप नेते नितीन गडकरी यांना काल शिर्डीत प्रचार सभेत भाषण करताना
भोवळ आली. गडकरी यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं, या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
लोकसभा निवडणुकी
नंतर आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहोत, असं काँग्रेस नेते आणि विधानसभेचे माजी
विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल लोणी
इथं वार्ताहरांशी बोलत होते. अहमदनगरची
जागा काँग्रेससाठी सोडावी, अशी मागणी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्याकडे
केली, त्यावेळी पक्षनेतृत्व खंबीरपणे पाठीशी उभं राहिलं नसल्याची
खंत विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
****
जळगाव लोकसभा मतदार संघातल्या भडगाव इथल्या एका मतदान
केंद्रावर उद्या फेरमतदान होणार आहे. इथं गेल्या मंगळवारी २३ तारखेला मतदान झालं होतं,
मात्र मतदान केंद्रावरच्या कर्मचाऱ्यांनी चाचणी मतदान काढून न टाकताच, मतदान सुरू केल्यानं,
इथलं मतदान रद्द करण्यात आलं.
****
जगातली सर्वात मोठी
लोकशाही असलेल्या भारतातल्या निवडणूक प्रक्रियेचं संपूर्ण जगाला आकर्षण असल्याचं दिसून
येत असून, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशांची शिष्टमंडळं भारताच्या निवडणूक प्रक्रियेची
माहिती घेण्यासाठी मुंबईतल्या काही मतदान केंद्रांना उद्या भेट देणार आहेत.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
राज्य उष्णतेच्या लाटेत होरपळून निघत असून राज्यात काल उष्मा घातामुळं तीन जणांचा मृत्यू
झाला. अकोला, बुलडाणा आणि परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी एक जणांचा यात समावेश आहे.
दरम्यान, काल राज्यात अकोल्यात सर्वाधिक ४६ पूर्णांक
सात दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्या खालोखाल चंद्रपूर इथं ४६ पूर्णांक पाच,
अमरावती ४६, वाशिम ४५ पूर्णांक पाच, परभणी इथं ४५ पूर्णांक दोन, अहमदनगर ४५ पूर्णांक
एक, जळगाव ४५, नांदेड तसंच नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं ४४ पूर्णांक ६, बीड ४४ पूर्णांक
४, औरंगाबाद तसंच उस्मानाबाद इथं ४३ पूर्णांक ६, बुलडाणा ४३ तर हिंगोली जिल्ह्यात बेचाळीस
अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदलं गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
उष्णतेची ही लाट पुढचे दोन ते तीन
दिवस म्हणजे येत्या एक मे पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, येत्या दोन दिवसात दक्षिण मध्य
महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं
वर्तवली आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या परभणी शाखेच्या अध्यक्षपदी
ज्येष्ठ लेखिका सरोज देशपांडे यांची तर कार्यवाहक पदी प्राध्यापक भगवान काळे यांची
बिनविरोध निवड करण्यात आली आहे. काल परभणी इथं या निवडीबाबतची ही बैठक पार पडली. यावेळी
उपाध्यक्ष म्हणून बा.बा. कोटंबे यांची तर कोषाध्यक्षपदी प्राध्यापक हनुमान व्हरगुळे
यांची निवड करण्यात आली.
****
नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातल्या काँग्रेसच्या
जिल्हा परिषद सदस्या अंकिता देशमुख -मोरे यांचं जात वैधता प्रमाणपत्र बनावट असल्याचं
उघडकीस आलं आहे. या प्रकरणी लोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहा
तालुक्यातल्या सोनखेड गटातून त्या निवडून आल्या होत्या. इतर मागास प्रवर्गासाठी हा
गट राखीव होता. जात मराठा असतांना त्यांनी मराठा कुणबी जातीचं प्रमाणपत्र काढलं असं
तक्रारदारानं म्हटलं आहे.
****
लातूर शहराला येत्या १ मे पासून दर दहा दिवसांनी म्हणजे महिन्यातून तीन वेळा पाणी पुरवठा करण्यात येणार
आहे. लातूर महापालिका आयुक्त एम डी सिंह यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
मांजरा धरणातून लातूर शहराला पाणी पुरवठा केला जातो, त्या धरणात अत्यल्प पाणी साठा शिल्लक राहील्यामुळं हा निर्णय घेण्यात आल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बीड जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून अत्यल्प पाऊस झाल्यानं
दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, जिल्ह्यातले सगळे प्रकल्प नव्वद टक्क्यांहून
जास्त कोरडे झाले आहेत. बिंदुसरा धरणात फक्त
चार दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक असून, माजलगाव धरणाची पाणी पातळी देखील खालावली आहे. अशा परिस्थितीत
शहरातल्या नागरिकांनी पिण्याचं पाणी जपून वापरावं, असं आवाहन नगर परिषदेनं केलं आहे.
माजलगाव धरणातून पाणी उपसा करण्यासाठी लावलेले अनधिकृत पंप जप्त करण्यात यावेत, अशी
मागणी बीड नगर परिषदेनं वडवणीच्या तहसीलदारांकडे केली आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या अंबड महसूल विभागानं काल सकाळी
गोदावरी नदीपात्रात छापा टाकून अवैधरीत्या साठवून ठेवलेला ७०० ब्रास वाळू साठा जप्त
केला. तर ५५० ब्रास वाळूसाठा जेसीबी यंत्राच्या साहाय्याने मातीमिश्रीत करून वापरण्यास
अयोग्य करण्यात आला. कारवाई केलेल्या वाळूसाठ्यांची किंमत ४० लाख रुपये इतकी आहे.
****
नांदेड आणि लातूर जिल्ह्यात काल
झालेल्या तीन अपघातात सात जण ठार
तर तेरा जण जखमी झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात देगलूर- हैदराबाद रस्त्यावर काल सकाळी
जीपवर ट्रक आदळून झालेल्या अपघातात एका कुटुंबातील चार जण ठार तर नऊ जण जखमी झाले.
जीपमधले प्रवासी हे हळदीच्या कार्यक्रमासाठी हैदराबादला जात होते. ट्रकचं समोरील टायर
फुटून रॉड तुटल्यामुळं हा ट्रक जीपवर जाऊन आदळला.
लातूर जिह्याच्या अहमदपूर तालुक्यातल्या शिरूर ताजबंद
इथं काल मॉनिंग वॉकला चाललेल्या एका इसमाला बोलेरो गाडीनं जोरदार घडक दिल्यानं त्याचा
मृत्यू झाला तर लातूर -गुलबर्गा मार्गावर कसगी गावाजवळ काल सायंकाळी कमांडर जीप आणि
ट्रॅक्टरची धडक होऊन जीपमधील दोघांचा मृत्यू झाला, तर अन्य चौघे जखमी झाले आहेत.
****
जालना तालुक्यात देवमूर्ती इथं, दूषित पाणी प्यायल्यानं सहा हरणं, एक काळवीट, नऊ शेळ्या आणि
एका गायीचा मृत्यू झाला. काल दुपारी ही घटना निदर्शनास आली. पशुवैद्यकीय
अधिकाऱ्यांनी पाण्याचे नुमने तपासणीसाठी घेतले, दगावलेल्या प्राण्याचे शवविच्छेदनही करण्यात
आलं. शवविच्छेदन अहवालानंतर प्राण्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण पुढे
येईल, अशी माहिती पशुसंवर्धन उप आयुक्त डॉ. कुरेवाड यांनी दिली.
****
गडचिरोली जिल्ह्यात
पोलिसांसोबतच्या चकमकीत दोन महिला माओवादी ठार झाल्या. एटापल्ली
तालुक्यातल्या गुंडुरवाही आणि पुलनार या गावांदरम्यान पोलिसांनी राबवलेल्या शोध मोहिमेदरम्यान
ही काल कारवाई
करण्यात आली.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या
खामगाव शहरानजीक असलेल्या माथनी इथं स्फोटकं तयार करण्याच्या कारखान्यातील एका गोदामात
जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट होऊन एक जण ठार तर अन्य एक जण गंभीर जखमी झाल्याचं वृत्त
आहे.
****
चीनच्या बिजिंग इथं सुरू असलेल्या
आयएसएसएफ नेमबाजी स्पर्धेत भारताच्या आभिषेक वर्मानं दहा मीटर एअर पिस्टल प्रकारात
सुवर्ण पदक जिंकून टोकियो ऑलिम्पिंक साठी भारताला पाचवं कोटा स्थान दिलं आहे. २०२०
च्या ऑलिम्पिंक साठी पात्र ठरलेल्यांमध्ये नेमबाज अंजुम मॉदगिल, अपूर्वी चंदेला, सौरभ
चौधरी आणि दिव्यांश यांचाही समावेश आहे.
*****
***
No comments:
Post a Comment