Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27
April 2019
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ एप्रिल २०१९ सायंकाळी ६.००
****
लोकसभा
निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातला प्रचार आज संध्याकाळी संपला. या चौथ्या टप्प्यात राज्यातल्या
मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघांसह, ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, धुळे, नंदुरबार,
नाशिक, दिंडोरी, शिर्डी, मावळ आणि शिरूर या सतरा मतदारसंघांमध्ये परवा, सोमवारी मतदान
होणार आहे. या सर्वच मतदार संघात आज विविध पक्षांच्या प्रचार सभा आणि प्रचार फेऱ्या
पार पडल्या.
****
जनतेचा
पैसा लुटता यावा, यासाठी विरोधी पक्षांच्या संधीसाधू एकजुटीला एक दुर्बल सरकार हवं
आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर टीका केली आहे. ते आज
उत्तर प्रदेशमधल्या कन्नोज आणि हरदोई इथे प्रचार सभेत बोलत होते. देशाला अतिरेक्यांकडून
धोका आहे, मात्र विरोधी पक्षांकडे त्या धोक्यासाठी कोणतीही योजना नाही, असंही पंतप्रधानांनी
म्हटलं.
****
भाजप
अध्यक्ष अमित शाह यांनी विकासासाठी राज्यात आणि केंद्रात भाजपला सत्तेत निवडून देण्याचे
आवाहन केलं आहे. ते ओडिशातल्या मयूरभंजमधे मोरादा विधानसभा प्रचारसभेत बोलत होते.
****
चौकीदारानं
रायबरेली आणि अमेठीच्या उद्योगांची आणि रोजगारांची चोरी केली, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष
राहुल गांधी यांनी केला. ते आज रायबरेलीमध्ये एका प्रचार सभेत बोलत होते. काँग्रेस
पक्ष जनतेचा लुटला गेलेला पैसा जनतेला परत मिळवून देईल, असंही गांधी म्हणाले.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रवादाच्या नावावर मतांचा जोगवा
मागत आहेत, मात्र देशाचा प्रत्येक नागरिक वेळ आली तर देशासाठी बलिदान देण्याकरता सज्ज
असल्यामुळे जनतेला मोदी आणि फडणवीस यांनी राष्ट्रवाद शिकवण्याची गरज नाही, अशी टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. ते आज डोंबिवली इथल्या प्रचार
सभेत बोलत होते.
****
विरोधकांनी
मोदींना हवा तेवढा विरोध करावा, पण देशाच्या सैनिकांनी पाकिस्तानविरोधात दाखवलेल्या
शौर्याविषयी शंका घेऊ नये, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज
नाशिक इथे प्रचार सभेत बोलत होते. युतीनं नाशिकमध्ये केलेल्या कामांचं श्रेय राज ठाकरे
घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं.
****
नरेंद्र
मोदींना नोटबंदी करण्याचा अधिकार कोणी दिला, असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे नेते विधीज्ञ
प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते आज भिवंडी इथं प्रचार सभेत बोलत होते. यावेळी मंचावर
एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी, आमदार वारीस पठाण यांच्यासह अन्य पदाधिकारी
उपस्थित होते.
****
निवडणुकीनंतर
आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहोत, असं काँग्रेस नेते आणि विधानसभेचे माजी विरोधी
पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज लोणी इथं वार्ताहरांशी बोलत
होते. नगरची जागा काँग्रेससाठी सोडावी, अशी मागणी आपण शरद पवार यांच्याकडे केली, त्यावेळी
पक्षनेतृत्व खंबीरपणे पाठीशी उभं राहिलं नसल्याची खंत विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त
केली.
****
उष्णतेच्या
लाटेत आज मराठवाडा होरपळत असल्याचं चित्र आहे. उस्मानाबाद इथं ढगाळ हवामानामुळे अतिशय
दमटपणा जाणवत असून तापमान बेचाळीस अंशांवर गेल्यानं वाहतूक आणि बाजारपेठेवर मोठा परिणाम
झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हिंगोली जिल्ह्यातही आज बेचाळीस अंश सेल्सियस
इतकं तापमान नोंदलं गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. परभणी इथे आज या वर्षीचं सर्वाधिक म्हणजे पंचेचाळीस अंश सेल्सियस तापमान नोंदलं
गेलं.
नांदेड
शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची लाट आणखी पाच दिवस राहणार असल्याचा इशारा देत, नागरिकांनी
काळजी घ्यावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
बुलडाणा
जिल्ह्यातही उष्णतेची लाट जाणवत असून बुलडाणा शहराचं तापमान ४३ पूर्णांक एक अंश सेल्सियस
पर्यंत गेलं आहे. खामगाव इथं तापमान ४५ अंश सेल्सियस इतकं नोंदवलं गेलं.
येत्या
दोन दिवसात दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह
पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातल्या कमाल
तापमानात हळूहळू वाढ होत राहील आणि, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी
उष्णतेची लाट येईल, असा इशाराही वेधशाळेनं दिला आहे.
****
No comments:
Post a Comment