Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 August 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ ऑगस्ट २०२० सायंकाळी ६.००
****
** नीट आणि जेईई परीक्षा
घेण्यास परवानगी देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर सहा राज्यांची पुनर्विचार
याचिका
** अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत चर्चा
करून निर्णय घेणार - उच्च आणि तंत्र शिक्षण
मंत्री उदय सामंत
**
औरंगाबाद इथं आज पाच कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू
आणि
**
जालना इथं
बियाणे महामंडळाच्या कार्यालयासमोर सोयाबीच्या बोगस बियाण्याची होळी
****
केंद्र
सरकारला नीट आणि जेईई परीक्षा घेण्यास परवानगी देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत
सहा राज्यांच्या मंत्र्यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र सरकारमधले
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह पश्चिम बंगाल, राजस्थान, झारखंड,
छत्तीसगड आणि पंजाब राज्य सरकारच्या मंत्र्यांचा याचिकाकर्त्यांमध्ये समावेश आहे. अभियांत्रिकी
आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पात्रता प्रवेश परीक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं
१७ ऑगस्टला दिलेल्या निकालात, आयुष्य पुढे जात राहिलं पाहिजे असं सांगतानाच, विद्यार्थ्यांचं
महत्त्वाचं वर्ष वाया जायला नको, असं म्हटलं होतं. मात्र हा निर्णय देताना, विद्यार्थ्यांच्या
सुरक्षेबाबत विचार झाला नसल्याचं, आज दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेत म्हटलं आहे.
जेईई
परीक्षा येत्या १ ते ६ सप्टेंबरदरम्यान, तर नीट परीक्षा १३ सप्टेंबरला होणार आहे.
****
दरम्यान, विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा राज्य शासन आदर करत असून यासंदर्भात
विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत चर्चा करून परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री
उदय सामंत यांनी म्हटलं आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्याशिवाय
राज्यं किंवा विद्यापीठं विद्यार्थ्यांना बढती देऊ शकत नाहीत, असं सर्वोच्च न्यायालयानं
म्हटलं आहे. या निकालाबाबत बोलताना सामंत
यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देणं आवश्यक असल्याचं नमूद करत, या
परिस्थितीत परीक्षा घेतल्या गेल्यास, विद्यार्थ्यांना संसर्ग व्हायला नको, याकडेही
सामंत यांनी लक्ष वेधलं.
****
दरम्यान, अंतिम वर्षाच्या परीक्षा
घेण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं, केंद्रीय
माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्वागत केलं आहे. या
विषयावरील वाद आता शांत होईल अशी आशा त्यांनी ट्वीट संदेशातून व्यक्त केली आहे.
****
पुण्यात
झालेल्या एलगार परिषद तसंच भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या कार्यकर्त्या
सुधा भारद्वाज यांना जामीन मंजूर करण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. आपल्याला
मधुमेह तसंच उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यानं, तुरुंगात कोरोना विषाणू संक्रमण होण्याचा
धोका असल्यानं, जामीन देण्याची मागणी भारद्वाज यांनी केली होती. मात्र राष्ट्रीय तपास
यंत्रणा आणि राज्य सरकारने भारद्वाज यांना सर्व वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात असून,
कोविड संसर्गापासून बचावाची पूर्ण काळजी घेतली जात असल्याचं न्यायालयाला सांगितलं.
याच प्रकरणातले अन्य एक आरोपी वरवरा राव यांना गरज भासल्यावर आधी राज्य सरकारच्या जेजे
रुग्णालयात आणि त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल केल्याचं सांगताना, भारद्वाज यांनाही
गरज भासल्यास, अशा सुविधा दिल्या जातील, असं सांगण्यात आलं.
****
अभिनेता सुशांतसिंह राजपुत मृत्यू प्रकरणात केंद्रीय अन्वेषण
विभाग सीबीआयकडून सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्तीची आज चौकशी सुरू आहे.
सीबीआयने रियाला चौकशीसाठी बोलावण्याची ही पहिलीच वेळ आहे. सीबीआयने काल रियाचा भाऊ
शौविक चक्रवर्ती याची या प्रकरणी सुमारे आठ तास चौकशी केली.
****
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष
ओम बिर्ला यांनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आरोग्य
मंत्रालय तसंच संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पावसाळी अधिवेशनासाठी सर्व सदस्यांकरता योग्य अंतर राखून आसन व्यवस्थेसह अन्य मुद्यांवर
या बैठकीत चर्चा झाली. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या चौदा सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान
होण्याची शक्यता असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
सफाई कामगारांचे विविध प्रश्न आणि
समस्या सोडवण्यासाठी सामाजिक न्याय विभागात स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती
विचाराधीन असल्याचं, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी
म्हटलं आहे. सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात आज मंत्रालयात झालेल्या
बैठकीत ते बोलत होते. सफाई कामगारांबाबतचा लाड-पागे समितीचा
अहवाल आणि सद्यस्थिती यांचा समन्वय साधून योग्य निर्णय घेतला जाईल, असं मुंडे
यांनी सांगितलं. कामगारांच्या निवाऱ्याचा प्रश्न, तसंच वारसा हक्क
नियुक्तीसंदर्भातला प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुंडे
म्हणाले.
****
राज्य
पोलीस दलात आणखी ३४६ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत कोविड
संसर्ग झालेल्या पोलिसांची संख्या १४ हजार ६४१ झाली आहे. गेल्या २४ तासांत दोन पोलिसांचा
या संसर्गानं मृत्यू झाला, आतापर्यंत या संसर्गानं १४८ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
****
औरंगाबाद
इथं आज पाच कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये छावणी इथल्या ४२ वर्षीय,
उल्कानगरी इथल्या ७८ वर्षीय, लासूर स्टेशन इथल्या ५२ वर्षीय, पुरुष रूग्ण आणि गोलटगाव
इथल्या ३४ वर्षीय, सातारा परिसरातील ६४ वर्षीय महिला रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात
या संसर्गाने झालेल्या एकूण मृत्यूंची संख्या आता ६७७ झाली आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळच्या सत्रात कोरोना विषाणू
संसर्गाचे नवे ७८ रुग्ण आढळले. जिल्ह्यातील
कोविड बाधितांची एकूण संख्या आता २२ हजार
२६३ झाली आहे.
****
जालना जिल्ह्यात आज एका कोरोना विषाणू
बाधित पुरुष रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात या संसर्गानं मृत्यू झालेल्यांची संख्या
आता १३० झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात ६१ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले.
जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता चार हजार ४३१झाली आहे. दरम्यान, ८१ जणांना आज उपचारानंतर
रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर आतापर्यंत जिल्ह्यात तीन हजार १५९ रुग्ण या आजारातून
बरे झाले असून, सध्या एक हजार १४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
सोलापूर
जिल्ह्यात आज ५४ नवे कोविडग्रस्त आढळले. जुळे सोलापूर, कुमठा, विजयपूर रोड, रेल्वे
लाईन या परिसरात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. दरम्यान, सोलापूर इथं दोन रुग्णांचा आज
उपराचारादरम्यान मृत्यू झाला.
****
पालघर जिल्ह्यात आणखी ३२६ जणांना
कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण
रुग्ण संख्या २३ हजार ६४९ झाली आहे.
****
जालना इथं औद्योगिक वसाहतीमधल्या बियाणे
महामंडळाच्या कार्यालयासमोर आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं
बोगस सोयाबीन बियाण्याची होळी करून निषेध आंदोलन करण्यात आलं. बोगस सोयाबीन विक्री
प्रकरणातल्या बियाणे महामंडळाच्या दोषी अधिकाऱ्यांसह संबंधित बियाणे कंपन्यांवर तत्काळ कारवाई करावी, तसंच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना
हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी आमदार बबनराव
लोणीकर यांनी यावेळी केली. भाजपा युवा मोचार्च प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर
यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.
****
गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेचा
लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा यासाठी कृषी विभागानं पुढाकार घेण्याचं आवाहन
कृषी मंत्री दादा भुसे यांनी केलं आहे. ते आज नागपूर इथं झालेल्या आढावा बैठकीत
बोलत होते. शेतकऱ्यांसोबत होणाऱ्या अपघाताच्या वाढत्या घटना पाहता त्यांच्या
कुटुंबियांना तातडीनं मदत मिळण्यासाठी कृषी सहायकांनी अशा घटनांची स्वेच्छेनं नोंद
घेवून कार्यवाही करावी असंही ते म्हणाले.
****
भंडारा, गोंदिया,
गडचिरोली आणी चंद्रपूर जिल्ह्यात धान
खरेदीमध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणात तातडीनं विशेष चौकशी पथक स्थापन करून
दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. सात-बाऱ्याचे खोटे प्रमाणपत्र दाखवून शेतकऱ्यांना
धानासाठी मिळणारं अनुदान लाटण्याचा प्रकार अतिशय गंभीर असल्याचं ते म्हणाले.
यासंदर्भात मुंबई इथं झालेल्या उच्चस्तरीय बैठकीस भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री
डॉ.विश्वजित कदम तसंच अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे सचिव विलास पाटील, यांच्यासह
विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment