Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 August 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ ऑगस्ट २०२० सकाळी ७.१० मि.
****
**
मास्क न वापरणाऱ्या बेजबाबदार लोकांमुळे कोविडचा संसर्ग वाढल्याचा भारतीय आयुर्विज्ञान
संशोधन संस्थेचा दावा
**
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचं येत्या सात आणि आठ सप्टेंबरला
फक्त दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन
**
रायगड जिल्ह्यातल्या महाड इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या १३; मृतांच्या नातेवाईकांना
प्रत्येकी पाच लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर
**
राज्यात दहा हजार ४२५ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण, तर काल दिवसभरात ३२९ रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू
**
मराठवाड्यातही २७ बाधितांचं निधन तर ९४५ नवे रुग्ण
**
आणि
**
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात विनामास्क आलेल्या पाच कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५००
रुपयांचा दंड
****
मास्क
न वापरणाऱ्या बेजबाबदार लोकांमुळे कोविडचा संसर्ग वाढला असल्याचा दावा भारतीय आयुर्विज्ञान
संशोधन संस्था - आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी म्हटलं आहे. ते काल दिल्लीत
पत्रकारांशी बोलत होते. तरुण किंवा वृद्धांमार्फत नव्हे, तर मास्क न वापरणाऱ्या तसंच
शारीरिक अंतर राखण्याचा नियम न पाळणाऱ्या बेजबाबदार लोकांमुळे देशात हा संसर्ग पसरत
असल्याचं, त्यांनी स्पष्ट सांगितलं. सेरो सर्वेक्षण चाचणीचा दुसरा टप्पा सप्टेंबर महिन्याच्या
पहिल्या आठवड्यात पूर्ण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
विधिमंडळाचं
पावसाळी अधिवेशन येत्या सात आणि आठ सप्टेंबरला मुंबईत होणार आहे. दोन दिवसांचं हे अधिवेशन
विधानसभेच्या सभागृहात भरवण्याचा निर्णय काल कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात
आला. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भरणाऱ्या या अधिवेशनात अतारांकित
प्रश्न, पुरवणी मागण्या, विनियोजन विधेयकं आदी कामकाज होणार आहे. या दोन दिवसीय अधिवेशनापूर्वी
सहा सप्टेंबरला सर्व सदस्यांची अँटीजन चाचणी केली जाणार आहे. ज्या सदस्यांना काही आजार
असतील त्यांना त्यांच्या पक्षांच्या गट नेत्यांकडून काळजी घेण्याची सूचना दिली जाणार
आहे. या अधिवेशनात मुख्य आसन व्यवस्थेसह प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीतही शारीरिक
अंतराचं नियम पाळून आसन व्यवस्था तयार केली जाणार आहे. प्रत्येक सदस्यांना कोरोनापासून
सुरक्षेसाठी सुरक्षा किट देण्यात येणार आहे.
****
राज्यातील
२५ हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या मोठ्या गावांत विकासासाठी नगरोत्थान
योजनेच्या धर्तीवर ग्रामोत्थान योजना तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी नियोजन आणि ग्रामविकास विभागाला दिले आहेत. राज्यातील मोठ्या ग्रामपंचायतींना
नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान उपलब्ध करुन देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या
अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या निर्णयामुळे राज्यातील जवळपास
तीनशे मोठ्या गावांच्या विकासाला चालना मिळणार आहे. ही योजना नियोजन विभाग आणि ग्रामविकास
विभागाव्दारे तयार करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन या योजनेला
निधी उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन लेखाशीर्ष उघडण्यात येणार आहे. या माध्यमातून सांडपाणी,
घनकचरा व्यवस्थापन, रस्त्यांची कामे, दिवाबत्ती, बाग बगीचे विकास यांसारखी नागरी सुविधांची
कामे केली जाणार आहेत.
****
रायगड
जिल्ह्यातल्या महाड इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या आता १३ झाली आहे. या सर्वांचे
मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची
शक्यता वर्तविली जात आहे. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत मृत झालेल्यांच्या
नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत राज्याचे
मदत आणि पुर्नवसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केली आहे. काल त्यांनी दुर्घटनाग्रस्त
इमारतीला भेट देऊन मदत आणि बचाव कार्याची माहिती घेतली.
****
कोविड
संसर्ग काळात बेरोजगारीची समस्या निर्माण झालेली असतांना कौशल्य विकास, रोजगार आणि
उद्योजकता विभागानं ३९ हजार २८७ बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला असल्याची माहिती
विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. विभागानं टाळेबंदीच्या काळात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये
आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे आणि महास्वयंम वेबपोर्टलमार्फत हा रोजगार उपलब्ध
झाला आहे. कौशल्य विकास विभागाच्या विविध व्यासपीठांवर ५८ हजार १५७ बेरोजगारांनी रोजगारासाठी
नोंदणी केली असून यांसह आधी नोंदणी केलेल्या सर्व उमेदवारांना नोकरी मिळवून देण्यासाठी
विभाग प्रयत्न करत असल्याचंही मलिक म्हणाले.
****
फेब्रुवारी
२०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएनं काल आरोपपत्र
दाखल केलं. यामध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर, त्याचे
नातलग अम्मर अली, आणि अब्दुल रऊफ या तिघांसह १९ जणांविरोधात दोषारोप ठेवण्यात आले आहेत.
यापैकी सात दहशतवादी आतापर्यंतच्या विविध कारवायांमध्ये मारले गेले आहेत, सात जणांना
अटक करण्यात आली आहे, तर दोघे अद्याप फरार आहेत. फेब्रुवारी २०१९ मध्ये केंद्रीय राखीव
पोलीस दल - सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या या आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० पोलीस
हुतात्मा झाले होते.
****
वैद्यकीय
तसंच अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेशासाठी होणाऱ्या एनईईटी तसंच जेईई च्या परीक्षाकेंद्रांमध्ये
वाढ करण्यात आली आहे. जेईई साठीच्या परीक्षा केंद्रांची संख्या ५७० वरून ६६० तर एनईईटीच्या
परीक्षा केंद्रांची संख्या २ हजार ५४६ वरून ३ हजार ८४३ करण्यात आली आहे. जेईई १ ते
६ सप्टेंबर दरम्यान, तर एनईईटी १३ सप्टेंबरला होणार आहे.
****
कृषी
उत्पन्न बाजार समितीवरील उपकर आणि देखरेख खर्च कमी करावा, याबाबत कायदे सुटसुटीत करावेत
आदी मागण्यांसाठी काल राज्यभरातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या
होत्या. या एकदिवसीय लाक्षणिक बंदमधून भाजी-पाला, फळं आणि कांद्याच्या बाजारपेठा वगळण्यात
आल्या होत्या. नवी मुंबईतल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातल्या पाचपैकी
धान्य आणि मसाला बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला.
****
राज्यात
काल दहा हजार ४२५ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. तर दिवसभरात ३२९ रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे राज्यातली एकूण रुग्ण संख्या सात लाख तीन हजार ८२३
एवढी झाली आहे. तर मृतांची संख्या ही २२ हजार ७९४ एवढी झाली आहे. आतापर्यंत या आजारातून
पाच लाख १४ हजार ७९० रुग्ण बरे झाले आहेत तर सध्या एक लाख ६५ हजार ९२१ रुग्णांवर उपचार
सुरू आहेत.
****
मराठवाड्यात
काल २७ कोरोना विषाणू संसर्गानं बाधित झालेल्या रुग्णांचा मृत्यू झाला तर ९४५ नवे बाधित
रुग्ण आढळले आहेत.
औरंगाबाद
आणि लातूर जिल्ह्यात काल सात बाधितांचा मृत्यू झाला. औरंगाबादमध्ये ३२१ तर लातूर जिल्ह्यात १४१ नवीन रुग्ण आढळले.
बीड
जिल्ह्यात काल पाच रुग्णांचा कोविड संसर्गानं मृत्यू झाला, तर कोविड संसर्ग झालेले
नवे ७४ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात चार रुग्णांचा मृत्यू झाला तर १२६ नव्या कोरोना
विषाणू बाधितांची नोंद झाली. परभणी जिल्ह्यात दोन रुग्णांचा मृत्यू झाला तर नवे ८५
बाधित रुग्ण आढळून आले. जालना आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी एका कोरोना विषाणू बाधित
रुग्णांचा मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात ८१ तर हिंगोली जिल्ह्यात १३ नवे रुग्ण आढळले.
उस्मानाबाद जिल्ह्यातही १०४ नवे बाधित रुग्ण आढळले आहेत.
****
मुंबईत
काल ५८७ नवे रुग्ण आढळले तर ३५ रुग्णांचा मृत्यू झाला. पुण्यात एक हजार २२८ नवे रुग्ण
आढळले तर ३६ जणांचा मृत्यू झाला. सांगली २९३, सिंधुदुर्ग ४७, रत्नागिरी ८१, वाशिम २०
आणि गडचिरोलीत १२ नवे रुग्ण आढळले.
****
औरंगाबादच्या
जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीला मास्क न लावता उपस्थित असलेले वैजापूरचे वनपरिक्षेत्र
अधिकारी एम. के. रहाटवळ, सोयगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए. पी. मिसाळ, कन्नड वनपरिक्षेत्रच्या
अधिकारी छाया बाणखेले, वाहन चालक साईनाथ चंदनसे तसंच एका अभ्यागतास जिल्हाधिकारी सुनील
चव्हाण यांनी काल प्रत्येकी ५०० रुपये दंड ठोठावला. रोजगार हमी योजने अंतर्गत सामाजिक
वनीकरण विभागाच्या बैठकीसाठी हे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. मास्क न
वापरणाऱ्यांना पाचशे रुपये दंड आकारण्याचे आणि त्यानंतर त्यांना मास्क देण्याचे आदेश
जिल्हाधिकारी चव्हाण यांनी नुकतेच जारी केले आहेत.
****
परभणी
जिल्ह्यात गंगाखेड शहरात सोमवारी जमिनीतून आलेला आवाज हा भूकंपाचा नसून जमिनीखालील
वायुंचा असावा असा अंदाज भूजल सर्वेक्षण विभागानं व्यक्त केला आहे. हे वायु पाण्याच्या
पुर्नभरणामुळं होत असतात असं विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान, काल भूजल
सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवाज आलेल्या परिसराची पाहणी केली.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन आपत्ती
व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत.
नैसर्गिक संकटाच्या काळात करावयाच्या आपत्ती व्यवस्थापनाबाबतचा काल त्यांनी आढावा घेतला.
त्यावेळी ते बोलत होते. धरणात अधिक प्रमाणात येणाऱ्या पाण्याची आवक नियंत्रित ठेवण्यासाठी
करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेऊन नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्याचे
निर्देशही त्यांनी यावेळी संबंधितांना दिले.
जायकवाडी
धरणाची पाणी पातळी सध्या ८२ टक्क्यांपर्यंत पोहोचली असून, सध्या धरणात १२ हजार ९१६
घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे.
दरम्यान,
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या
'प्रतिसाद कक्षाचं' उद्घाटन काल जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या हस्ते झालं. कोरोना योद्धा
म्हणून काम करणाऱ्या जिल्ह्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचारी किंवा त्यांच्या परिवारातील
सदस्यांना कोविड-१९चा संसर्ग झाल्यास त्यांना तात्काळ आवश्यक मदत करण्यासाठी हा कक्ष
सुरू करण्यात आला आहे.
****
लातूर
महानगरपालिका उद्यापासून शहरातील विविध पाच केंद्रांवर अँटीजेन चाचण्या सुरू करत आहे.
यासाठी महापालिकेला रॅपिड अँटिजेन चाचणीचे १६ हजार संच प्राप्त झाले आहेत. कोरोना सदृश्य
लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींनी या केंद्रांवर आपली चाचणी करून घेण्याचं आवाहन महानगर
पालिका प्रशासनानं केलं आहे. दुसऱ्या टप्प्यातल्या या मोहिमेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर
समाज कल्याण वसतिगृह परिसर, पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन वसतीगृह, दयानंद महाविद्यालय,
जुने यशवंत विद्यालय आणि शिवछत्रपती ग्रंथालयात या चाचण्याची केंद्र असणार आहेत, असं
महापालिका प्रशासनानं कळवलं आहे.
****
हिंगोली
जिल्ह्यातील कुरुंदा इथं स्थापन पर्यावरणपूरक गणेशमूर्तीला फुल प्रसादाऐवजी झाडांची
रोपटी वाहिली जात आहेत. गेल्या दोन दिवसात भाविकांकडून शंभरापेक्षा अधिक झाडांची रोपं
जमा झाली आहेत. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर
कुरुंदा
नजीकच्या मातृतिर्थ टोकाई गडावर मागील चार वर्षापासून वृक्ष लागवडीचे काम पर्यावरणप्रेमींकडून
सुरू आहे. सिने कलावंत सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई प्रकल्पांतर्गत बारा हजार
झाडे लावली आहेत. तेथे ५० हजार वृक्ष लागवडीचे काम सुरू आहे. याच गडावर पर्यावरण पूरक
गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आलीय. जळतनाच्या लाकडांपासून ही श्रीं'ची मूर्ती साकारलीय.
येथे बेल, फूल, प्रसादाऐवजी बाप्पांना झाडे वाहण्यात येतात. भक्तांकडून दोन दिवसात
शंभरापेक्षा अधिक झाडे जमली आहेत . 'झाडे लावा, स्वतःला वाचवा 'हा संदेश मंडळाकडून
दिला जातोय. बेल फुल प्रसाद ऐवजी झाड मागणाऱ्या बाप्पाची जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू
झाल्याने भाविकांचा ओढा वाढलाय.
आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम ,हिंगोली.
****
नांदेड
जिल्ह्यात गणेशोत्सव विसर्जनांसंदर्भात जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी विशेष मार्गदर्शक
सूचना जारी केल्या आहेत. जिल्ह्यातल्या सर्व घरगुती आणि सार्वजनिक गणपतींचं विसर्जन
शक्यतो विसर्जनासाठी तयार केलेल्या कृत्रिम तलाव, हौदांमध्ये करावं. सार्वजनिक गणेशमंडळाच्या
ठिकाणी आणि मुर्ती संकलन केंद्राच्या ठिकाणी ५० वर्षांवरील नागरिकांना तसंच १० वर्षाखालील
मुलांना प्रवेश असणार नाही. त्याचप्रमाणे कोव्हीड -१९च्या नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या
अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांविरूद्ध कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई अथवा खटला दाखल
करता येणार नाही, असंही या आदेशात जिल्हादंडाधिकाऱ्यांनी नमूद केलं आहे.
****
डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्राला औद्योगिक वसाहतीच्या भूखंडासाठीचं
सेवा शुल्क तसंच पाच वर्षांत बांधकामाची अट शिथील करण्यात आली आहे. उद्योग मंत्री सुभाष
देसाई यांनी काल महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना
याबाबतचे आदेश दिले.
****
हिंगोली
जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्यातल्या गोळेगावमध्ये पोलिसांनी दोन लाख २५ हजार रूपये
किमतीचा गुटखा आणि एक दुचाकी जप्त केली. प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारावर पोलिसांनी
ही कारवाई केली. या माहितीच्या आधारावर सापळा रचला असता आरोपी दुचाकीवरून गुटख्याची
गोणी घेऊन जाताना पोलिसांना आढळला. त्यानंतर घराची तपासणी केली असता गुटख्याचे आठ पोते
तसंच दुचाकी जप्त करण्यात आली.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या भोकर इथं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजित इमारतीचं भूमिपूजन काल
करण्यात आलं. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण
यांच्या सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
व्हिडिओकॉन
उद्योग समूहातल्या कामगारांच्या मागण्यांसाठी कर्मचारी संघटनेनं पुकारलेल्या साखळी
उपोषणाला काल एक वर्ष पूर्ण झालं. मात्र कामगारांच्या मागण्या अद्यापही मान्य झालेल्या
नाहीत. या कामगारांनी काल औरंगाबाद शहरातल्या अनेक चौकात हातात फलक घेऊन याचा निषेध
केला. दरम्यान, संघटनेच्या नेत्यांनी काल दुपारी मुंबईत यासंदर्भात कामगार राज्य मंत्री
बच्चु कडू यांची भेट घेऊन त्यांना याबाबतच्या मागण्यांचं निवेदन सादर केलं.
****
बीड
इथं पावडर कोटिंगच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात कंपनी मालकाचा मृत्यू झाला, तर तीन
जण जखमी झाले. संतोष गिराम असं मृताचं नाव आहे. काल दुपारी ही दुर्घटना घडली.
****
बीड
जिल्ह्याच्या वडवणी तालुक्यात काल दोन शाळकरी मुलांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. रोहन
मस्के आणि लखन पोटभरे अशी या दोघांची नाव असून, ते अनुक्रमे १० आणि ११ वर्षांचे होते.
****
ज्येष्ठा
गौरी अर्थात महालक्ष्मी पूजनाच्या सणाला कालपासून प्रारंभ झाला. काल दुपारनंतर घरोघरी
ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं आगमन होऊन, सायंकाळच्या सुमारास त्यांची प्रतिष्ठापना करण्यात
आली. आजच्या गौरी पूजनाच्या पार्श्वभूमीवर काल बाजारात हार फुलं भाज्या तसंच विविध
पूजा साहित्य खरेदीसाठी महिलांची वर्दळ दिसून आली. नागरिकांनी कोविड प्रतिबंधाच्या
सर्व नियमांचं पालन करून, उत्सव साजरे करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
****
बुलडाणा
विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी काल मुंबईत भारतीय जनता पक्षात
प्रवेश केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.
****
सर्वपक्षीय
आमदारांच्या स्वीय सहाय्यकांतर्फे कोविड-१९ संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर मुख्यमंत्री
सहाय्यता निधी करिता ३ लाख ३७ हजार २४० रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे
काल सुपूर्द केला.
****
No comments:
Post a Comment