Thursday, 27 August 2020

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २७ ऑगस्ट २०२० सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 August 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ ऑगस्ट २०२० सकाळी ७.१० मि.

****

·       अभिहस्तांतरण पत्राच्या दस्तांवरील प्रचलित मुद्रांक शुल्काच्या दरात कपातीचा राज्य सरकारचा निर्णय; सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांनाही ३० सप्टेंबरपर्यंत करमाफी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षाही पुढे ढकलल्या

·       मराठा आरक्षण प्रकरणाची सुनावणी अकरा न्यायमूर्तींच्या पीठाकडे सोपवण्याची याचिकाकर्त्यांनी मागणी

·       कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर जेईई आणि नीट परीक्षेच्या काळात संपूर्ण काळजी घेण्याची आणि आवश्यक सर्व उपाययोजना करण्याची राष्ट्रीय परीक्षा संस्थेची ग्वाही

·       राज्यात काल सर्वाधिक १४ हजार ८८८ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले तर २९५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

·       मराठवाड्यातही ३७ जणांचा मृत्यू तर एक हजार ३६ नवे रुग्ण

आणि

·       जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्तीवरून नाराज झालेले परभणीचे खासदार संजय जाधव यांचा राजीनामा

****

अभिहस्तांतरण पत्राच्या दस्तांवरील प्रचलित मुद्रांक शुल्काच्या दरात कपातीचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं काल घेतला. राज्यात सध्या पाच ते सहा टक्के असलेला हा र एक सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीकरिता तीन टक्क्यांनी तर एक जानेवारी  ते ३१ मार्च २०२१ या कालावधीकरिता दोन टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे गृहनिर्माण, बांधकाम तसंच स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीच्या व्यवसायाला दिलास मिळणार आहे. यामध्ये मानवी अभिहस्तांतरण, भेटनामा, गहाणखत, अदलाबदली करार, वाटणीपत्र, मुखत्यारपत्र, भाडेकरारपत्र, कुळवहिवाट, भाडेपट्टीपत्र यावरचं शुल्क कमी होणार आहे.

 

सार्वजनिक वाहतुक आणि मालवाहतुक करणाऱ्या वाहनांना ३० सप्टेंबरपर्यंत वाहन करमाफी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत घेतला. मालवाहतुक करणारी वाहनं, पर्यटक वाहनं, खोदकाम करणारी वाहनं, खाजगी सेवा वाहनं, तसंच शालेय विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या वाहनांना हा निर्णय लागू असेल. राज्यभरात सुमारे ११ लाख ४० हजारावर वाहनधारकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

 

अतिरिक्त दुधाचं भुकटीत रुपांतर करण्याच्या योजनेला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णयही काल मंत्रिमंडळानं घेतला. आता ही योजना ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. ही भुकटी आदिवासी विकास विभागाच्या भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार या योजनेंतर्गत सहा लाख ५१ हजार मुलं, एक लाख २१ हजार गर्भवती तसंच स्तन्यदा मातांना एक वर्षाकरता उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

****

मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातल्या आठ महानगरपालिका आणि सात नगरपालिकांसाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

****

राज्याच्या शहरी भागासाठी आरोग्य सेवा संचालक तसंच इतर सहा पदं निर्माण करण्यात येणार आहेत. शहरी भागामध्ये लसीकरण, साथ रोग आणि इतर आरोग्यविषयक कार्यक्रम अधिक परिणामकारकतेने राबवण्यासाठी तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत राहील.

****

कोविड परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनी काल मंत्रिमंडळ बैठकीत ही माहिती दिली. परीक्षेचं सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

****

टाळेबंदीच्या काळात कर्जाच्या हप्प्त्यांवरच्या व्याजात सूट देण्याबाबत केंद्र सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. या सदंर्भात एका याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं, भारतीय रिजर्व्ह बँकेचं याबाबतचं धोरण संभ्रम निर्माण करणारं असल्याचं म्हटलं आहे. रिजर्व्ह बँक फक्त उद्योजकांच्या नुकसानाबाबत चिंता करत आहे, त्यासोबतच सर्वसामान्यांच्या अडचणीचाही विचार करायला हवां, असं न्यायालयानं म्हटलं आहे. यासंदर्भात सरकारनं आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत असलेल्या अधिकाराचा वापर करत, आपली भूमिका स्पष्ट करावी, असं न्यायालयानं सांगितलं आहे.

****

वस्तू आणि सेवा कर - जीएसटीच्या परताव्यासंदर्भात काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काल देशभरात विरोधी पक्षांची सरकारं असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. केंद्र सरकारनं राज्यांना वस्तू आणि सेवा कराची नियमानुसार १४ टक्के भरपाई वेळेत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आज होत असलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर काल ही बैठक घेण्यात आली. दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पश्चिम बंगाल, झारखंड, पंजाब, राजस्थान, छत्तीसगड तसंच केरळचे मुख्यमंत्री सहभागी झाले. विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांनी आपला आवाज बुलंद करण्याची गरज असल्याचं मत मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

 

मराठा आरक्षण प्रकरण अकरा न्यायमूर्तींच्या पीठाकडे सोपवण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. काल सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत राज्य सरकारच्या वतीनं मुकुल रोहतगी यांनी तर आरक्षणाला समर्थन देणाऱ्या याचिकाकर्त्यांच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी ही मागणी केली. केंद्र सरकारने दिलेल्या आर्थिक आरक्षण प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलं आहे, त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात चर्चेसाठी त्यापेक्षा मोठं पीठ हवं, असा युक्तिवाद रोहतगी यांनी यावेळी केला. या प्रकरणी पुढची सुनावणी उद्या शुक्रवारी होणार आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण प्रकरणात राज्य सरकारच्या भूमिकेबाबत विनायक मेटे यांच्याकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र दाते पाटील तसंच किशोर चव्हाण यांनी केला आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. मेटे हे आपल्या राजकीय अस्तित्वाची लढाई लढत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

****

पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या `ऑक्सफोर्ड कोविड-१९` लसीच्या चाचणीचा दुसरा टप्पा कालपासून सुरू झाला. पुण्यातल्या भारती विद्यापीठ आणि वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दोन पुरुष स्वयंसेवकांना ही लस देण्यात आल्याची माहिती या महाविद्यालयाचे संचालक डॉ. संजय ललवाणी यांनी दिली. येत्या आठवड्यात एकूण पंचवीस जणांना ही लस दिली जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. अधिक माहिती देत आहे आमचे वार्ताहर

 यासाठी सुरुवातील पाच स्वयंसेवकांची निवड करण्यात आली.त्यापैकी तिघांच्या अँटीबॉडी टेस्ट पाझिटिव्ह आल्याने इतर दोन जणांना लस देण्यात आली. लस दिल्यानंतर अर्धातास निरीक्षण केल्यानंतर घरी सोडण्यात आलं. दोन्ही स्वयंसेवकांना अर्धामिली डोस देण्यात आला. पुढचे काही दिवस या स्वयंसेवकांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवणार असून २८ दिवसानंतर लसीचा दुसरा डोस दिला जाईल.पुढील सात दिवसांमध्ये पंचवीस जणांना लस देणार असल्याचंही लालवाणी यांनी सांगितलं. आकाशवाणी बातम्यांसाठी भुषण राजगुरु पुणे.

****

कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी संयुक्त प्रवेश परीक्षा - जेईई आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता तसंच प्रवेश परीक्षा - एनईईटी या दोन्ही परीक्षेच्या काळात संपूर्ण काळजी घेतली जाईल तसंच आवश्यक सर्व उपाययोजना केल्या जातील, असं राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं म्हटलं आहे. सर्व विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य असल्याचं संस्थेचे महासंचालक डॉक्टर विनित जोशी यांनी म्हटलं आहे. संस्थेच्या निर्णयानुसार येत्या एक ते सहा सप्टेंबर दरम्यान अभियांत्रिकी प्रवेशासाठीची संयुक्त प्रवेश परीक्षा तर १३ सप्टेंबरला वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची राष्ट्रीय पात्रता तसंच प्रवेश चाचणी होणार आहे. परीक्षेच्या काळात सुरक्षित अंतर राखण्यासंदर्भात सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन केलं जाईल. परीक्षा कक्षांची संख्या वाढवण्यात आली असून आता एका कक्षात फक्त १२ उमेदवारचं असतील. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या समुहांना वेगवेगळा वेळ देण्यात आला आहे. त्याचबरोबर परीक्षकांची संख्याही दुप्पट करण्यात आली आहे.

रम्यान, या दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरण्याची मागणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या पत्रात, मुंडे यांनी राज्यात कोरोना विषाणूची साथ कायम आहे, त्याचबरोबर दळणवळणाच्या पुरेशा सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत, त्यामुळे अनेक परीक्षार्थी या चाचणीसाठी उपस्थित राहू शकणार नाहीत, असं म्हटलं आहे.

रम्यान, महाराष्ट्रासह विरोधी पक्षाचं सरकार असलेल्या सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या परीक्षा घेण्याला विरोध दर्शवला आहे. 

****

रायगड जिल्ह्यातल्या महाड इमारत दुर्घटनेस जबाबदार पाच आरोपींपैकी एकाला न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बाहुबली धामणे असं त्याचं नाव असून, तो संबंधित इमारतीचा आराखडा सल्लागार आहे. महाड पोलिसांनी धामणे याला नवी मुंबईतून अटक करून काल माणगाव न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. धामणे याच्यासह इमारतीचा वास्तुविशारद गौरव शहा, महाड नगरपालिकेचे तत्कालिन मुख्याधिकारी दीपक जिंदाड, अभियंता शशिकांत दिघे, आणि बांधकाम व्यावसायिक फारूक काझी या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे, अन्य चौघांनाही लवकरच अटक केली जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. काही वर्षांपूर्वी बांधलेली ही पाच मजली इमारत सोमवारी सायंकाळी कोसळली, त्यात १७ जणांचा मृत्यू झाला तर ९ जण जखमी झाले आहेत.

****

राज्यात काल १४ हजार ८८८ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. आतापर्यंत एका दिवसात आढळलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत. यामुळे राज्यातल्या या आजाराच्या रुग्णांची संख्या आता सात लाख १८ हजार ७११ एवढी झाली आहे. आतापर्यंत या आजारातून पाच लाख २२ हजार ४२७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या एक लाख ७२ हजार ८७३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल दिवसभरात राज्यात उपचारादरम्यान २९५ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे राज्यात या आजारानं मृत पावलेल्या रुग्णांची संख्या आता २३ हजार ८९ एवढी झाली आहे.

****

मराठवाड्यातही काल ३७ रुग्णांचा मृत्यू झाला तर एक हजार ३६ नवे रुग्ण आढळले.

औरंगाबाद जिल्ह्यात काल चौदा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर ३६७ नवे रुग्ण आढळले.

नांदेड, बीड आणि लातूर जिल्ह्यात काल प्रत्येकी पाच रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर नांदेडमध्ये २१६, बीडमध्ये ५१ आणि लातूरमध्ये १५३ नवीन रूग्ण आढळले.

उस्मानाबाद जिल्ह्यात काल तीन रुग्णांचा मृत्यू झाला, तर नवे १३५ बाधित रुग्ण आढळले,

जालना आणि परभणी जिल्ह्यात काल प्रत्येकी दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर जालना जिल्ह्यात ६६ आणि परभणीत ४१ नवीन रुग्ण आढळले. हिंगोली जिल्ह्यात एका बाधित रुग्णाचा मृत्यू झाला, तर नव्याने सात रुग्ण आढळले.

****

मुंबईत काल एक हजार ८५४ नवे रुग्ण आढळून आले तर २८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुंबई शहरात आतापर्यंत एक लाख ३९ हजार ५३७ रुग्ण आढळले असून यापैकी सध्या १८ हजार ९७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे शहरात एक हजार ६४९ रुग्ण आढळून आले तर उपचारादरम्यान ३७ जणांचा मृत्यू झाला. पिंपरी चिंचवडमध्ये एक हजार आठ, नाशिक ९९१, सांगली ४४४, सातारा ५०५, सिंधुदुर्ग ४०, पालघर २३७, तसंच वाशिम २७ नवे रुग्ण आढळले.

****

परभणी जिल्ह्यात जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर सलग दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यावरून नाराज झालेले परभणीचे खासदार संजय जाधव यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला. जिंतूरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार नसतानाही दुसऱ्यांदा बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त केलं गेलं. राज्यात शिवसेनेचं सरकार असतानाही आपण कार्यकर्त्यांना पदावर जाण्याची संधी आणि न्याय देऊ शकत नसेल तर खासदारकी उपयोगाची नाही, असं त्यांनी राजीनामा पत्रात म्हटलं आहे.

****

राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं नियम आणि अटी घालून एक सप्टेंबर पासून उघडण्यास परवानगी देण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं शनिवारी उस्मानाबाद जिल्ह्यात आंदोलन करण्यात येणार आहे. आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी धार्मिकस्थळं उघडण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी पत्र लिहिलं होतं, या मागणीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी प्रार्थनास्थळाजवळ घंटानाद किंवा इतर प्रतिकात्मक कृती करून आंदोलन केलं जाणार आहे, असं पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्य सरकारनं परवानगी दिली नाही तर एक सप्टेंबरपासून मंदिरं आणि दोन सप्टेंबरपासून मशिदी उघडल्या जातील, असं औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

****

लातूर जिल्ह्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत असे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी प्रशासनाला दिले आहेत. सोयाबीनच्या नुकसानीची माहिती मिळाल्यावर आमदार धीरज देशमुख यांनी भडी इथल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली. जिल्ह्यात आणखी अशी काही प्रकरणे असल्यास याचा तातडीने शोध घ्यावा अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी केली आहे.

****

ऊसतोड कामगारांच्या मजुरी दीडशे टक्के वाढ केल्याशिवाय यंदा साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा इशारा आमदार सुरेश धस यांनी दिला आहे. ते काल बीड जिल्ह्यात आष्टी इथं वार्ताहरांशी बोलत होते. लवाद म्हणेल तो अंतिम शब्द राहील, मात्र ऊसतोड कामगार, मुकादम यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ऊसतोड कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न सुटल्याशिवाय कुठल्याही कारखान्यावर ऊसतोड कामगार जाणार नाहीत असा इशाराही आमदार धस यांनी दिला आहे.

****

गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यात काल झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली. नक्षलविरोधी अभियानांतर्गत दोलंदा जंगलात पोलिस पथकाकडून गस्त सुरू असताना, नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला, त्याला दिलेल्या प्रत्युत्तरात महिला नक्षलवादी ठार झाल्याचं, पोलिसांकडून सांगण्यात आलं.

****

राज्यात काल पाच दिवसांच्या गणपतींचं विसर्जन झालं. सांगली संस्थानच्या गणपतीचंही काल साध्या पद्धतीनं विसर्जन करण्यात आलं.

//***********//

 

 

 

 

 

 

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...