Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 27 April 2019
Time 7.10 AM to
7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ एप्रिल २०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø लोकसभा निवडणुकीच्या
चौथ्या टप्प्यातला प्रचार आज सायंकाळी थांबणार; सोमवारी मतदान
Ø जाहीर सभा आणि
पदयात्रांमुळे प्रचार शीगेला
Ø पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या चरित्रपटावरची बंदी हटवण्यास, सर्वोच्च न्यायालयाचा नकार
Ø स्वयंघोषित आध्यात्मिक
गुरु आसाराम याचा मुलगा नारायण साई लैंगिक शोषण प्रकरणी दोषी
आणि
Ø राज्याच्या तापमानात लक्षणीय वाढ
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातला प्रचार आज
सायंकाळी थांबणार आहे. या चौथ्या टप्प्यात राज्यातल्या मुंबईमधल्या सहा लोकसभा मतदारसंघांसह,
ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, धुळे, नंदुरबार, नाशिक, दिंडोरी, शिर्डी, मावळ आणि शिरुर
या १७ मतदार संघांचा समावेश आहे.
या सर्वच मतदार संघात प्रचार सभा आणि प्रचार फेऱ्यांनी
राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या सर्व मतदार संघात, परवा सोमवारी मतदान होणार आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
काल मुंबईत वांद्रे कुर्ला मैदानावर, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शिर्डी मतदार
संघात संगमनेर इथं, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक इथं जाहीर सभा घेतली.
पंतप्रधान मोदी यांनी, महायुतीच्या उमेदवारांसाठी
घेतलेल्या या सभेत, मध्यमवर्गीय जनतेने केलेल्या सहकार्यामुळेच आपण गरीब वर्गासाठी
काम करू शकलो, असं सांगत, मध्यमवर्गीयांचे आभार मानले. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मध्यमवर्गाला
स्थान नसल्याची टीका पंतप्रधानांनी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी
केलेल्या भाषणात, देव-देश आणि धर्म हाच महायुतीचा सामाईक कार्यक्रम असल्याचं सांगितलं.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शिर्डी मतदार
संघातले उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ संगमनेर इथं सभा घेतली. कोट्यवधीचं
कर्ज बुडवून मोठे उद्योजक देशाबाहेर पसार होतात, मात्र वीस हजार रुपये कर्जाची परतफेड
न करता आल्यास, शेतकऱ्याला तुरुंगात टाकतात. मात्र आपलं सरकार आल्यास, थकबाकीदार शेतकऱ्याला
अटक करता येणार नाही, असा कायदा करणार असल्याचं, राहुल गांधी यांनी सांगितलं.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी
नाशिक इथं घेतलेल्या सभेत, सत्ता आल्यावर भाजपला जनतेचा विसर पडल्याची टीका केली. कांदा,
पाणी आदी मुद्यांवरूनही त्यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल धुळ्यात,
भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली.
केंद्र सरकारच्या थेट लाभ हस्तांतरण योजनेमुळे दलालांची फळी उद्ध्वस्त झाली असून, गरीबीवर
थेट प्रहार केल्याचं, ते म्हणाले. शिर्डी मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे
यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी काल शिर्डीतही सभा घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची डोंबिवलीत
सभा झाली, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मोदी सरकारनं कोणतंही पाऊल उचललं नाही, अशी
टीका पवार यांनी या सभेत केली.
मोदी पुन्हा निवडून आले तर देशातली लोकशाही संपेल,
पुन्हा निवडणुका होणार नाहीत. अशी भीती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त
केली आहे. ते काल धुळे इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. पुलवामा हल्ल्याच्या चौकशीची
मागणी त्यांनी यावेळी केली.
****
उत्तर प्रदेश वाराणसी मतदार संघातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय,
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचा स्वत:चा असल्याचं, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते
सॅम पित्रोदा यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल जयपूर इथं, पत्रकारांशी बोलत होते. सध्या
प्रियंका यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या असल्याने, त्यांनी निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय
घेतल्याचं, पित्रोदा यांनी सांगितलं. या मतदार संघातून काँग्रेसनं गेल्यावेळचे उमेदवार
अजय राय यांनाच उमेदवारी दिली आहे.
दरम्यान, मोदी यांनी काल वाराणसी मतदार संघातून उमेदवारी
अर्ज दाखल केला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटकपक्षाचे नेते यावेळी उपस्थित होते.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरित्रपटावर निवडणूक
आयोगानं घातलेली बंदी हटवण्यास, सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. निवडणूक आयोगाच्या
या बंदी आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. निवडणूक
आयोगाच्या या निर्णयात हस्तक्षेप करण्यास न्यायालयानं नकार दिला. आयोगानं, सातव्या
आणि अखेरच्या टप्प्यातली मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, म्हणजे येत्या १९ मे पर्यंत
हा चित्रपट प्रदर्शित करण्यास बंदी घातली आहे.
****
भाजप प्रणीत केंद्र तसंच राज्य सरकारनं, शिर्डीच्या
साईबाबा संस्थानच्या विकासासाठी असलेला तीन हजार कोटी रुपये निधी अडवून ठेवला असल्याचा
आरोप, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. ते काल शिर्डीत पत्रकारांशी
बोलत होते. समाधी शताब्दी वर्षात मंजूर झालेल्या या निधीपैकी केंद्र किंवा राज्य सरकारनी
एक रुपयाही जारी केलेला नसल्याचं, चव्हाण म्हणाले.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु नारायण साई याला गुजरात
मधल्या सुरत सत्र न्यायालयानं, लैंगिक अत्याचार प्रकरणात दोषी ठरवलं आहे. सुरत इथं
राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींनी नारायण साईविरोधात या बाबत ऑक्टोबर २०१३ मध्ये लैंगिक
शोषण केल्याची तक्रार केली होती. २००२ ते २००५ पर्यंत सातत्याने लैंगिक शोषण करण्यात
आल्याचा आरोप पीडितेने नारायणवर केला होता. येत्या ३० तारखेला त्याला या प्रकरणी शिक्षा
सुनावण्यात येणार आहे. नारायण साई हा तथाकथित आधात्मिक गुरु आसाराम याचा मुलगा आहे.
आसारामही लैंगिक अत्याचार प्रकरणात गेल्या सुमारे सहा वर्षांपासून, जोधपूर तुरुंगात
आहे.
****
राज्यात काल अनेक ठिकाणी तापमानात लक्षणीय वाढ झाल्याचं
दिसून आलं. अकोला इथं काल ४६ पूर्णांक ४ दशांश सेल्शियस इतकं तापमान नोंदवलं गेल. सोलापूर,
परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांमधे ४४ अंश, जालना आणि औरंगाबाद इथं ४३ अंश तर
नाशिक इथं ४१ अंश सेल्शियस तापमानाची नोंद झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
पुढच्या काही दिवसांत औरंगाबाद आणि परिसरात तापमान
४४ अंशांवर जाण्याची शक्यता, हवामान खात्यानं वर्तवली आहे. नागरिकांनी वाढत्या उन्हापासून
बचावाचे उपाय करावेत, कडक उन्हाच्या वेळात घराबाहेर पडणं टाळावं, असं आवाहन करण्यात
आलं आहे.
****
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी - ईपीएफच्या व्याज
दरात वाढ झाली आहे. आता या योजनावर ८ पूर्णांक
६५ शतांश टक्के दरानं हे व्याज मिळेल. या आधी हा दर ८ पूर्णांक ५५ शतांश टक्के इतका
होता. भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ६ कोटी सदस्यांना याचा फायदा होणार आहे.
****
जळगाव लोकसभा मतदार संघातल्या भडगाव इथल्या एका मतदान
केंद्रावर चाचणी मतदान काढून न टाकताच, मतदान घेण्यात आल्याचा प्रकार निदर्शनास आला,
त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी मतदान केंद्रातल्या दोन कर्मचाऱ्यांना
निलंबित केलं आहे. या मतदान केंद्रावर सोमवारी फेरमतदान होणार आहे.
****
मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी नाविन्यपूर्ण
कृती कार्यक्रम तयार करून अंमलात आणण्याचं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
यांनी केलं आहे. ते काल नांदेड इथं, यासंदर्भात आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत बोलत होते.
अभ्यासात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन पर्याय सुचवण्याचं आवाहनही त्यांनी
यावेळी केलं.
****
लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी काल प्रधानमंत्री
मातृ वंदना योजनेचा आढावा घेतला. जिल्ह्यातल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये
रुग्णांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
****
परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा नदी पात्रातून अवैधरित्या
वाळू उत्खनन करणारी बोट महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल ताब्यात घेतली. या प्रकरणी
चार जणांविरुद्ध जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना अटक
करण्यात आली आहे.
****
बीड जिल्ह्यात पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी सर्वंकष
उपाययोजना कराव्यात असे निर्देश राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे अतिरिक्त
मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात
झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पर्यायी जलस्रोतांसह विविध बाबींचा त्यांनी आढावा घेतला.
****
नांदेड शहरातल्या गोदावरी नदीच्या शुद्धीकरण मोहिमेला
कालपासून सुरुवात झाली. शुद्धीकरणाच्या कामामध्ये प्रशासनासह सामाजिक कार्यकर्तेही
सहभागी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात वाकोडी इथं
कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी उत्तम ताराचंद आडे याना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने
काल छापा टाकून त्यांना अटक केली. आडे यांनी, विहीर योजनेची संचिका मंजूर करून देण्यासाठी
दहा हजार रुपये लाच मागितल्याचा तसंच ती मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्यानं, ही कारवाई
झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुभाष धोटे यांनी
आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजुरा इथल्या आदिवासी वसतिगृहातल्या अल्पवयीन मुलींवरील
अत्याचार संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर होत असलेल्या टीकेमुळे
त्यांनी हा निर्णय घेतला.
****
औरंगाबाद महापालिकेच्या स्थायी समितीवर नगरसेवक सचिन
खैरे, राजेंद्र जंजाळ, राजू शिंदे यांच्यासह आठ जणांची काल वर्णी लागली. स्थायी समिती
आणि विषय समितींवर सदस्य नियुक्त काल करण्यात आली. त्यासाठी महापालिकेची विशेष सर्वसाधारण
सभा काल आयोजित करण्यात आली होती.
*****
***
No comments:
Post a Comment