आकाशवाणी औरंगाबाद
मराठी बातमीपत्र
३० एप्रिल २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
भाजपाचे ज्येष्ठ नेते, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी निवडणूक प्रचारातल्या भाषणात
आचारसंहितेचा कथित भंग केल्याच्या याचिकेची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.
काँग्रेस खासदार सुश्मितादेव यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती रंजन
गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर होईल. मोदी आणि शाह यांच्याविरुद्ध निवडणूक
आयोगानं कोणतीही कारवाई केली नाही, असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे.
****
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी
काल सर्वोच्च न्यायालयात, नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करून, राफेल विमान खरेदी प्रकरणी
न्यायालयाच्या विधानाचा विपर्यास केल्याबाबत पुन्हा एकदा खेद व्यक्त केला. भाजपाच्या
खासदार मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर, न्यायालयानं २३ एप्रिल रोजी
राहुल गांधी यांना नोटीस बजावली होती. या याचिकेवरही आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
होणार आहे.
****
राफेल प्रकरणातल्या पुनर्विचार याचिकेवर आज होणाऱ्या
सुनावणीसाठी केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाकडे आणखी मुदत मागितली आहे. काल या प्रकरणाच्या
सुनावणीच्यावेळी न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या पीठासमोर, सरकारी वकिल आर.बालसुब्रमण्यम
यांनी न्यायालयाला या याचिकेवर उत्तर देण्यासाठी आणखी मुदत वाढवुन देण्याची विनंती
केली, तेव्हा सुनावणीच्या स्थगितीची माहिती सर्व पक्षांना देण्यासाठी न्यायालयानं त्यांना
सांगितलं.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात
काल देशभरातल्या ७२ जागांसाठी सरासरी ६४ टक्के मतदान झालं. सर्वाधिक मतदान ७६ पूर्णांक
६४ टक्के हे पश्चिम बंगालमध्ये नोंदवलं गेलं. महाराष्ट्रातल्या १७ लोकसभा मतदारसंघात
सरासरी ५७ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. किरकोळ अपवाद वगळता हे मतदान शांततेत पार
पडलं. मुंबई मधल्या सहा मतदार संघांसह ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, धुळे, नंदुरबार,
नाशिक, दिंडोरी, शिर्डी, मावळ आणि शिरूर या १७ लोकसभा मतदार संघांत हे मतदान झालं.
भाजप नेत्या पूनम महाजन, शिवसेनेचे अरविंद सावंत,
काँग्रेसचे मिलिंद देवरा, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष
भामरे, हीना गावित, समीर भुजबळ,
पार्थ पवार यांच्यासह एकूण ३२३ उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतदार यंत्रात बंद झालं.
कालच्या मतदानानंतर राज्यातल्या सर्व ४८ लोकसभा
मतदार संघातली मतदान प्रक्रिया
पूर्ण झाली आहे. राज्यामध्ये या चारही टप्प्यात सरासरी
६० पूर्णांक ६८ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.
****
महाराष्ट्रात काल मतदान झालेल्या सतरा लोकसभा मतदार
संघांपैकी अनेक ठिकाणी मतदान यंत्रात त्रुटी असल्याच्या तीस तक्रारी काँग्रेस पक्षानं,
निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत. यापैकी सर्वाधिक तक्रारी धुळे तसंच नंदुरबार मतदार संघातल्या
असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष
जयंत पाटील यांनीही यासंदर्भात ट्वीट करून, मतदान यंत्रांमध्ये गडबड असल्याचं म्हटलं
आहे. धुळे आणि नंदूरबार या दोन्ही मतदार संघात काँग्रेसचं प्राबल्य असल्यामुळे, मतदान
यंत्रात जाणूनबुजून गडबड केल्याचा आरोप पाटील यांनी केला.
****
जळगाव मतदार संघात भडगाव इथल्या एका मतदान केंद्रावर
काल फेर मतदान घेण्यात आलं. सुमारे ४५ टक्के मतदान झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे. या मतदान केंद्रावर गेल्या २३ तारखेला
मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात, चाचणी मतदान काढून न टाकताच, मतदान सुरु करण्यात आलं,
त्यामुळे इथे फेरमतदान घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले होते.
****
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात अर्ज दाखल
करण्याचा काल शेवटचा दिवस होता, काल अखेरच्या दिवशी भारतीय जनता पक्षाकडून अभिनेता
सनी देओल यांनी पंजाबातल्या गुरदासपूर मतदार संघातून तर अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी
काँग्रेस पक्षाकडून बिहारमधल्या पाटणा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
****
नांदेड जिल्हा परिषदेनं, ग्रामीण पाणी पुरवठ्यासाठीची
पाणीपट्टी न भरल्यानं, ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्पातून पाणी पुरवठा
थांबवण्यात आला आहे. संबंधित कार्यालयानं काल याबाबतचं पत्र जारी केलं.
*****
***
No comments:
Post a Comment