Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 29 April 2019
Time 7.10 AM to
7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ एप्रिल २०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø देशभरात उष्णतेची
लाट; राज्यही होरपळलं, उष्माघाताचे सहा बळी
Ø लोकसभा
निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानास प्रारंभ; राज्यात मुंबईमधल्या सहा मतदार संघांसह १७ मतदारसंघांतही
मतदान सुरू
Ø हिंद महासागरात ‘फनी’ या चक्री वादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता
हवामान विभागाकडून व्यक्त
आणि
Ø औरंगाबाद-अहमदनगर रस्त्यावर लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणारी मालवाहू रिक्षा पुलावरुन खाली कोसळल्यानं
दोन जण ठार तर पंधरा जण जखमी
****
देशभरात उष्णतेची लाट असून राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात
हवामान विभागानं उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. उष्णतेच्या या लाटेत काल सहा जणांचा मृत्यु झाला. यात बीड शहरात
माळीवेस भागातले एक शिक्षक बहीरवाडीला परीक्षेच्या कामासाठी गेले असता बेशुद्ध पडले,
त्यांचा रुग्णालयात मृत्यु झाला. अंबाजोगाई तालुक्यात बनसारोळा इथं टपाल वाटपाचं काम
करुन घरी परतलेला पोस्टमनचाही उष्माघातानं मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यातही उष्माघाताच्या
चार घटनांमध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांसह चौघा जणांचा मृत्यू झाला.
राज्यात
काल मराठवाड्यातल्या परभणी, विदर्भातल्या अकोला आणि चंद्रपूर इथं सर्वाधिक ४७ पूर्णांक
२ अंश सेल्सियस तापमानाची
नोंद झाली. अमरावती ४५ पूर्णांक आठ, जळगाव ४५ पूर्णांक चार, बीड आणि अहमदनगर इथं ४५
पूर्णांक एक, आणि नांदेड इथं ४४ पूर्णांक सहा अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं. औरंगाबाद इथं कमाल ४३ पूर्णांक
सहा अंश सेल्सियस तापमान होतं.
नाशिक जिल्ह्यात काल गेल्या दहा वर्षांतलं सर्वाधिक
४२ पूर्णांक आठ अंश सेल्सियस तापमानाची
नोंद झाली.
बुलडाणा जिल्ह्यात उष्णतेमुळे वाहनं पेट घेत असल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जिल्ह्यातल्या खामगाव शहराजवळ लाखनवाडा या डोंगराळ भागातील
रस्त्यावर उष्णतेनं एका चारचाकी वाहनानं पेट
घेतला. या वाहनातले प्रवासी तात्काळ
बाहेर पडल्यानं कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
कोकणातही काल तापमान
४४ पूर्णांक ५ सेल्सियस अंशपर्यंत गेल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, येत्या २४ तासांत दक्षिण
कोकण, दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची
शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात ९
राज्यातल्या ९१ लोकसभा मतदारसंघात मतदानास
काही वेळापूर्वी सुरूवात झाली आहे. यामध्ये राज्यातल्या मुंबईमधल्या सहा मतदार संघांसह ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी,
धुळे, नंदुरबार, नाशिक, दिंडोरी, शिर्डी, मावळ आणि शिरूर या १७ लोकसभा मतदारसंघांचा
समावेश आहे. या टप्प्यात भाजप नेत्या पूनम महाजन, शिवसेनेचे अरविंद सावंत, काँग्रेसचे
मिलिंद देवरा, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, हीना
गावित, समीर भुजबळ,
पार्थ पवार यांच्यासह राज्यातल्या १७ मतदार संघातल्या एकूण ३२३ उमेदवारांचं राजकीय
भवितव्य आज मतदार
यंत्रात बंद होईल.
या १७ मतदारसंघात तीन कोटी, ११ लाख, ब्याण्णव हजार,
८२३ मतदार आहेत. मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टीनं निवडणूक आयोगानं विविध उपक्रम
राबवले आहेत. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी सोयीच्या दृष्टीनं वाहतुकीची
व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं प्रत्येक विधानसभा
मतदारसंघात एक सखी मतदान केंद्र असणार आहे.
****
भारतीय जनता पक्षानं गोव्यातल्या पणजी विधानसभा पोट
निवडणुकीसाठी सिद्धार्थ कुंकळ्येनकर यांना उमेदवारी घोषित केली
आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.
****
बिहार मधल्या पाटणा न्यायालयानं काँग्रेस अध्यक्ष
राहुल गांधी यांना २० मे पर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. बिहारचे
उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी
गांधी यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेनुसार हे निर्देश देण्यात आले आहेत. मानहानीच्या
याचिकेत त्यांनी राहुल गांधी यांच्या, मोदी आडनाव असलेले सर्व चोर आहेत, या वक्तव्याचा
उल्लेख केला आहे. या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे आपली प्रतिमा खराब झाल्याचा दावा या याचिकेत
सुशील कुमार मोदी यांनी केला आहे.
****
कर्ज बुडवणाऱ्या व्यक्तींची नावं रिझर्व्ह बँकेनं
सार्वजनिक करण्याची मागणी काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी केली आहे. काल नवी
दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत त्यांनी ही मागणी केली. मार्च २०१४ ते मार्च २०१८ या काळात
बुडीत कर्जाच्या प्रमाणात पाच पटीनं वाढ झाली असून याबाबत माहिती अधिकार कायद्याअंतर्गत
अनेक याचिका दाखल आहेत. मात्र सहकारी, सार्वजनिक क्षेत्रासह खाजगी आणि विशेषत: गुजरातमधल्या
बँकांत कर्ज बुडवणाऱ्या व्यक्तींची नावं सरकारनं उघड केलेली नाहीत अशी टीका सिंघवी
यांनी केली.
****
दक्षिण-पूर्व बंगाल आणि आसपासच्या हिंद महासागरात
तयार झालेल्या ‘फनी’ या चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या हे वादळ उत्तर-पश्चिम दिशेनं फिरत आहे. मंगळवारपर्यंत उत्तर-पश्चिम दिशेनं आणि
त्यानंतर ते उत्तरपूर्व दिशेनं फिरेल, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
सध्याच्या उष्ण हवामानामुळे वादळ अधिक तीव्र होण्यास अनुकूल स्थिती आहे. समुद्र खवळलेला
असल्यानं मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, अशी सूचना हवामान विभागानं दिली आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
शिल्पकलेचं अद्वितीय उदाहरण असणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या
जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या पर्यटक स्वागत कक्षाचं उद्घाटन
काल करण्यात आलं. यावेळी या लेण्यांचा शोध लावणारे ब्रिटिश लष्करी अधिकारी कॅप्टन जॉन
स्मिथ यांचे नातू जॉन व्ही., भारतीय पुरातत्व विभागाचे प्रादेशिक संचालक डॉक्टर एम.
नंबिराजन, लेणीचे प्रमुख अधिकारी डी. एस. दानवे यांच्यासह राज्य पर्यटन विकास महामंडळाचे
वरिष्ठ महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल उपस्थित होते.
याचबरोबर युनेस्कोनं जाहीर केलेल्या एशिया पॅसिफिक
प्रदेशातल्या सर्व जागतिक वारसा स्थळांच्या छायाचित्र प्रदर्शनालाही काल या ठिकाणी
सुरूवात झाली.
****
बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातल्या घळाटवाडी
इथं काल ११व्या ‘शिवार साहित्य संमेलना’ची सुरूवात झाली. मृदंगाचार्य भरत पठाडे यांच्या
हस्ते ग्रंथपूजन करून या संमेलनाची सुरुवात
झाली. यावेळी काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत संमेलनाध्यक्ष प्राध्यापक रामप्रसाद तौर,
स्वागताध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांच्यासह जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या कलशधारी
मुली, लेझीम पथक, हलगी पथक, ढोल पथक, भजनी मंडळी तसंच गावकरी मोठ्या संख्येनं सहभागी
झाले होते.
****
विष्णुपरी धरणातल्या पाणीसाठ्यात घट झाल्यामुळे, नांदेड शहरात महानगरपालिकेनं पाणी पुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आता शहरात तीन दिवसा आड पाणी पुरवठा केला जाणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद नगरपरिषदेत १० लाख,
५८ हजार रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले तत्कालीन कर अधिक्षक पठाण
अफजलखान नवाजखान आणि सफाई कर्मचारी मनोज हरीसिंग टाक यांना ३० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी
सुनावण्यात आली आहे. या दोघांनी नगरपालिकेच्या मालकींच्या जागांचे भाडे, इमारत भाडे
आणि सेवा शुल्क संबंधितांकडून वसूल केले, मात्र या रकमेचा भरणा नगरपालिकेत केला नाही,
यावरून त्यांच्याविरूद्ध संगनमत करून हा अपहार केल्याबद्दल धर्माबाद पोलिस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
औरंगाबाद-अहमदनगर मार्गावर लिंबेजळगाव
परिसरात शिवराई फाट्याजवळ काल संध्याकाळी, लग्नाचं वऱ्हाड
घेऊन जाणारी मालवाहू रिक्षा पुलावरुन
खाली कोसळल्यानं दोन जण ठार तर पंधरा जण जखमी झाले. वाहन चालकाचा ताबा सुटल्यानं घडलेल्या
या अपघातात हे वाहन पुलाखाली वीस फुट खोल
एका झाडात अडकलं होतं. औरंगाबाद नजिक पडेगाव इथलं लग्न आटोपून वाहनातले सर्वजण अहमदनगर
जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातल्या नावरा इथं जात होते. जखमींना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात
दाखल करण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्याच्या पैठण तालुक्यात चितेगाव इथं व्हिडिओकॉन
कंपनीत भंगार आणि कच्च्या मालाला आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या तीन बंबांच्या
मदतीनं ही आग आटोक्यात आणण्यात आली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, याच ठिकाणी
दुपारी पुन्हा आग लागून सामानानं पेट घेतला. परंतु अग्निशमन दलाच्या बंबांनी पुन्हा
आगीवर नियंत्रण मिळवलं.
अन्य एका घटनेत शहराच्या देवळाई चौक परिसरात फर्निचरच्या
दुकानाला परवा रात्री उशीरा आग लागली यात दुकानातील तीन लाखांचं सामान जळालं. सिडकोच्या
अग्निशमन केंद्रानं ही आग विझवली.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वत रांगेतल्या वन परिक्षेत्रात निमखेडी
बिटच्या जंगलात लागलेल्या वणव्यानं अनेक झाडं जळून खाक झाली. या जंगलात सागवान, धावडा,
सलाई, अंजनाच्या शेकडो झाडांचं नुकसान झालं. आग आटोक्यात आणण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न
सुरू आहेत.
****
औरंगाबाद शहरातले प्रसिध्द उद्योजक आणि जायन्टस इंटरनॅशनलचे
विश्व उपाध्यक्ष दिनेश मालानी यांचं काल निधन झालं. ते ७२ वर्षांचे होते. औरंबागाबादमधली
तरूण उद्योजक संघटना - आयसा या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष, मराठवाड्यातल्या उद्योजकांच्या
मसिआ या संघटनेचे संस्थापक सदस्य तसंच महेश अर्बन नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि
संस्थापक म्हणूनही त्यांनी कार्य केलं होतं.
****
वाशिम इथले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तुळशीराम जाधव यांचं काल निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते.
जाधव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. तसेच आधीच्या जनसंघ आणि सध्याच्या
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना आणि विस्तारात त्यांची महत्वाची भूमिका होती.
*****
***
No comments:
Post a Comment