Friday, 28 August 2020

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २८ ऑगस्ट २०२० सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 August 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ ऑगस्ट २०२० सकाळी ७.१० मि.

****

·       वस्तू आणि सेवा कर परताव्यासंदर्भात राज्य सरकारांना कर्जाबाबतचे दोन पर्याय; सात दिवसात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश

·       मोहरम ताजियाची देशभरात मिरवणूक काढण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

·       खोट्या बातम्यांवर अंकुश ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रत्यक्ष तपास पथकाची स्थापना

·       राज्यात १४ हजार ७१८ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण तर उपचारादरम्यान ३५५ जणांचा मृत्यू

·       मराठवाड्यातही ३३ जणांचा मृत्यू तर एक हजार ५५ नवे रुग्ण.

आणि

·       मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर परभणीचे खासदार संजय जाधव यांची नाराजी दूर

****

वस्तू आणि सेवा कर - जीएसटीच्या परताव्यासंदर्भात जीएसटी परिषदेनं राज्य सरकारांना दोन पर्याय दिले आहेत. केंद्र सरकारनं स्वतः कर्ज काढून परतावा द्यावा की, भारतीय रिझर्व्ह बॅकेकडून कर्ज घेण्यात यावं, अशी विचारणा केंद्रानं राज्यांकडे केली आहे. राज्यांना देण्यात येणाऱ्या परताव्यासंदर्भात जीएसटी परिषदेची ४१वी बैठक काल पार पडली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हे दोन पर्याय देण्यात आले आहेत. हे दोन्ही पर्याय चालू वर्षांसाठीच असणार आहेत. या दोन पर्यायांवर सात दिवसात राज्यांना भूमिका मांडायची असून, सात दिवसानंतर पुन्हा जीएसटी परिषदेची बैठक होणार आहे.

कोविड - १९ च्या संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. केंद्र सरकारच्या उत्पन्नात घट झाल्यानं जीएसटीतून राज्यांना देण्यात येणाऱ्या परताव्यावर याचा परिणाम झाला आहे.

दरम्यान, कोविड प्रादुर्भावामुळे चालू आर्थिक वर्षात जीएसटी संकलनात दोन लाख ३५ हजार कोटी रुपयांची घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मे, जून, जुलै आणि ऑगस्ट या चार महिन्यांचा राज्यांना केंद्राकडून मिळणारा जीएसटी परतावा अद्याप मिळालेला नाही. ही थकबाकी लवकरात लवकर अदा करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. राज्यापेक्षा केंद्र सरकारला स्वस्त व्याजदरानं कर्ज मिळू शकतं, त्यामुळे केंद्र सरकारनं स्वतः कर्ज काढून हा परतावा द्यावा अशी भूमिका पवार यांनी घेतली आहे.

कोविड प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारांना केंद्राकडून अधिकाधिक निधीची अपेक्षा असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.

****

मोहरम ताजियाची देशभरात मिरवणूक काढण्यास परवानगी देता येणं शक्य नसल्याचं काल सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. पुरीतील रथयात्रा तसंच पर्युषण पर्वानिमित्त जैन मंदीरात जाण्यास देण्यात आलेल्या परवानगीच्या धर्तीवर मुस्लीम बांधवांना परवानगी देण्यात यावी अशा याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती, त्यावर सुनावणी करतांना सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठानं ही परवानगी नाकारली आहे. पुरी रथयात्रा ही एकाच ठिकाणी आणि निश्चित मार्गावर जाणारी यात्रा होती, तर जैन मंदिरात केवळ पूजेची परवानगी देण्यात आल्याचं स्पष्ट करत न्यायालयानं संपूर्ण देशात एकाचवेळी मोहरम ताजियाची मिरवणूक काढण्यास परवानगी देता येऊ शकत नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. यासंदर्भात राज्य सरकारची बाजू ऐकल्याशिवाय संपूर्ण देशात लागू होणारा कुठलाही आदेश देता येत नाही, आणि संपूर्ण देशाला लागू असलेल्या आदेशाला फाटा देत धार्मिक कार्यक्रमासाठी परवानगी दिली जा शकत नाही, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

****

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षा - जेईई आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता तसंच प्रवेश चाचणी - एनईईटी परीक्षेसाठी देशभरातल्या १७ लाखाहून अधिक उमेदवारांनी संकेतस्थळावरून आपली प्रवेश पत्रं प्राप्त करून घेतली आहेत, याचा अर्थ हे सर्वजण परीक्षा देण्यास इच्छुक असल्याचं, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी म्हटलं आहे. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात आहे, त्या अनुषंगानं पोखरियाल बोलत होते.

एनईईटी नीट परीक्षेसाठी आतापर्यंत नऊ लाख ९४ हजार उमेदवारांनी तर जेईई मुख्य परीक्षेसाठी साडे सात लाखावर उमेदवारांनी आपली प्रवेशपत्रं संकेतस्थळावरून प्राप्त केली आहेत. सुमारे साडे आठ लाख उमेदवारांनी जेईई मुख्य परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, तर १५ लाख उमेदवारांनी नीट साठी नोंदणी केलेली आहे. नीट परीक्षा येत्या १३ सप्टेंबरला तर जेईई परीक्षा एक ते सहा सप्टेंबर या दरम्यान होणार आहे.

****

सरकारनं फेक न्यूज अर्थात खोट्या बातम्यांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रत्यक्ष तपास पथक स्थापन केलं आहे, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली. हे पथक डिजिटल माध्यमांवर आलेल्या माहितीची तपासणी करेल, असं जावडेकर यांनी सांगितलं. भारतीय इंटरनेट आणि मोबाइल संघटनेच्या वतीनं काल घेण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते दूरदृश्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. लोकांची मतं भ्रमित करण्याकडे सामाजिक संपर्क माध्यमांवर असलेला कल, सर्वसामान्यांसाठी धोकादायक असल्याचं, जावडेकर यांनी नमूद केलं.

****

देशभरात सध्याच्या खरीप हंगामात युरियाच्या विक्रीत वाढ झाली असल्याचं रसायन आणि रासायनिक खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी काल नवी दिल्लीत एका बैठकीत सांगितलं. गरजेनुसार सरकार युरियाची आयातही करत असल्याचं ते म्हणाले. वाढत्या मागणीबरोबरच आयात प्रक्रियाही गतीमान केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

अनुवांशिकरित्या सुधारित अन्नधान्याच्या आयातीला परवानगी नाकारण्यात येणार असल्याची माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी काल लातूर इथं दिली. सोयाबीन, सर्व प्रकारच्या डाळी, मका, तांदूळ गहू तसंच भाज्या आणि फळांची आयात करण्यापूर्वी ते नॉन जीएमओ अर्थात अनुवांशिकरित्या सुधारित नसल्याचं पत्र संबंधित देशानं देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. यामुळे भारतीय उत्पादनांना चांगला भाव मिळून शेतकऱ्यांच्या मालाला अधिक मोबदला मिळेल, असं पटेल यांनी सांगितलं.

आयात करण्यात आलेला माल तसंच बियाणं अनुवांशिकरित्या सुधारित नाहीत, हे तपासून घेण्यासाठी केंद्र सरकारला नवी प्रयोगशाळा उभारावी लागणार असल्याचं पाशा पटेल यांनी सांगितलं.

****

रत्नागिरी हा राज्यातला पहिला इनोव्हेशन डिस्ट्रिक्ट म्हणजेच औद्योगिकदृष्ट्या नवप्रवर्तन जिल्हा म्हणून विकसित करण्यात येणार आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल ऑनलाइन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. येत्या तीन ते चार महिन्यांमध्ये याबाबतचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याअंतर्गत जिल्ह्यात प्रदूषणविरहित उद्योग तसंच पर्यटन विकासाला चालना देणारे उद्योग उभारण्याकरता प्रयत्न केले जातील तसंच उच्च तांत्रिक शिक्षण घेतलेल्या एक लाखाहून अधिक तरुणांना रोजगार उपलब्ध हो, या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात येणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं.

****

राज्यात काल १४ हजार ७१८ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले.त्यामुळे राज्यातल्या या आजाराच्या रुग्णांची संख्या आता सात लाख ३३ हजार ५६८ एवढी झाली आहे. आतापर्यंत या आजारातून पाच लाख ३१ हजार ५६३ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या एक लाख ७हजार २३४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल दिवसभरात राज्यात उपचारादरम्यान ३५५ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे राज्यात या आजारानं मृत पावलेल्या रुग्णांची संख्या २३ हजार ४४४ एवढी झाली आहे.राज्यात आतापर्यंत एकूण ३८ लाख ६२ हजार १८४ लोकांची कोरोना विषाणू संसर्ग चाचणी करण्यात आली आहे.

****

मराठवाड्यातही काल ३३ रुग्णांचा मृत्यू झाला तर एक हजार ५५ नवे रुग्ण आढळले.

औरंगाबाद जिल्ह्यात काल तेरा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर ४२६ नवे रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात काल ९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर जिल्ह्यात १४८ नवे बाधीत रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू झाला तर ११८ नवे रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू झाला तर ६३ नवे रुग्ण आढळले. परभणी जिल्ह्यात दोन कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला, तर ६३ नवे रुग्ण आढळले.

****

जालना जिल्ह्यात काल एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला तर दिवसभरात ८१ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात १३१ तर हिंगोली जिल्ह्यात काल कोरोना विषाणू संसर्गाचे २५ नवीन रुग्ण आढळले.

****

मुंबईत काल एक हजार ३५० नवे रुग्ण आढळून आले तर ३० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुंबई शहरात आतापर्यंत एक लाख ४० हजार ८८८ रुग्ण आढळले असून यापैकी सध्या १हजार ४६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे जिल्ह्यात तीन हजार ७०३ रुग्ण आढळून आले तर उपचारादरम्यान ६९ जणांचा मृत्यू झाला. नाशिक  एक हजार ८४६, सिंधुदुर्ग २१, सातारा ५७५, सांगली ५२७, पालघर ३४१, धुळे १९२, वाशिम८, चंद्रपूर १३२, गडचिरोली ५६, अमरावती एवढे नवे रुग्ण आढळले.

****

पुण्याच्या सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये कोविशील्ड लस टोचून घेणारे नांदेडचे स्वयंसेवक रुपेश देशमुख बारडकर यांनी तरुणांना या संशोधनात सहकार्यासाठी पुढे येऊन लस टोचून घेण्याचं आवाहन केलं आहे. आपला अनुभव आकाशवाणीला सांगताना बारडकर म्हणाले..

 माझं फिजिशियन कडून मेडिकल चेकअप झालं आणि ऑल पॅरामीटर चेकअप झाले. त्‍यानंतर एनटीपीसीआर टेस्ट झाली आणि अँटीबॉडी टेस्टसाठी बल्ड स्मॅपल घेण्यात आले. दोन्‍ही निगेटीव्ह आल्यानंतर मी वॅक्सीन घेतली. ॲज ए यंगस्टर ट्वेंटी ट्वेटीचा नविन भारत म्हणून मी इच्छूक होतो की देशासाठी काहीतरी करण्याचं. आणि माझं युवकांना पण आवाहन आहे की, वॅक्सीनच्या ट्रायलमध्ये सहभाग करावा जेणेकरुन तुमचं वॅक्सीन ट्रायल सक्सेस झाली तर लवकरात लवकर आपल्या देशासाठी कोरोनाची वॅक्सीन येईल.

****

परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष दडपशाही करत असल्याचा आरोप करत खासदार संजय जाधव यांच्या राजीनाम्याचे परभणीत पडसाद उमटले आहेत. शहरातल्या वसमत मार्गावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयावर अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली. यासंदर्भात बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी खासदार जाधव हे भाजपला पोषक वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, जिंतूर बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक निवडीवरून नाराज झालेल्या खासदार संजय जाधव यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जिंतूर प्रकरणी योग्य तो निर्णय घेतला जाईल असं, श्वासन देत ठाकरे यांनी जाधव यांची नाराजी दूर केली.

****

लातूर जिल्ह्यात उदगीर पंचायत समितीचे सभापती विजय निळकंठ पाटील आणि अहमदपूर पंचायत समितीचे उपसभापती बालाजी रामराव गुट्टे यांच्याविरूद्ध दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी आज शुक्रवारी दोन्ही पंचायत समितीच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, यासंदर्भात भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांनी भाजपाच्या सर्व सदस्यांना पक्षादेश दिला असून तो डावल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

****

बियाणे, खते आणि कीटकनाशकांचे नमुने व्यर्थ गेल्यास व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल  होऊ नयेत, अशी मागणी महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, आणि सीड्स डीलर्स संघटनेनं केली आहे. संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी काल यासंदर्भात केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर तसंच खतं आणि रसायनं मंत्री सदानंद गौडा यांची भेट घेऊन, या मागणीचं निवेदन सादर केलं. खताचं आवंटन वाढवून द्यावं, मुदतबाह्य कीटकनाशकं कंपनीनं परत घ्यावीत, रासायनिक खताचा पुरवठा पोहोच मिळावी, आदी मागण्याही या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या अडचणी समजून घेत, मार्ग काढण्याचं आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिलं. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या १३ कृषी सेवा केंद्रांचे परवाने जिल्हा कृषी अधीक्षकांनी निलंबित केले आहेत. एक एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीत सर्वात जास्त युरिया खरेदीदार दुकानदारांची तपासणी करण्याच्या केंद्र सरकारच्या सूचना होत्या. त्यानुसार जिल्ह्यातल्या २० दुकानदारांना सुनावणीसाठी नोटिसा देण्यात आल्या होत्या. या सुनावणीदरम्यान तेरा कृषी सेवा केंद्रांच्या परवाना धारकांकडून आलेल्या माहितीच्या आधारे या तेरा दुकानांचे परवाने रद्द केले आहेत.

****

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - मनरेगा अंतर्गत जनावरांसाठी गोठे बांधकामाकरता सुरू केलेल्या योजने अंतर्गत नांदेड तालुक्यात १०६ गोठे बांधकामास मान्यता देण्यात आली आहे. नांदेड पंचायत समितीच्या सभापती गोदावरीबाई वाघमारे यांनी ही माहिती दिली. एका गोठ्यासाठी कुशल रक्कम म्हणून ५१ हजार रुपये तर अकुशल कामासाठी १९ हजार रुपये असे एकूण ७० हजार रुपये लाभार्थीस देण्यात येत आहेत. नांदेड तालुक्यात १०६ गोठ्यासाठी ७४ लाख २० हजार रुपये निधी प्राप्त झाल्याचं वाघमारे यांनी सांगितलं.

****

औरंगाबादमधील महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयाच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदी डॉक्टर नरेश गीते काल रूजू झाले. ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा देण्याचा तसंच त्यांच्या सर्व समस्या सोडवण्यास आपलं प्राधान्य राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

धुळे इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करणारे पोलीस कर्मचारी सी.एस.पाटील यांना निलंबित करण्यात आलं आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट नाकारल्यानंतर मंत्र्याचा ताफा अडवून निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी परवा लाठीमार केला होता.

दरम्यान, या प्रकरणी राज्यात अनेक ठिकाणी काल निषेध आंदोलन करण्यात आलं.

नांदेड जिल्ह्यात भारतीय युवा जनता मोर्चातर्फे ठिकठिकाणी निषेध नोंदवण्यात आला. अर्धापूर इथं युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं.

हिंगोलीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं गांधी चौकात आंदोलन करण्यात आलं. हातात निषेधाचे फलक घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी या निदर्शनांमध्ये सहभागी होत, या घटनेविरोधात घोषणाबाजी केली.

परभणी इथं, भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीनं या घटनेचा निषेध करत, शिक्षणमंत्री उदय सामंत आणि धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

//***********//

No comments: