Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 August 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ ऑगस्ट २०२० सायंकाळी ६.००
****
* विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रसरकारविरुद्धचा
आवाज बुलंद करावाः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
*पुण्यामधे `ऑक्सफोर्ड कोवीड-१९` लस चाचणीच्या
दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ
* कोरोना विषाणुचे औरंगाबादमधे १२३ तर जालन्यात
६६ नवे रुग्ण
आणि
*वीज कामगारांचे प्रश्र्न मार्गी लावण्याचं
उर्जा मंत्री राऊत यांचं आश्र्वासन
****
केंद्र सरकार आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असल्यानं
विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांनी आपला आवाज बुलंद करण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. विविध विरोधी पक्षांच्या ताब्यात असलेल्या राज्यांच्या
मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी
आज बैठक घेतली. दूर दृष्य संवाद प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे
यांनी ही भूमिका मांडली आहे. राज्यांना वस्तू आणि सेवा कराच्या मुद्दावर या बैठकीत
चर्चा झाली. केंद्र सरकार राज्यांना याची भरपाई द्यायला नकार देत असल्याचं नमुद करत
हा मोदी सरकारकडून जनतेचा विश्र्वासघात असल्याची टीका सोनिया गांधी यांनी यावेळी केली.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, झारखंडचे
मुख्यमंत्री हेमंत सोरेन, तसंच काँग्रेस पक्षाच्या नेतृत्त्वाखालील राज्यांचे मुख्यमंत्री
अमरिंदर सिंह, अशोक गेहलोत, भुपेष बाघेल आणि बी. नारायणसामी यांनी या बैठकीत सहभाग
घेतला.
****
पुण्यातल्या सिरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया- सीआयआयनिर्मीत
`ऑक्सफोर्ड कोवीड-१९` लसीच्या चिकित्सा चाचणीचा दुसऱ्या टप्प्याला आज प्रारंभ झाला
आहे. पुण्यातल्या भारती विद्यापीठ आणि वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दोन पुरुष
स्वयंसेवकांना ही लस देण्यात आल्याची माहिती या महाविद्यालयाचे संचालक डॉ. संजय ललवाणी
यांनी दिली आहे. काल ही चाचणी उपलब्ध झाल्यानंतर पाच स्वयंसेवकांनी ही लस घेण्याची
तयारी दर्शवली होती. या सर्वांची कोरोना विषाणूसाठी चाचणी करण्यात आल्यानंतर यातील
तिघांना त्याची लागण झाल्याच समोर आलं होतं. ते लस घेण्यासाठी अपात्र ठरल्यानं उर्वरित एक बत्तीस वर्षीय आणि अन्य अठ्ठेचाळीस वर्षीय
स्वयंसेवकाला ही लस देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. येत्या आठवड्यात एकूण
पंचवीस जणांना ही लस दिली जाणार असल्याचंही त्यांनी नमुद केलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज कोरोना
विषाणू संसर्गाचे १२३ आढळल्यानं एकूण रुग्ण संख्या २१ हजार ५१५ झाली आहे. नव्या रुग्णांमधे
महापालिका हद्दीतल्या ६७ आणि ग्रामीण भागातल्या ५६ रुग्णांचा समावेश आहे.
****
जालना जिल्ह्यात
आज दोन कोरोना विषाणू बाधित पुरुष रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या संसर्गानं
जिल्ह्यात झालेल्या मृतांची संख्या आता १२९ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात ६६ नवीन
कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. अँटीजेन चाचणीत बाधित आढळून आलेल्या २६ रुग्णांचा
यात समावेश आहे. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता चार हजार २८९ झाली आहे. उपचारानंतर
कोरोना विषाणूमुक्त झालेल्या ६० रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले
तीन हजार ४४ रुग्ण या आजारातून बरे झाले असून, बाधित असलेल्या एक हजार ११६ रुग्णांवर
सध्या उपचार सुरू आहेत.
****
धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणुचे नवे १७२ रुग्ण आढळून आले आहेत तर तीन
रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये धुळे, शिरपूर आणि सोनगीर इथंल्या
रुग्णांचा समावेश आहे. नव्या रुग्णांमधे धुळे
शहरातले ५७ तर ग्रामिण भागातले ११५ रुग्ण आहेत. जिल्ह्यातली एकुण रुग्णसंख्या
आता ७ हजार ४७८ वर पोहचली आहे. २१९ रुग्ण यामुळे
मृत्यूमुखी पडले आहेत. या संसर्गातून बरे झाल्यानं ५ हजार ३७९ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
****
योग्य वेळी
आणि अग्रेसर चाचणी ही प्रारंभीच्या टप्प्यातच कोरोना विषाणुचं निदान करत असल्यानं या
ससंर्गाविरुद्ध लढ्यासाठी याचा मोठा उपयोग होत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात
कोरोना विषाणुच्या संसर्ग तपासणीसाठी कालपर्यंत तीन कोटी ७६ लाख ५१ हजार ५१२ नमुन्यांची
चाचणी झाली असून काल यातल्या आठ लाख २३ हजार ९९२ नमुन्यांची चाचणी करण्यात आली असल्याची
माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.
****
राज्यातले आदिवासी बहुल पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, यवतमाळ,
गडचिरोली, रायगड आणि चंद्रपूर या जिल्ह्यातल्या इतर मागासवर्ग आणि विमुक्त जाती भटक्या
जमाती प्रवर्गाच्या नोकरीतील आरक्षणासंदर्भात मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक अध्यक्ष तसंच
अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत
झाली. पेसा कायद्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगानं अनुसूचित जमाती प्रवर्गाची होणारी
पदभरती आणि त्या-त्या जिल्ह्यातल्या इतर मागासवर्ग आणि विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गाची
टक्केवारी आणि संख्या याची सविस्तर आकडेवारी सादर करावी. तसंच राज्यघटनेनं त्या- त्या
प्रवर्गाला दिलेलं आरक्षण कायम रहावं अशी भूमिका या बैठकीत मांडण्यात आली.
****
अधिसंख्य पदावर नियुक्त केलेल्या अधिकारी आणि
कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक तसंच सेवानिवृत्ती विषयक लाभ मंजूर करण्यासंदर्भात मंत्रीमंडळ
उपसमितीची बैठकही आज मुंबईत झाली. उपसमितीचे अध्यक्ष तसंच अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक
संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. अनुसूचित जमातीच्या
प्रमाणपत्राच्या आधारे शासन सेवेत नियुक्त झालेल्या परंतु ज्यांचं अनुसूचित जमातीचं
जात प्रमाणपत्र अवैध ठरलं आहे, अशा अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवेबाबत आणि सर्वोच्च
न्यायालयाच्या निर्णयाबाबत कायदेशीर सल्ला घेण्याचं आजच्या बैठकीत ठरलं.
****
वीज कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील,
असं आश्र्वासन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिलं आहे. विविध विद्युत कर्मचारी
संघटनांच्या प्रतिनिधींशी त्यांच्या समस्या आणि प्रश्नांबाबत ऊर्जामंत्र्यांनी आज मुंबईत
आमदार भाई जगताप यांच्यासह बैठक घेऊऩ चर्चा केली, त्यावेळी हे आश्र्वासन दिलं आहे.
मागासवर्गीयांचा आरक्षणाचा अनुशेष, बदली धोरण, मृत कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना अनुकंपा
तत्त्वावर नोकरी, कंत्राटी कामगार, पदोन्नती, वीज कायदा सुधारणा, वीज चोरी रोखण्यासाठी
भरारी पथकांची संख्या वाढवणं, निवृत्तीधारकांचा प्रश्न सोडवणं आदी विषयांवर विविध कामगार
संघटनांच्या वतीनं यावेळी चर्चा करण्यात आली आणि मागण्या मांडण्यात आल्या.
****
रायगड जिल्ह्यात महाड इथल्या इमारत
दुर्घटनेतील मृतांची संख्या सतरा झाली आहे. सोमवारी संध्याकाळी महाड इथं `तारीक गार्डन` ही पाच मजली इमारत
कोसळून झालेल्या या दूर्घटनेत नऊ जण जखमी झाले
आहेत. या दूर्घटनेच्या ठिकाणी सुरू मदत आणि बचाव कार्य ४० तासांनी आज दुपारच्या सुमारास पूर्ण झालं.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची तीन पथकं या इमारतीच्या
ढिगाऱ्यात अडकलेल्यांचा
शोध घेण्यासाठी कार्यरत होती. ही इमारत बांधणारा व्यावसायिक फरार असून पोलिस
तळोजा इथं रहाणाऱ्या त्याच्या मुलाकडे चौकशी करत आहेत. त्याच्यासह पाच जणांविरुद्ध
गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या भडी इथल्या शेतक-यांनी घेतलेल्या
सोयाबीन पिकाला एकही शेंग लागली नसल्याची तक्रार काही शेतक-यांनी केल्यानं, जिल्ह्यात अशी आणखी
काही प्रकरणे असल्यास याचा तातडीने शोध घ्यावा आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे
पंचनामे करावेत असे निर्देश वैद्यकीय शिक्षण आणि
सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हा
प्रशासनाला दिले आहेत. सोयाबीनच्या नुकसानीची माहिती मिळाल्यावर आमदार धीरज देशमुख
यांनी भडी इथंल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली.
****
बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड कामगार तसंच ऊसतोड मुकादम संघटने बरोबर
मागील कराराच्या अंतरीम वाढीसह ऊसतोड कामगारांना मजुरीमधे दिडशे टक्के वाढ केल्याशिवाय
यंदा साखर कारखान्याचं चाक फिरू देणार नाही, असा इशारा आमदार सुरेश धस यांनी दिला आहे.
लवाद म्हणेल तो अंतीम शब्द राहिल मात्र ऊसतोड कामगार,मुकादम यांच्यावर कुठल्याही प्रकारचा
अन्याय होऊ देणार नाही, असंही त्यांनी आज आष्टी इथं पञकार परिषद घेऊन सांगितलं.
****
पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोना विषाणुच्या नव्या २३७
रुग्णांची वाढ झाल्यानं जिल्ह्यातली या रुग्णांची एकूण संख्या २२ हजार ९८२ झाली आहे.
जिल्ह्यामधे आतापर्यंत ४६३ रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे, तर १९ हजार १४५
रुग्णांनी या विषाणू संसर्गावर मात केली आहे.
****
धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचं शुल्क माफ करावं, यासाठी आंदोलन करणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी
परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आज पालकमंत्र्यांच्या
वाहनाचा ताफा अडवल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला तसंच काही जणांना अटक
केली आहे. या आंदोलकांनी पालकमंत्री अब्दूल सत्तार यांच्याशी चर्चा करण्याची मागणी
केली होती, त्यांना भेट नाकारण्यात आली होती.
****
सांगली जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांना दाखल करून घेतांना
खासगी रुग्णालयांना अनामत रक्कम मागता येणार नाही, मागितल्यास त्या रुग्णालयांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती
सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या चाचणीचा
अहवाल तपशील रुग्णांना त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध करून दिला जाईल, असंही जिल्हाधिका-यांनी
म्हटलं आहे.
****
अमरावती जिल्ह्यात अमरावती विद्यापीठा पाठोपाठ आता डॉ.पंजाबराव
देशमुख वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातही कोरोना चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित
झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग येईल, असं प्रतिपादन
राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी
केलं आहे. डॉ पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात कोविड -१९ परिक्षण प्रयोगशाळेचं
उद्घाटन पालकमंत्री ठाकूर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या.
****
No comments:
Post a Comment