Wednesday, 26 August 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 26 AUGUST 2020 TIME – 13.00

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 August 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ ऑगस्ट २०२० दुपारी १.०० वा.

****

देशात कोरोना विषाणुच्या संसर्ग तपासणीसाठी कालपर्यंत तीन कोटी ७६ लाख ५१ हजार ५१२ नमुन्यांची चाचणी झाली असून काल यातल्या आठ लाख २३ हजार ९९२ नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. या संसर्गाचे नवे ६७ हजार १५१ रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांची संख्या आता ३२ लाख ३४ हजार ४७४ झाली आहे. यातले २४ लाख ६७ हजार ७५८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७६ पूर्णांक ३० शतांश टक्के असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. सध्या सात लाख सात हजार २६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात कोरोना विषाणुमुळे गेल्या चोवीस तासांत एक हजार ५९ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ५९ हजार ४४९ झाली आहे. मृत्यूदर एक पूर्णांक ८३ शतांश टक्केपर्यंत घटला असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात सध्या चार हजार ४३० रूग्ण कोरोना विषाणुवर उपचार घेत आहेत. आज सकाळी या संसर्गाचे १२३ रुग्ण आढळल्यानं जिल्ह्यातली रुग्ण संख्या २१ हजार ५१५ झाली आहे.

आज आढळलेल्या रुग्णांमधे ग्रामीण भागातल्या ५६ आणि महापालिका हद्दीतल्या ६७ रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सोळा हजार ४४० रुग्ण या संसर्गावर उपचार घेऊन बरे झाले आहेत तर ६४५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे.

****

ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणुचे नवे ७८८ रुग्ण आढळल्यानं एकूण रुग्ण संख्या एक लाख १६ हजार ४१३ झाली आहे. जिल्ह्यात काल ४७ रुग्णांचा या संसर्गावर उपचार सुरू असताना मृत्यू झाल्यानं यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या तीन हजार ३४८ झाली आहे. काल मृत्यू झालेल्यांतले १२ रुग्ण ग्रामीण भागातले आहेत. ठाणे जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८६ पूर्णांक ६५ टक्के असून मृत्यूचं प्रमाण दोन पूर्णांक ८८ टक्के आहे. 

****

पालघर जिल्ह्यातली कोरोना विषाणुच्या रुग्णांची संख्या २२ हजार ७४५ झाली आहे. जिल्ह्यामधे कालपर्यंत ४२६ रुग्ण या संसर्गामुळे मृत्यूमुखी पडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

****

अमरावती जिल्ह्यात आणखी ११३ जणांना कोरोना विषाणुची लागण झाल्यामुळे जिल्ह्यातली रुग्ण संख्या ४ हजार ८०० झाली आहे. आतापर्यंत ३ हजार ५०४ रुग्ण बरे झाले असून, ११२ रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे तर सध्या १ हजार १८४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मध्य मुंबईतल्या वरळी भागामधे एका पंधरा मजली इमारतीला लागलेल्या आगीमधे अडकलेल्या दहा जणांची अग्निशमन दलानं सुटका केली आहे. मध्यरात्रीनंतर लागलेली ही आग आज पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास विझवण्यात आल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

****

रायगड जिल्हयातल्या महाड इथल्या इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या आता १५ झाली असून मदत आणि बचाव कार्य अंतिम टप्प्यात आहे. सकाळी ढिगा-यातून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, दूर्घटनेत नऊ जण जखमी झाले आहेत.

****

जालना जिल्ह्यात गणेशोत्सव आणि गौरी पूजनानिमित्त फुलांच्या दरात वाढ झाल्याचं चित्र आहे. शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुलातल्या फुल बाजारात आज झेंडू, गुलाब, शेवंती, गलांडा या फुलांना चारशे रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला, तर जर्बेराचं एक फुल दहा रुपयांना विकलं गेलं.

****

टाळेबंदीच्या काळातली विज देयकं माफ करावीत, श्रमिकांना १० हजार रुपयांची तातडीनं मदत करावी या प्रमुख मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आज सोलापूरमधे आंदोलन करण्यात आलं. २५ हजार विज पत्रकांची यावेळी होळी करण्यात आली. मनरेगा शहरी भागात राबवा, वर्षातून दोनशे दिवस काम आणि कामाप्रमाणे दाम द्या, रास्तधान्य दुकानातून मोफत धान्य द्या या मागण्याही आंदोलकांनी केल्या. औद्योगिक विकास महामंडळातल्या उद्योजकांना २ रुपये ७६ पैसे प्रति एकक तर सर्वसामान्यांना प्रति एकक ७ रुपये वीजबिल आकारणीचा भेदभाव सुरू असल्याचा आरोप माकपचे केंद्रीय समिती सदस्य नरसय्या आडम यांनी यावेळी केला.

****

ंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीच्या `मन की बात` या कार्यक्रम मालिकेतून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. सकाळी अकरा वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. या कार्यक्रम मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातला हा ंधरावा भाग असेल.

****

स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ शहर सर्वेक्षण स्पर्धेत अमरावती शहराची क्रमवारी सुधारली आहे.

****

 

No comments: