आकाशवाणी औरंगाबाद
मराठी बातमीपत्र
२७ एप्रिल २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
चित्रपट हे सामाजिक बदलाचं सशक्त
माध्यम असल्याचं मत उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं आहे. नायडू यांनी
काल मुंबईतल्या राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाला भेट दिली, त्यावेळी ते बोलत
होते. चित्रपटाची भाषा ही वैश्विक भाषा असते, असं ते म्हणाले. भारतात सर्वात जास्त
चित्रपट तयार होतात, असं नमूद करत चित्रपट हे भारतीय लोकांच्या जीवनाचा एक भागच असल्याचं
उपराष्ट्रपती म्हणाले. नायडू यांच्यासोबत या वेळी राज्यपाल सी.विद्यासागर राव उपस्थित
होते.
****
राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी परिपक्वता दाखवावी
आणि नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे या विचारवंतांच्या हत्यांच्या तपासात काही अडथळे
येणार नाहीत, हे सुनिश्चित करावं, असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. या दोन्ही
प्रकरणांचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा, अशी मागणी करणा याचिका दाभोलकर आणि पानसरे
यांच्या कुटुंबियांनी दाखल केल्या आहेत, त्यांच्या सुनावणीच्या वेळी काल न्यायालयानं
हे मत व्यक्त केलं. या हत्या प्रकरणांचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय संस्थांना राज्य सरकारनं
सर्व मदत पुरवावी, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार आज
संध्याकाळी थांबणार असल्यामुळे आज राज्यात विविध ठिकाणी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या
प्रचार सभा होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दुपारी नाशिक इथं सभा होणार
आहे. तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे पालघरमध्ये सभा घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे
अध्यक्ष शरद पवार हे सटाणा आणि पिंपरी इथे सभा घेणार आहेत.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातल्या
१७ मतदार संघात परवा, सोमवारी २९ तारखेला मतदान होणार आहे. या शेवटच्या टप्प्यात नागरिकांनी
मतदानाचं कर्तव्य बजवावं असं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त अश्विनी कुमार यांनी केलं
आहे. शहरी भागातली मतदानाची कमी टक्केवारी ही चिंतेची बाब असल्याचं अश्विनी कुमार म्हणाले
****
नाशिकमध्येही परवा सोमवारी २९ तारखेला मतदान होणार
आहे. जिल्हा प्रशासनानं शहरातल्या सेवाभावी तसंच व्यावसायिक संघटनांच्या माध्यमातून
'व्होट कर नाशिककर' ही मोहीम हाती घेतली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे
यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. मतदान करणाऱ्यांची छायाचित्रं फेसबुकवर टाकणं, तसंच
सोडत पद्धतीनं बक्षीसं देणं अशा विविध योजना यामध्ये आखण्यात आल्या आहेत.
****
येत्या ३ मे पासून भंडारदरा आणि निळवंडे धरणातून
अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर पर्यंत पिण्यासाठी, पाण्याचं आवर्तन सोडण्यात येणार
आहे. पाटबंधारे विभागाचे अधिकारी किरण देशमुख यांनी ही माहिती दिली. सध्या भंडारदरा
धरणात एक हजार ६०२ दशलक्ष घनफूट तर निळवंडे धरणात एक हजार १४२ दशलक्ष घनफूट पाणी आहे.
****
बीडचे नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांनी
काल माजलगाव धरणाची पाहणी केली. धरणाची पाणी पातळी खालावली असून, नागरिकांनी पाणी जपून
वापरण्याचं आवाहन त्यांनी केलं.
दरम्यान, नगरपालिका प्रशासनाकडून उपाययोजना करण्याचं
काम सुरु आहे. सध्या १५ फूट चारीतून पाणी घेतलं जात असून, चारीची खोली अणि लांबी वाढवण्यासाठी
२ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे, हा प्रस्ताव मंजूर झाल्यास पाणी
संकलित करण्याची सुविधा होईल, असंही क्षीरसागर यांनी सांगितलं.
****
उत्तर रेल्वे विभागात अंबाला ते लुधियाना दरम्यान,
भुयारी पुलाच्या कामामुळे जम्मू तावी इथून
निघणाऱ्या जम्मू तावी ते हुजूर साहिब नांदेड - हमसफर एक्स्प्रेस गाडीच्या मार्गात
बदल करण्यात आला आहे. ही गाडी उद्या सान्हावाल-चंदीगढ मार्गे धावेल, असं दक्षिण मध्य
रेल्वेच्या नांदेड विभागानं कळवलं आहे.
****
बँकॉक इथे झालेल्या आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत
काल भारताच्या अमित पनगळ आणि पूजा राणी यांनी आपापल्या गटात सुवर्णपदकं जिंकली. भारतानं
या स्पर्धेत दोन सुवर्ण, चार रौप्य आणि सात कांस्य पदकं जिंकली आहेत.
दुसरीकडे, चीनमध्ये वूहान इथे सुरू असलेल्या बॅडमिंटन
स्पर्धेत पी.व्ही.सिंधू, सायना नेहवाल आणि समीर वर्मा उपान्त्य पूर्व फेरीत बाद झाल्यानं
भारताचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.
आशियायी कुस्ती स्पर्धेत महिलांच्या गटात भारतच्या
विनेश फोगाटनं कांस्य पदक जिंकलं.
*****
***
No comments:
Post a Comment