Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 August 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० ऑगस्ट २०२० सकाळी ७.१० मि.
****
·
टाळेबंदी उठवण्याच्या
चौथ्या टप्प्यातल्या केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी; सात सप्टेंबरपासून मेट्रो सुरू, २१ सप्टेंबर
पासून विविध कार्यक्रमांना १०० लोकांच्या उपस्थितीत परवानगी,
नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना
पालकाच्या परवानगीने शाळेत जाता येईल,
मात्र अन्य वर्ग बंदच राहणार. संपूर्ण रस्ते वाहतूक बंधमुक्त- ई पासची सक्ती नाही.
·
विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेच्या रुपरेषेबाबत राज्य
सरकार उद्या निर्णय घेणार
·
राष्ट्रीय
क्रीडा पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या
हस्ते वितरण; कुस्तीपटू राहुल आवारे, खो-खो पटू सारिका काळेसह राज्यातल्या अकरा खेळाडूंचा गौरव
·
धार्मिक
स्थळं सुरू करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचं राज्यात
ठिकठिकाणी घंटानाद आंदोलन
·
राज्यात
१६ हजार ८६७ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद, ३२८
जणांचा उपचारादरम्यान मृत्यू
·
मराठवाड्यातही
३८ बाधितांचा मृत्यू तर नव्या एक हजार २१० रुग्णांची नोंद
आणि
· जात वैधता प्रमाणपत्र विहित
मुदतीत सादर न केल्यामुळे हिंगोली जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र देशमुख
यांचं सदस्यत्व रद्द
****
टाळेबंदी उठवण्याच्या चौथ्या टप्प्याबाबत केंद्र सरकारनं काल मार्गदर्शक सूचना
जारी केल्या. एक सप्टेंबर ते ३० सप्टेंबर असा हा टप्पा असून, या काळात प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर क्षेत्रातले आणखी काही निर्बंध
शिथिल करण्यात आले आहेत. सात सप्टेंबर पासून मेट्रो रेल्वे सुरु करण्यास परवानगी
देण्यात आली आहे. सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा
विषयक, मनोरंजनात्मक, सांस्कृतिक,
धार्मिक, राजकीय, तसंच
खुल्या रंगमंचावर होणाऱ्या कार्यक्रमांना २१ सप्टेंबरपासून परवानगी देण्यात येईल,
तसंच या कार्यक्रमांसाठी जास्तीत जास्त शंभर लोक उपस्थित राहू शकतील,
असं सरकारनं सांगितलं आहे. यावेळी मास्क वापरणं, सामाजिक अंतर पाळणं यासारख्या नियमांचं पालन करणं बंधनकारक असल्याचं
सरकारनं स्पष्ट केलं आहे.
शाळा, महाविद्यालयं, खासगी
शिकवण्या तसंच इतर शैक्षणिक संस्था ३० सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. मात्र २१
सप्टेंबर पासून प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना
शाळेत आणि महाविद्यालयात जाता येईल, तसंच
याठिकाणी ५० टक्के शिक्षक तसंच कर्मचारीही उपस्थित राहू शकतील.
केंद्र आणि राज्य सरकार पुरस्कृत कौशल्य विकास केंद्र, औद्योगिक प्रशिक्षण संस्था - आयटीआय २१ सप्टेंबर पासून सुरु होणार आहेत.
पीएचडी करणाऱ्या आणि प्रयोगशाळेची आवश्यकता असणाऱ्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या
विद्यार्थ्यांना २१ सप्टेंबर पासून संबंधित महाविद्यालय किंवा संशोधन केंद्रात
जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.
राज्यांतर्गत किंवा आंतरराज्य वाहतुकीला कोणतंही बंधन नाही, किंवा यासाठी ई पासची आवश्यकता नाही, असंही केंद्र
सरकारनं स्पष्ट केलं आहे. राज्यांनी प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात स्थानिक
टाळेबंदी लागू करु नये, असंही या आदेशात म्हटलं आहे.
****
विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांच्या
रुपरेषेबाबत उद्या सोमवारी निर्णय जाहीर केला जाईल, असं
राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सरकारचं प्राधान्य असून, सुरक्षेसंदर्भात
कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं सामंत यांनी
सांगितल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. याबाबतची सर्व
दक्षता घेऊन पदवी तसंच पदव्युत्तर परीक्षांचं आयोजन कसं केलं जाईल, याबाबतचा पहिला निर्णय उद्या जाहीर होईल, असं सामंत
यांनी सांगितलं. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेप्रमाणे ३० सप्टेंबरपर्यंत
परीक्षा घेता येऊ शकते का ? याबाबत निर्णय घेण्यासाठी
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची
समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती आज कुलगुरु आणि प्राचार्यांशी चर्चा करणार
असल्याची माहिती सामंत यांनी दिली.
विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ देणार असल्याचंही सामंत यांनी
सांगितलं. परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवू नयेत, सरकार योग्य वेळी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करेल, असंही
सामंत यांनी सांगितलं आहे.
****
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं काल राष्ट्रीय क्रीडा दिनी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृश्य
संवाद प्रणालीच्या माध्यमातून वितरण करण्यात आलं. राज्यातल्या अकरा खेळाडूंना या
सोहळ्यात गौरवण्यात आलं. कुस्तीपटू राहुल आवारे, खो-खो
पटू सारिका काळे, टेबल टेनिसपटू मधुरिका पाटकर, नौकानयनपटू दत्तू भोकनाळ, घोडेस्वार अजय सावंत,
दिव्यांग जलतरणपटू सुयश जाधव आणि बॅडमिंटनसाठी चिराग शेट्टी या
क्रीडापटूंना अर्जून पुरस्कार प्रदान करण्यात आले. बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे,
तृप्ती मरगंडे आणि दिव्यांग बॅडमिंटनपटू सत्यप्रकाश तिवारी यांना
ध्यानचंद पुरस्कारानं तर विजय मुनिश्वर यांना द्रोणाचार्य पुरस्कारानं गौरवण्यात
आलं. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
अभिनंदन केलं आहे.
****
उस्मानाबादची खो-खो पटू सारिका काळे हिनं शालेय जीवनापासून खो खो खेळाची आवड
जोपासत सराव आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर अर्जुन पुरस्कार पटकवला. याविषयी
अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर…
उस्मानाबाद सारख्या अविकसित जिल्ह्यात खो - खो खेळाच्या
सातत्यपूर्ण मेहनतिने सारिकाने मिळवलेलं हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे. खेळांकडे विशेष
लक्ष दिल्यास स्वतःबरोबरच देशाचाही सन्मान वाढतो असा विश्वास सारिका काळे हिने व्यक्त
केला आहे
उस्मानाबाद बघायला गेलं तर
ग्रामीण भाग आणि त्या ग्रामीण भागातून मी आज खो-खो या खेळामुळे राज्यात नाहीतर पूर्ण
देशभरात आज माझं नाव झालं आहे. आज सन्मानित झालेलो आहे. याचा मला सांगतांना अभिमान
वाटतो. आणि मी एक मेसेज देवू इच्छिते की अभ्यासामध्ये जसं करिअर होतं तसं खेळामध्येही
सर्वोत्तम करिअर होवू शकतं याचं ज्वलंत उदाहरण स्वत: मी आहे.
सारिका
काळे हिला घडवणारे प्रशिक्षक प्राध्यापक डॉक्टर चंद्रजित जाधव यांनी हा पुरस्कार देशातील
सर्व देशवासीयांचा पुरस्कार असल्याचं म्हटले आहे. देविदास पाठक आकाशवाणी वार्ताहर उस्मानाबाद
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद
साधणार आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून रविवारी सकाळी ११
वाजता हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. या कार्यक्रम मालिकेच्या दुसऱ्या
टप्प्यातला हा पंधरावा भाग आहे.
****
धार्मिक स्थळं पुन्हा उघडली जावीत या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं
काल राज्यात ठिकठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आलं. दोन दिवसात राज्यातली मंदिरं
उघडली नाही तर भारतीय जनता पक्षाकडून मंदिरं उघडण्यात येतील, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला.
मुंबईत झालेल्या आंदोलनावेळी दरेकर बोलत होते. केंद्र सरकारनं संपूर्ण देशभर
मंदिरं, मशिदी, चर्च अशी सर्व
प्रार्थनास्थळं सुरु करायला परवानगी दिली आणि ती सुरूही झाली आहेत, असं ते म्हणाले.
औरंगाबाद इथं भाजप जिल्हाध्यक्ष संजय केनेकर, खासदार
डॉ.भागवत कराड, आमदार अतुल सावे यांच्या नेतृत्वात शहरातल्या
प्रमुख देवस्थानं, धार्मिक स्थळांसमोर आंदोलन करण्यात
आलं. जालना शहरातल्या मस्तगड इथल्या मंमादेवी मंदिरासमोर तसंच
जिल्ह्यातल्या परतूर, भोकरदन, बदनापूर आणि
जाफ्राबाद इथं आंदोलन करण्यात आलं. उस्मानाबाद इथं ग्रामदैवत धारासूर मर्दिनीचं
मंदिर उघडावं, तसंच जॉन मलेलू चर्च, जैन
मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी आंदोलन झालं. तुळजापूर इथं तुळजाभवानी मंदिरासमोर
आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. हिंगोली
जिल्ह्यातलं श्री क्षेत्र औंढानागनाथ मंदिर सुरु करावं यासाठी किसान मोर्चाचे
राज्य उपाध्यक्ष सुरजीतसिंह ठाकूर यांच्यासह अन्य नेत्यांच्या उपस्थितीत आंदोलन
करण्यात आलं. लातूर जिल्ह्यातल्या औसा इथं आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वात
आंदोलन करण्यात आलं. परभणी जिल्ह्यातही अनेक मंदिरासमोर भाजपा, विश्वहिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते
आणि इतरांनी या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
****
राज्यात काल १६ हजार ८६७ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या सात लाख ६४ हजार २८१ झाली आहे. काल
३२८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत २४
हजार १०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल ११ हजार ५४१ रुग्ण बरे झाल्यानं
त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत पाच लाख ५४ हजार ७११ रुग्ण कोरोना
विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ८५ हजार १३१ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ३८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या एक हजार २१० रुग्णांची नोंद झाली.
बीड जिल्ह्यात आठ जणांचा मृत्यू झाला, तर आणखी ९४ रुग्णांची नोंद झाली. लातूर
जिल्ह्यात सात रुग्णांचा मृत्यू झाला, तर नवे १८३ रुग्ण आढळले. जालना जिल्ह्यात
काल सहा रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी ९८ रुग्ण
आढळले. परभणी जिल्ह्यात काल पाच रुग्णांचा मृत्यू झाला, तर
५४ नव्या रुग्णांची नोंद झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातही काल पाच रुग्णांचा मृत्यू
झाला, तर १४५ नवे रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात काल तीन
रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २६९ रुग्णांची भर पडली.
औरंगाबाद जिल्ह्यातही काल तीन जणांचा मृत्यू झाला, तर आणखी ३६२ रुग्ण आढळले.
हिंगोली जिल्ह्यातही काल एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला, तर
नव्या पाच रुग्णांची नोंद झाली.
****
पुणे
जिल्ह्यात काल चार हजार ७० कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ७३ जणांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. मुंबईत एक हजार ४३२ रुग्णांची नोंद झाली, तर ३१ जणांचा मृत्यू झाला. नाशिक
जिल्ह्यात एक हजार २७४ नवे रुग्ण, तर १७ मृत्यूंची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात ९२१,
अहमदनगर ६३२, सातारा ६१९, सांगली ५७५, जळगाव ५६६, पालघर २३०, चंद्रपूर १७८, बुलडाणा
७२, रत्नागिरी ७१, वाशिम ४५, गडचिरोली २९, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल आणखी २२ कोरोना
विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली.
****
नांदेड इथल्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कालपासून
प्लाझ्मा उपचार पद्धतीला सुरुवात झाली. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख
यांनी ही माहिती दिली. ही उपचार पद्धती सुरु करण्याचे निर्देश जिल्ह्याचे
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले होते.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या आंबा जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र देशमुख यांचं जात
वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्याचा ठपका ठेवत त्यांचं सदस्यत्व रद्द
करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत. २०१७ मध्ये झालेल्या
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये
आंबा गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव होता, राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे राजेंद्र देशमुख यांचं जात प्रमाणपत्र निवडणूक डोळ्यासमोर ठेवून
काढलेलं असून त्यांच्याकडे जातीचे ठोस पुरावे नसल्याची लेखी तक्रार त्यांच्या
प्रतिस्पर्धी शिल्पा भोसले यांनी केली होती.
****
लातूर इथल्या वसुंधरा प्रतिष्ठान आणि संस्काररत्न इंग्रजी माध्यमाच्या
शाळेच्या वतीनं शहरातल्या आदर्श कॉलनी भागात वृक्षरूपी गणराय साकारण्यात आले आहेत.
उंबराच्या झाडाला गणपतीचं रूप देण्यात आलं असून 'वृक्ष
संवर्धन ही काळाची गरज' हा संदेश यातून दिला जात आहे. गेल्या
तीन वर्षांपासून हा वृक्षरूपी गणराय साकारण्यात येत असल्याचं शिक्षक योगेश शर्मा
यांनी सांगितलं. ते म्हणाले…
वृक्ष
उत्सव आम्ही साजरा करतो. नोंदणी केलेल्या प्रत्येक गणेश मंडळाला आम्ही ११ वृक्ष याठिकाणी
मोफत देवून बप्पांच्या नावानं संगोपन करावं अशी विनंती करतोय. मी दगडात नाही, देवळात
नाही मी झाडात आहे. असा संदेश देणारा हा वृक्षरुपी गणराय सर्वांचं आर्कषण ठरतो आहे.
आणि कोरोना असल्यामुळे या गणेशाचं आम्ही ऑनलाईन दर्शन भाविकांसाठी या ठिकाणी ठेवलं
आहे.
****
येत्या एक सप्टेंबरला गणपती विसर्जनाच्या दिवशी जनतेनं प्रशासनाला सहकार्य
करुन संकलन केंद्रांकडेच गणेशमूर्ती सुपूर्द कराव्यात असं आवाहन नांदेड
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केलं आहे. नागरिकांनी तसंच सार्वजनिक
गणेशोत्सव मंडळांनी महापालिकेतर्फे विविध ठिकाणी स्थापन केल्या जाणाऱ्या मूर्ती
संकलन केंद्रात मूर्ती द्याव्यात असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केलं आहे.
****
औरंगाबाद
इथलं जायकवाडी प्रकल्प मंडळाचं मुख्यालय लातूर इथं स्थलात्तरीत करण्यास शासनानं मंजुरी
दिली आहे. लाभक्षेत्र विकास प्राधीकरण असं या कार्यालयाचं नाव असेल. या माध्यमातून
या परीसरातले सिंचन प्रकल्प मार्गी लावून दुष्काळी परिस्थिती तसंच पाणीटंचाईवर कायमस्वरूपी
मात करण्यासाठी योजना राबवल्या जाणार आहेत.
तसंच
बीड जिल्ह्यातल्या परळी पाटबंधारे विभागात आता परळी पाटबंधारे मंडळासह माजलगाव कालवा
विभाग क्रमांक सात, गंगाखेडसह एकूण चार उपविभाग जोडण्यात आले आहेत. त्याचबरोबर अतिरिक्त
२९ उपविभागांचं कामकाजही आता परळी येथून चालवलं जाणार आहे.
****
औरंगाबाद शहरासह परिसरात काल दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. शहरानजिक असलेला
हर्सुल तलाव आता पूर्ण भरला असून कुठल्याही क्षणी त्याच्या सांडव्यावरुन पाणी
वाहण्यास सुरुवात होईल, त्यामुळे महापालिकेनं सांडव्याशेजारील
नागरिकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे.
****
जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातल्या दगडवाडी इथं एका
गोठ्यावर वीज कोसळून लागलेल्या आगीत एका बैलजोडीसह अकरा शेळ्या आणि काही कोंबड्या होरपळून दगावल्या. काल पहाटेच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत
अल्पभूधारक शेतकरी गणेश पांडे यांचं सुमारे चार लाख रुपयांचं नुकसान झालं.
****
औरंगाबाद शहरात जिल्हाधिकारी
सुनील चव्हाण यांनी औषधी दुकांनाची तपासणी करत, बेकायदेशीर औषधी
विकणाऱ्या दुकानांविरुद्ध कारवाई केली. अन्न आणि औषध प्रशासन तसंच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रतिनिधींच्या पथकांचा
यात समावेश होता.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर इथल्या महाबीजच्या
कार्यालयासमोर काल भारतीय जनता पक्षाच्या वतीनं,
बोगस बियाणे प्रकरणी निदर्शनं करण्यात आली. आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वात
करण्यात आलेल्या या आंदोलनात, दोषींविरुद्ध तत्काळ कारवाई
करावी, तसंच बोगस बियाणांचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना
नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली.
****
हिंगोली जिल्ह्यात परभणी - हिंगोली मार्गावरील हट्टा गावाजवळ पोलिसांनी १८ लाख
७१ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. एका वाहनातून हा गुटखा नेला जात असल्याची
माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
//************//
No comments:
Post a Comment