Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 April 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६
एप्रिल २०१९ सायंकाळी ६.००
****
स्वयंघोषित आध्यात्मिक
गुरु नारायण साई याला आज गुजरात मधल्या सुरत सत्र न्यायालयानं, लैंगिक अत्याचार प्रकरणात
दोषी ठरवलं आहे. सुरत इथं राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींनी नारायण साईविरोधात ऑक्टोबर
२०१३ मध्ये लैंगिक शोषण केल्याची तक्रार केली होती. २००२ ते २००५ पर्यंत सातत्याने
लैंगिक शोषण करण्यात आल्याचा आरोप पीडितेने नारायणवर केला होता. या प्रकरणी सुरत सत्र
न्यायालयानं नारायण साईला दोषी ठरवलं असून, येत्या ३० तारखेला त्याला या प्रकरणी शिक्षा
सुनावण्यात येणार आहे. नारायण साई हा तथाकथित आधात्मिक गुरु आसाराम याचा मुलगा आहे.
आसारामही लैंगिक अत्याचार प्रकरणात गेल्या सुमारे सहा वर्षांपासून, जोधपूर तुरुंगात
आहे.
****
पंजाब नॅशनल
बँकेत सुमारे १३ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार करुन फरार झालेला हिरे व्यापारी नीरव
मोदी याला, लंडन न्यायालयानं जामीन नाकारला आहे. त्याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत
२४ मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. नीरव मोदी विरोधात गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात
इंटरपोल नोटीस जारी करण्यात आली होती, त्यानंतर गेल्या १९ मार्चरोजी त्याला लंडनमध्ये
स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अटक केली, तेव्हापासून तो लंडनमध्ये तुरुंगात बंद आहे.
दरम्यान, सक्तवसूली
संचालनालयानं, नीरव मोदी आणि मेहुल चोकसीच्या १२ आलिशान चारचाकी गाड्यांचा ऑनलाईन लिलाव
केल्याचं वृत्त आहे.
****
केंद्र सरकारनं
निर्भया निधी अंतर्गत महिला सुरक्षेसंबंधी विविध योजनांसाठी चार हजार कोटी रुपये निधी
मंजूर केला आहे. यापैकी मुंबई, दिल्ली सह आठ शहरात महिलांना सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा
उपलब्ध करून देण्यासाठी सर्वाधिक दोन हजार नऊशे एकोणीस कोटी रुपये निधी मंजूर केल्याचं,
गृह मंत्रालयाच्या यासंबंधीच्या दस्तावेजात म्हटलं आहे. या योजनेअंतर्गत लैंगिक अत्याचार
तसंच अॅसीड हल्ल्यातल्या पीडितेला आर्थिक मदत देणं, तसंच महिला आणि बालकांसाठी विशेष
पोलिस यंत्रणा उभारणं, आदी कामं केली जातात.
****
आयएनएस विक्रमादित्य
या युद्धनौकेवर आज आग लागून एका नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. ही युद्धनौका, कर्नाटकात
नौदलाच्या कारवार या तळाकडे जात असताना, ही दुर्घटना घडली. लेफ्टनंट कमांडर डी. एस.
चौहान हे या घटनेत जखमी झाले, त्यांना नौदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं,
मात्र गंभीररित्या होरपळल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात
आले आहेत.
****
वाशिम जिल्ह्यातल्या सुमारे २३ कंत्राटदार आणि ४ संस्थांना जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागानं काळ्या यादीत टाकलं आहे. बांधकाम विभागामार्फत ग्रामिण
भागातील रस्ते, इमारती, बांधकामाचे कंत्राट दिल्यावर, प्रशासनानं पाठपूरावा करुनही
ही कामं रखडली असल्यामुळे मुख्य कार्यकारी आधिकारी दीपक कुमार मिना यांनी या प्रकरणाची
दखल घेत ही कारवाई केल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं कळवली आहे.
****
जळगाव लोकसभा मतदार संघातल्या भडगाव इथल्या एका मतदान केंद्रावर
चाचणी मतदान काढून न टाकताच, मतदान घेण्यात आल्याचा प्रकार निदर्शनास आला, त्यामुळे
निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी मतदान केंद्रातल्या दोन कर्मचाऱ्यांना
निलंबित केलं आहे.
****
येत्या ३ मे पासून भंडारदरा आणि निळवंडे धरणातून अहमदनगर
जिल्ह्यातल्या श्रीरामपूर पर्यंत पिण्यासाठी, पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार असल्याची
माहिती अहमदनगरच्या पाटबंधारे विभागाचे अधिकारी किरण देशमुख यांनी दिली आहे. सध्या
भंडारदरा धरणात एक हजार सहाशे दोन दशलक्ष घनफूट तर निळवंडे धरणात एक हजार एकशे बेचाळीस
दशलक्ष घनफुट पाणी आहे.
****
बीड जिल्हयात पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी
सर्वंकष उपाययोजना कराव्यात असे निर्देश राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे
अतिरिक्त मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन
सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पर्यायी जलस्रोतांसह विविध बाबींचा त्यांनी
आढावा घेतला.
****
वाशिम इथले जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयातले
तांत्रिक आधिकारी संदीप मोरे यांना पाच हजार रुपये लाच घेताना आज रंगेहाथ अटक करण्यात
आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment