Thursday, 27 August 2020

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २७ ऑगस्ट २०२० दुपारी १.०० वा.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 August 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ ऑगस्ट २०२० दुपारी १.०० वा.

****

देशात कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी कालपर्यंत तीन कोटी ८५ लाख ७६ हजार ५१० नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यातल्या नऊ लाख २४ हजार ९९८ चाचण्या काल करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशातलं कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यूचं प्रमाण एक पूर्णांक ८३ शतांश टक्क्यांपर्यंत घटलं आहे. यात सत्तर टक्क्यांहून अधिक मृत्यू कोरोना विषाणू संसर्गासह अन्य आजारही असलेल्या रुग्णांचे असल्याची माहितीही केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गासाठीच्या लस चाचणीतील दोन्ही स्वयंसेवकाची तब्ब्येत उत्तम असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. लस देण्यात आल्यानंतर त्यांना अर्धा तास निगरानीखाली ठेवण्यात आल्यानंतर घरी जाऊ देण्यात आलं असून एका महिन्यानंतर त्यांना पुन्हा एकदा लसीची मात्रा दिली जाणार आहे. पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या `ऑक्सफोर्ड कोविड-१९` लसीच्या चाचणीचा दुसरा टप्पा काल सुरू झाला तेंव्हा या दोन स्वयंसेवकांना लस देण्यात आली होती. पुण्यातल्या भारती विद्यापीठ आणि वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात ३२ वर्षीय आणि ४८ वर्षीय पुरुष स्वयंसेवकाला ही लस देण्यात आली होती.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज कोरोना विषाणू संसर्गाचे नवे २१४ रुग्ण आढळले असून जिल्ह्यातली एकूण रुग्ण संख्या आता २१ हजार ९७३ झाली आहे. जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना विषाणुच्या नव्या रुग्णांमधे महापालिका हद्दीतल्या १४४ आणि ग्रामीण भागातल्या ७० रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गावर उपचार घेऊन सोळा हजार ७१३ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. या संसर्गामुळे ६५९ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या चार हजार ६०१ रूग्णांवर उपचार सुरू असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.

****

ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणुचे नवे एक हजार ३२६ रुग्ण आढळले असून एकूण रुग्ण संख्या एक लाख १७ हजार ७३९ झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या संसर्गामुळे काल जिल्ह्यातल्या ३८ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या तीन हजार ३८६ झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक २७ हजार ४१२ रुग्ण कल्याणमधे आढळले असल्याची माहितीही या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

****

पालघर जिल्ह्यामधे कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या २२ हजार ९८२ झाली आहे. या संसर्गामुळे जिल्ह्यात ४६३ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यात आज ६२१ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाल्यानं त्यांना घरी सोडन्यात आलं आहे. जिल्ह्यात या संसर्गावर उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या १५ हजार ६३६ झाली आहे.

****

भारतीय जैन संघटना आणि औरंगाबाद महापालिकेतर्फे कोरोना विषाणू मुक्तीसाठी सुरु करण्यात आलेल्या विशेष मोहीमेअंतर्गत आतापर्यंत ४१ हजार नमुन्यांच्या तात्काळ चाचण्या करण्यात आल्या आहेत. यातल्या एक हजार ८८६ व्यक्तींना या संसर्गाची लागण झाल्याचं समोर आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

****

अमरावती जिल्ह्यात कोरोना विषाणुचे नवे १८० रुग्ण आढळ्यानं जिल्ह्यातली एकूण रुग्ण संख्या ४ हजार ९८० झाली आहे. जिल्ह्यात सध्या एक हजार २३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात

आतापर्यंत तीन हजार ६२८ रुग्ण या संसर्गावर उपचार घेऊन बरे झाले असून, ११८ रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार २३४ जणांवर उपचार सुरु आहेत.

****

वाशिम जिल्ह्यात सतत झालेल्या पावसानं अनेक ठिकाणी मुगाच्या पिकांचं नुकसान झालं आहे. या पिकांचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्ह्यतल्या मूग उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. अमरावती जिल्ह्यात दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं भाजीपाला पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं म्हटलं आहे.

****

वाहतूक सुरू झाल्यावर सरकारनं सहा महिने वाहतूक कर घेऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टॅंकर, बस, वाहतूक महासंघानं केली आहे. वाहन कर्जाच्या हप्त्यांना केंद्र शासनानं सहा महिने स्थगिती दिलेला कालावधी येत्या ३० तारखेला संपत असून, त्यानंतर हप्ता भरण्यासाठी बँकांकडून विचारणा होईल, असं संघटनेनं म्हटलं आहे. यामुळे वाहतूक सुरू झाल्यानंतर सहा महिने ही सुट मिळावी यासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, असंही संघटनेनं नमुद केलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात यावर्षी गौरी पुजन सणावर कोरोना विषाणू विरूद्ध जनजागृतीचा प्रभाव दिसून येत आहे. याचाच भाग म्हणून अनेकांनी अपल्या घरच्या गौरी मुर्तींना मास्क बांधले असून निर्जंतुकीकरण आदी साहीत्य गौरी मुर्तींसमोर ठेवण्यात आल्याचं चित्रं दिसत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

//**********//

 

 

No comments: