आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२८
ऑगस्ट २०२० सकाळी ११.०० वाजता
****
जनधन योजना ही गरीबी उन्मुलनासाठी
केलेल्या उपाययोजनांचा आधार ठरल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या
योजनेला आज सहा वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्तानं मोदी यांनी एका ट्विट संदेशात ही बाब
नमूद केली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ४० कोटी ३५ लाख बँक खाती उघडून त्यात एक
लाख ३१ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
****
कोविडमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी राज्य सरकारांनी ठोस पावलं उचलावीत, असा सल्ला केंद्र सरकारनं दिला आहे. देशात गेल्या आठवड्यात कोविडमुळे झालेल्या
मृत्यूंपैकी ८९ टक्के मृत्यू, महाराष्ट्रासह नऊ राज्यं आणि केंद्रशासित
प्रदेशांमधले असल्याचं आढळलं आहे. त्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट सचिवांनी आढावा घेऊन,
हा सल्ला दिला आहे.
****
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद - आयसीएमआरतर्फे, देशाच्या
विविध भागात करण्यात येत असलेल्या दुसऱ्या सेरो सर्वेक्षणात, १० वर्षे वयापासून पुढील वयोगटातील मुलांचाही समावेश केला जाणार आहे. यापूर्वी
झालेल्या पहिल्या सर्वेक्षणात फक्त १८ वर्षांपासून पुढील वयोगटातल्या नागरिकांचाच सहभाग
होता.
****
टाळेबंदीमध्ये आंतरजिल्हा प्रवास बंद असताना बनावट ई पासच्या माध्यमातून दोन हजार
रुपयांत प्रवासाची परवानगी देणाऱ्या टोळीचा नाशिक पोलीसांनी छडा लावला आहे. या प्रकरणी
रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर इथला राकेश सुर्वे याला नाशिक पोलीसांनी अटक केली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज कोरोना विषाणू संसर्गाचे नवे ७८
रुग्ण आढळले. जिल्ह्यातील कोविड बाधितांची
एकूण संख्या आता २२ हजार २६३ झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये महापालिका हद्दीतल्या
४५ तर ग्रामीण भागातल्या ३३ रुग्णांचा समावेश
आहे.
****
धुळे
जिल्ह्यात नरडाणा - शिरपूर दरम्यान, एक अवजड वाहन तापी नदीवरच्या पुलाचा कठडा तोडून
पाण्यात पडल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. या अपघाताबाबत अधिक तपास सुरू असून,
वाहनाबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.
//**********//
No comments:
Post a Comment