Saturday, 29 August 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.08.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 August 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ ऑगस्ट २०२० सकाळी ७.१० मि.

****

·      विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ३० सप्टेंबरपर्यंत घेण्याचा विद्यापीठ अनुदान आयोगाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात कायम.

·      जेईई आणि एनईईटी घेण्यास परवानगी देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत सहा राज्यांची पुनर्विचार याचिका.

·      मुंबईत मोहरम ताजियाची मिरवणूक काढण्यास मुंबई उच्च न्यायालयाची सशर्त परवानगी; मुंबई वगळता राज्यात इतरत्र मिरवणुकीला परवानगी नाही.

·      राज्यात काल १४ हजार ३६१ नवे कोरोना बाधित; तर दिवसभरात ३३१ रुग्णांचा मृत्यू.

·      मराठवाड्यातही काल ३२ रुग्णांचा मृत्यू झाला तर एक हजार ५३ नवे रुग्ण.

·      उदगीर पंचायत समितीच्या सभापतींविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव अकरा विरुद्ध तीन मतानं मंजूर.

आणि

·      दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान न दिल्यास बेमुदत दूध बंद आंदोलनाचा राजू शेट्टी यांचा इशारा.

****

विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ३० सप्टेंबरपर्यंत घेण्याचा विद्यापीठ अनुदान आयोगाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. कोविड-19 साथीच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर काल सर्वोच्च न्यायलयात सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयाने हा निर्णय दिला. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्याशिवाय राज्यं किंवा विद्यापीठं विद्यार्थ्यांना बढती देऊ शकत नाहीत, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार राज्य सरकारांना आयोगाने ठरवलेल्या तारखेत परीक्षा घेणं शक्य नसेल, तर त्यांनी आयोगाशी संपर्क साधून परीक्षेच्या नवीन तारखा निर्धारित कराव्यात. आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे राज्यांना परीक्षा घ्यावी लागेल, त्यात कोणतीही सवलत मिळणार नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलं.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोगाच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयावर युवा सेनेसह काही याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला होता.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा राज्य शासन आदर करत असून यासंदर्भात विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत चर्चा करून परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. काल सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर बोलताना सामंत यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देणं आवश्यक असल्याचं नमूद करत, या परिस्थितीत परीक्षा घेतल्या गेल्यास, विद्यार्थ्यांना संसर्ग व्हायला नको, याकडेही लक्ष वेधलं.

दरम्यान, अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्वागत केलं आहे. या विषयावरील वाद आता शांत होईल अशी आशा त्यांनी ट्वीट संदेशातून व्यक्त केली आहे.

****

केंद्र सरकारला अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संयुक्त प्रवेश परीक्षा-जेईई आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता तसंच प्रवेश चाचणी - एनईईटी परीक्षा घेण्यास परवानगी देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत सहा राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. यामध्ये राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह पश्चिम बंगाल, राजस्थान, झारखंड, छत्तीसगड आणि पंजाब राज्य सरकारच्या मंत्र्यांचा याचिकाकर्त्यांमध्ये समावेश आहे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पात्रता प्रवेश परीक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं १७ ऑगस्टला दिलेल्या निकालात, आयुष्य पुढे जात राहिलं पाहिजे असं सांगतानाच, विद्यार्थ्यांचं महत्त्वाचं वर्ष वाया जायला नको, असं म्हटलं होतं. मात्र हा निर्णय देताना, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत विचार झाला नसल्याचं, काल दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेत म्हटलं आहे.

जेईई परीक्षा येत्या १ ते ६ सप्टेंबरदरम्यान, तर नीट परीक्षा १३ सप्टेंबरला होणार आहे.

दरम्यान, जेईई आणि एनईईटी घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेस पक्षानं काल देशव्यापी आंदोलन केलं. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी केली आहे.

राज्यातही विविध जिल्ह्यात काल काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. परभणी, लातूर, नांदेड, जालना, गडचिरोलीमध्ये कार्यकर्त्यांतनी आंदोलनात सहभाग घेत निदर्शनं केली तसंच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं.

****

दिल्लीतल्या आम आदमी पक्षाच्या सरकारनं भ्रष्टाचार केला असेल, तर केंद्र सरकार त्यांच्यावर कारवाई का करत नाही? असा सवाल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केला आहे. अण्णांनी दिल्लीत येऊन आप सरकारच्या विरोधात भाजपानं सुरु केलेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सहभागी व्हावं, असं पत्र भाजपच्या दिल्ली प्रदेश अध्यक्षांनी अण्णा हजारे यांना पाठवलं होतं. त्यावर अण्णा हजारे यांनी हा सवाल केला आहे. आपण कधीही पक्ष पाहून आंदोलन केलं नाही, असंही ते म्हणाले.

****

मुंबई उच्च न्यायालयानं फक्त मुंबईत मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यास सशर्त परवानगी दिली आहे. मुंबई वगळता राज्यात कुठेही मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यास परवानगी नाही, असंही न्यायालयानं आदेशात स्पष्ट केलं आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक धार्मिक सण आणि उत्सवांवर सरकारनं बंधनं घातली आहेत. या बंधनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं राज्यात फक्त मुंबईतच मोहरम ताजियाची मिरवणूक काढता येईल, या मिरवणुकीत पाचपेक्षा जास्त व्यक्तींना सहभागी होता येणार नाही, असं स्पष्ट नमूद केलं आहे.

****

अल्पसंख्याक समुदायाचं राज्यस्तरावर निर्धारण करण्याच्या मागणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारकडून उत्तर मागवलं आहे. देशातल्या दहा राज्यांमध्ये हिंदू समाज अल्पसंख्य आहे, मात्र अद्याप तसं जाहीर करण्यात आलेलं नाही, असं या याचिकेत म्हटलं आहे. यासंदर्भात केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. यासंदर्भात केंद्राचं म्हणणं जाणून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं केंद्रीय गृह मंत्रालय, विधी आणि न्याय मंत्रालय तसंच अल्पसंख्याक मंत्रालयाला नोटीस बजावली आहे.

****

राज्यात अनेक भागात कोविड संसर्ग चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. ते काल पुण्यात बोलत होते. कोविड प्रतिबंधासंबंधात अद्याप समाधानकारक स्थिती नाही, असं फडणवीस यांनी नमूद केलं. अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआय चौकशीनंतर समोर येत असलेले खुलासे आश्चर्यकारक असल्याचं फडणवीस म्हणाले.

****

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयकडून सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्तीची काल चौकशी करण्यात आली. सीबीआयने रियाला चौकशीसाठी बोलावण्याची ही पहिलीच वेळ होती. सीबीआयने रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती याची या प्रकरणी गुरुवारी सुमारे आठ तास चौकशी केली.

****

पुण्यात झालेल्या एल्गार परिषद तसंच भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांना जामीन मंजूर करण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. आपल्याला मधुमेह तसंच उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यानं, तुरुंगात कोरोना विषाणू संक्रमण होण्याचा धोका असल्यानं, जामीन देण्याची मागणी भारद्वाज यांनी केली होती. मात्र राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्य सरकारनं भारद्वाज यांना सर्व वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात असून, कोविड संसर्गापासून बचावाची पूर्ण काळजी घेतली जात असल्याचं न्यायालयाला सांगितलं.

****

सफाई कामगारांचे विविध प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी सामाजिक न्याय विभागात स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन असल्याचं, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सफाई कामगारांबाबतचा लाड-पागे समितीचा अहवाल आणि सद्यस्थिती यांचा समन्वय साधून योग्य निर्णय घेतला जाईल, असं मुंडे यांनी सांगितलं. कामगारांच्या निवाऱ्याचा प्रश्न, तसंच वारसा हक्क नियुक्तीसंदर्भातला प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुंडे म्हणाले.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेतून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून रविवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. या कार्यक्रम मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातला हा पंधरावा भाग आहे.

****

मुंबई पोर्ट ट्रस्टचे सेवानिवृत्त अध्यक्ष संजय भाटीया यांनी काल राज्याच्या उपलोकायुक्त पदाची शपथ घेतली. राजभवन इथं झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाटीया यांना पदाची शपथ दिली.

****

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२०’ आज प्रदान केले जाणार आहेत. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा कार्यक्रम ऑनलाईन आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होणार असून, आकाशवाणीवरून या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाणार आहे.

****

राज्यात काल १४ हजार ३६१ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामुळे राज्यातल्या या आजाराच्या रुग्णांची संख्या आता सात लाख ४७ हजार ९९५ एवढी झाली आहे. आतापर्यंत या आजारातून पाच लाख ४३ हजार १७० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या एक लाख ८० हजार ७१८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल दिवसभरात राज्यात उपचारादरम्यान ३३१ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे राज्यात या आजारानं मृत पावलेल्या रुग्णांची संख्या २३ हजार ७७५ एवढी झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ३९ लाख ३२ हजार ५२२ लोकांची कोरोना विषाणू संसर्ग चाचणी करण्यात आली आहे.

****

मराठवाड्यातही काल ३२ रुग्णांचा मृत्यू झाला तर एक हजार ५३ नवे रुग्ण आढळले.

औरंगाबाद इथं काल नऊ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर ३६४ नवे रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात काल सात रुग्णांचा मृत्यू झाला तर १५० नवे रुग्ण आढळले.

नांदेड तसंच परभणी जिल्ह्यात प्रत्येकी ५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, नांदेड जिल्ह्यात २१५ तर परभणी जिल्ह्यात ८१ नवे रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात काल तीन कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला तर ६३ नवे रुग्ण आढळले. उस्मानाबाद जिल्ह्यात दोन बाधितांचा मृत्यू झाला तर ८० नवीन रुग्णांची नोंद झाली. जालना जिल्ह्यात काल एका कोरोना विषाणू बाधित पुरुष रुग्णांचा मृत्यू झाला. तर दिवसभरात ६१ नवीन रुग्ण आढळून आले. हिंगोली जिल्ह्यात काल ३९ नवे रुग्ण आढळले आहेत.

****

मुंबईत काल एक हजार २१७ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले, तर ३० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुंबई शहरात आतापर्यंत एक लाख ४२ हजार १०८ रुग्ण आढळले असून, यापैकी सध्या १९ हजार ४०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे जिल्ह्यात तीन हजार ६११ नवे रुग्ण, तर ६४ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात ९४८ रुग्ण आढळले, तर पाच जणांचा मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यात ६६९, अहमदनगर ५४५, सांगली ४८१, सोलापूर २६८, यवतमाळ १२२, वाशिम ५७, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल आणखी २८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली.  

****

राज्यातील जिम सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या जिम चालकांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. जिमच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये याकरिता मार्गदर्शक तत्वे जिम मालकांनी शासनास सादर करावीत. त्याआधारे जिम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

****

लातूर जिल्ह्यात उदगीर पंचायत समितीच्या भारतीय जनता पक्षाच्या सभापतींविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव काल अकरा विरुद्ध तीन मतानं मंजूर झाला. १४ सदस्यांच्या सभागृहासाठी डिसेंबरमध्ये झालेल्या सभापती तसंच उपसभापतींच्या निवडणुकीच्यावेळी सभापती आणि उपसभापती या दोन्ही पदांच्या उमेदवारांना समान सात मते मिळाली होती. त्यामुळे चिठ्ठीच्या आधारे भाजपचे विजय पाटील सभापती तर काँग्रेसचे बाळासाहेब मार्लापल्ले उपसभापती म्हणून निवडून आले होते. या पंचायत समितीत भाजपचे नऊ, काँग्रेस तीन तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक सदस्य असं पक्षीय बलाबल आहे. कालच्या अविश्वास ठरावादरम्यान भाजपच्या सहा सदस्यांनी पक्षाचा व्हीप डावलून विरोधात मतदान केलं.

****

जालना इथं औद्योगिक वसाहतीमधल्या बियाणे महामंडळाच्या कार्यालयासमोर काल भारतीय जनता पक्षाच्या वतीनं बोगस सोयाबीन बियाण्याची होळी करून निषेध आंदोलन करण्यात आलं. बोगस सोयाबीन विक्री प्रकरणातल्या बियाणे महामंडळाच्या दोषी अधिकाऱ्यांसह संबंधित बियाणे कंपन्यांवर तत्काळ कारवाई करावी, तसंच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी केली.

****

दुधाला त्वरीत प्रतिलिटर ५ रूपये अनुदान द्यावं, अन्यथा कोणत्याही क्षणी बेमुदत दूध बंद आंदोलन करण्यात येइल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. संघटनेच्या वतीनं काल उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम इथं उपविभागीय अधिकारी कार्यालयावर दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मोर्चा काढला, त्यावेळी शेट्टी बोलत होते. उत्पादन खर्चापेक्षा १० रूपये कमी दराने शेतकऱ्यांना दूध विकावं लागत असून टाळेबंदीमुळं शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावं लागत असल्याचं ते म्हणाले. या मोर्चात शेतकरी आपल्या पशुधनासह सहभागी झाले होते.

****

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीचा ७०:३० टक्केचा फॉर्म्युला रद्द करावा या मागणीसाठी येत्या १ सप्टेंबरपासून मराठवाडाभर स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार आहे. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी जन आंदोलन उभारलं आहे. स्वाक्षऱ्यांचं हे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं जाणार आहे.

****

नांदेडचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक शंकरराव देशपांडे यांचं काल वार्धक्यामुळे निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. १९८४ साली नांदेड नगर पालिकेत ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

****

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लातूर शहरातल्या नागरिकांनी घरी स्थापन केलेल्या गणरायाचं घरीच विसर्जन करावं, असं आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केलं आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये किंवा त्याचा प्रसार होऊ नये यासाठी सार्वजनिक ठिकाणी येऊन गणेश विसर्जन टाळावं, असं महापौरांनी म्हटलं आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही यंदा खबरदारीच्या उपाययोजना केल्याबद्दल महापौरांनी आभार मानले आहेत.

****

No comments: