Thursday, 27 August 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 27 August 2020 Time 18.00 to 18.10 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 August 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ ऑगस्ट २०२० सायंकाळी ६.००

****

* औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणुचे नवे २१४ रुग्ण, चार रुग्णांचा मृत्यू

* देशात कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यूचं प्रमाण एक पूर्णांक ८३ शतांश टक्के

* जायकवाडी धरणात ८४ टक्के तर हिंगोली जिल्ह्यातल्या ईसापूर धरणात ९० टक्के पाणीसाठी

आणि

* `अभाविप` कार्यकर्त्यांवर लाठीमारप्रकरणी परभणी, धुळे, हिंगोलीत निषेध

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज कोरोना विषाणू संसर्गाचे नवे २१४ रुग्ण आढळले असून जिल्ह्यातली एकूण रुग्ण संख्या आता २१ हजार ९७३ झाली आहे. जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना विषाणुच्या नव्या रुग्णांमधे महापालिका हद्दीतल्या १४४ आणि ग्रामीण भागातल्या ७० रुग्णांचा समावेश आहे. औरंगाबादमधे या संसर्गावर उपचार घेत असलेल्या चार रुग्णांचा आज मृत्यू झाला. या गंगापूर तालुक्यातल्या जोगेश्वरीच्या ३३ वर्षीय, पैठणच्या ५८ वर्षीय आणि सोयगाव इथल्या ६० वर्षीय पुरुष रुग्णाचा आणि  वैजापूरच्या ७६ वर्षीय महिला रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६७१ रुग्णांचा या विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

****

देशातलं कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यूचं प्रमाण एक पूर्णांक ८३ शतांश टक्क्यांपर्यंत कमी झालं आहे. यात सत्तर टक्क्यांहून अधिक मृत्यू कोरोना विषाणू संसर्गासह अन्य आजारही असलेल्या रुग्णांचे असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशात कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी कालपर्यंत तीन कोटी ८५ लाख ७६ हजार ५१० नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यातल्या नऊ लाख २४ हजार ९९८ चाचण्या काल करण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. 

****

धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणुचे नवे १९२ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात या संसर्गावर उपचार घेत असलेल्या सहा रुग्णांचा मॄत्यू झाला आहे. धुळे शहर आणि ग्रामीण भागातले प्रत्येकी तीन रुग्ण यात आहेत. जिल्ह्यात या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७ हजार ६७० झाली आहे तर २२७ रुग्णांचा यामुळे मृत्यू झाला आहे.

****

अमरावती जिल्ह्यात आज ४४ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात बाधितांची संख्या आता पाच हजार २४ झाली आहे. काल रात्री सहा कोरोनाबधितांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे आता मृतांची संख्याही ११८ झाली आहे. आतापर्यंत तीन हजार ६२८ जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर सध्या एक हजार २३४ रुग्ण उपचार घेत आहेत.

****

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री क्रीशन पाल गुर्जर यांना कोरोना विषाणुची लागण झाली आहे. पंजाबमधील फरीदाबादचे खासदार असलेल्या ६३ वर्षीय गुर्जर यांनी स्वतः आज ही माहिती दिली आहे. आपल्याला प्रकृतीची तक्रार जाणवायला लागल्यानंतर आपण चाचणी करून घेतली, त्यात हे स्पष्ट झाल्याचं मंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. या वर्षीचा अर्जुन पुरस्कार घोषित झालेला बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रंकीरेड्डी यालाही या विषाणुचा संसर्ग झाला असल्याचं `पीटीआय` वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. गेल्या आठवड्यापासून तो घरीच विलगीकरणात आहे.

****

ँकांना व्यवसायातील घोटाळे टाळण्यासाठी त्याचा प्रारंभी सुगावा लागला पाहिजे, असं रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटलं आहे. बँकांनी अधिक कर्जपुरवठा करावा असं आवाहन करताना त्यांनी अलीकडच्या काळात घोटाळे वाढत असल्याचं एका दैनिकानं आज आयोजित केलेल्या `वेबीनारमधे` नमुद केलं. धोका पत्करायचा नाही यासाठी टोकाची भूमिका घेणं हे बँकांच्या उत्पन्न स्त्रोतासाठी मारक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. बँक व्यवस्था स्थीर आणि मजबूत आहे तसंच कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्र्वभूमीमुळे बँकांच्या भांडवलाची धूप होईल, असंही दास यावेळी म्हणाले.

****

पैठण इथल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी आज ८४ पूर्णांक १६ टक्के झाली आहे. धरणात सध्या १९ हजार ५८४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी दाखल होत असल्याची माहिती गोदावरी पाटबंधारे विभागानं दिली आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प ईसापुर धरणात ९० टक्के पाणी पातळी झाली असून ८७१ पुर्णांक ४७ शतांश दशलक्ष घनमिटर पाणीसाठा झाला आहे.

****

 असंघटित क्षेत्रातल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्थैर्य मिळवून देण्यासाठी लघू उद्योगांना चालना देण्याचं शासनाचं धोरण असून, कोरोना विषाणू संसर्गाच्या काळातही व्यवसायांना चालना देत विविध योजनांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करण्यात येत असल्याचं प्रतिपादन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तसंच अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं आहे. अमरावती इथं एका अगरबत्ती उद्योगाचं उद्घाटन मंत्री ठाकूर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या.

****

धुऴे इथं पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना परिक्षा होत नसल्यानं विद्यार्थांचं परिक्षा शुल्क परत करावं, या मागणीचं निवेदन देण्यासाठी गेलेल्या अखील भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा परभणी इथं भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज निषेध केला. जिल्हाधिका-यांना निवेदन सादर करून शिक्षणमंत्री उदय सामंत आणि धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजिनाम्याची कार्यकर्त्यांनी यावेळी मागणी केली. धुऴ्यातही भाजपच्या शिष्टमंडळानं खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पालकमंत्र्यांच्या राजिनाम्याची मागणी केली. हिंगोली इथं आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणी गांधी चौकात आंदोलन केलं.

****

परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष दडपशाही करत असल्याचा आरोप करत खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा पाठवल्याच्या पार्श्वभूमीवर परभणीत पडसाद उमटले आहेत. शहरातल्या वसमत मार्गावरील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयावर काल रात्री अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली. दरम्यान, खासदार जाधव हे भाजपला पोषक वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी केला आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा - वसमत मार्गावर काठोडा गावाजवऴ आज अज्ञात वाहनानं दुचाकीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून  दोघं जखमी झाले आहेत. दुचाकीवरील युवक हे शिरड शहापूर इथून औंढा नागनाथकडे येत होते, अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.

****

अमरावती जिल्ह्यातल्या धामणगाव रेल्वे तालुक्यात शिदोडी गावामधे विहिरीचं दूषित पाणी पिल्यानं अतिसार हा साथीचा आजार पसरला आहे. काल रात्रीपासून अतिसाराच्या लक्षणांसोबतच शंभर गावकऱ्यांना ताप आला आहे. तालुका आरोग्य अधिकारी गावात दाखल झाले असून, आज दुपारपर्यंत त्यांनी १८५ गावक-यांच्या तपासण्या केल्याचं आरोग्य प्रशासनानं म्हटलं आहे.

****

अमरावती इथं एका खासगी रुग्णालयात कोरोना विषाणू संसर्गावर उपचार घेत असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मृत रुग्णाचे कुटुंबीय आणि कर्मचारी यांच्यात धुमश्चक्री झाली. मृत रुग्णाच्या कुटुंबीयांनी डॉक्टरवर हलगर्जीपणाचा आरोप करत रुग्णालयाची तोडफोड आणि डॉक्टरांना मारहाण केली तसंच रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनीही मृत रुग्णाच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याचं वृत्त आहे. गाडगेनगर पोलिसांनी या प्रकरणी डॉ. रवी भूषण यांच्या तक्रारीवरून तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

****

नाशिक जिल्ह्यातल्या शेतक-यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर १ हजार ६३९ कोटी रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आलं आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी १५६ कोटी रूपयांचे ज्यादा कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील पीककर्जाचा आढावा घेण्यासाठी मांढरे यांनी आज जिल्ह्यातल्या राष्ट्रयीकृत बॅँकाच्या उच्चपदस्थ अधिका-यांची बैठक घेऊन आढावा घेतला, यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

****

वर्धा जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबिन बियाणं न उगवल्याच्या ५३० तक्रारींपैकी ३२९ तक्रारींमधे बियाणात दोष असल्याचं आढळून आल्यामुळे ईगल सिड्स प्रायव्हेट लिमिटेड या इंदोर इथंल्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच ११७ शेतकऱ्यांना १८९ पिशव्या सोयाबिन बियाणं वितरण करून ४ लक्ष ८५ हजार ७५० रुपये नुकसान भरपाई म्हणून कंपनीनं आतापर्यत दिले असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विकास अधिकाऱ्यांनी दिली आहे.

****

सातारा जिल्ह्यात गौरी विसर्जनाबरोबरच घरगुती गणेशांचं विसर्जन करण्यास सुरुवात झाली आहे. सातारा शहरात सहा ठिकाणी पालिकेच्या वतीने सुरक्षित अंतर ठेवून विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहेत. नदीपात्रात गणेश विसर्जनास मनाई असून, कराड, मेढा इथं घरगुती गणेश विसर्जनासाठी पालिकेनं फिरता विसर्जन तलाव तयार केला आहे. जिल्ह्याच्या विविध भागात सुरक्षित आणि आरोग्यदायी गणेश विसर्जन सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

नाशिकमधे गणेश विर्सजनासाठी `ऑनलाईन` नोंदणी करण्यात येत आहे. विसर्जनाच्या दिवशी काही भागात गर्दी होऊ शकते याचा विचार करून महापालिकेनं ही सोय केली आहे. या अंतर्गत ११०० नागरीकांनी विसर्जनाच्या वेळेची नोंद केली आहे.

****

No comments: