Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 August 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ ऑगस्ट २०२० दुपारी १.०० वा.
****
सामुहिक प्रयत्नांतूनच देश क्रीडा क्षेत्रातली एक
महासत्ता म्हणून उदयास येऊ शकेल, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रपतींनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आज दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं वितरण केलं, त्यावेळी ते बोलत होते. आपले युवक हीच
आपली सर्वात मोठी संपत्ती असल्याचं ते यावेळी म्हणाले. देशात खेळ लोकप्रिय
करण्यासाठी तसंच यातल्या गुणवंतांना बळ देण्यासाठी सरकारतर्फे विविध प्रयत्न केले
जात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडा दिनानिमित्तच्या आपल्या संदेशात
म्हटलं आहे. देशाचं प्रतिनिधीत्व केलेल्या तसंच देशाचा नावलौकिक वाढवलेल्या
खेळाडुंचा गौरव करताना त्यांनी प्रत्येकानं खेळ आणि व्यायामाला दैनंदिन
व्यवहारामधे स्थान द्यावं, असं आवाहन केलं आहे. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनीही
क्रीडा दिनानिमित्त खेळाडुंना शुभेच्छा दिल्या आहेत.
****
देशात कोरोना विषाणुचे नवे ७६ हजार ४७२ रुग्ण आढळले
असून रुग्ण संख्या आता ३४ लाख ६३ हजार ९७२ झाली आहे. देशात आज सकाळी आठ
वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमधे या संसर्गामुळे एक हजार एकवीस रुग्णांचा मृत्यू
झाला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या एकूण रुग्णांची संख्या ६२ हजार ५५० झाली आहे.
मृत्यूदर एक पूर्णांक ८१ शतांश टक्क्यांपर्यंत कमी झाला असल्याची माहिती केंद्रीय
आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशात या संसर्गाचे २६ लाख ४८ हजार ९९८ रुग्ण उपचार
घेऊन बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७६ पूर्णांक ४७ शतांश टक्के आहे. या
संसर्गासाठी सात लाख ५२ हजार ४२४ रुग्णांवर उपचार सुरू असून एकूण रुग्णांच्या
तुलनेत हे प्रमाण २१ पूर्णांक ७२ शतांश टक्के आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गातून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण
वाढलेलं असलं तरी या प्रादुर्भावाला गांभीर्यानं घ्यायला हवं, असं केंद्रीय आरोग्य
मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. इंदूरमधे केंद्र सरकारनं सुरू केलेल्या २३७
कोटी रुपयांच्या अत्याधुनिक रुग्णालयाचं दूर दृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून
उदघाटन करताना ते काल बोलत होते.
****
जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षादलांनी आज
एका कारवाईत तीन दहशतवाद्यांना ठार केलं. झादूरा भागात सुरू या कारवाई दरम्यान एक
सैनिक शहीद झाला असून ही कारवाई अद्याप सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दक्षिण काश्मीरमधल्या या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा
दलांनी या भागाला वेढा घालून शोध मोहीम हाती घेतली होती. दहशतवाद्यांनी यावेळी सुरक्षा दलावर गोळीबार केल्यानंतर सुरू
झालेल्या चकमकीत हे दहशतवादी मारले गेले तर यात गंभीर जखमी झालेल्या सैनिकाचा
मृत्यू झाला असल्याची माहिती सैन्य दलाचे प्रवक्ते कर्नल राकेश कालिया यांनी दिली
आहे.
****
देशात गेल्या ४४ वर्षांमधील ऑगस्ट महिन्यातला सर्वाधिक
पाऊस यंदा नोंदवला गेला आहे. या महिन्यात काल पर्यंत झालेल्या पावसाच्या
नोंदीनुसार एकूण २५ टक्के अधिक पाऊस झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. या
पार्श्र्वभूमीवर देशाच्या विविध भागांमधे पूर स्थिती निर्माण झाली असल्याचं पीटीआय
वृत्तसंस्थेनं नमुद केलं आहे.
****
सांगली जिल्ह्यात आज कोरोना विषाणूचे ४८१ रुग्ण आढळले
असून जिल्ह्यातल्या रुग्णांची संख्या १० हजार ४२२ झाली आहे. विधानसभेतील विरोधीपक्ष
नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगली इथं ‘कोविड उपचार’ रुग्णालयाला भेट देऊन
उपचार पद्धती आणि आरोग्य यंत्रणेची पाहणी केली.
****
अमरावती जिल्ह्यात कोरोना विषाणुच्या रुग्णांची संख्या
५ हजार ३३४ झाली आहे. यापैकी ३ हजार ९१६ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत तर १ हजार
२९१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत १२७ रुग्ण या विषाणू संसर्गामुळे मरण
पावले आहेत.
****
सातारा जिल्ह्यात काल सहाशे एकोण सत्तर रुग्णांना
कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं आढळून आलं. यासह जिल्ह्यातल्या रुग्णांची संख्या १२
हजार ८८७ इतकी झाली आहे. जिल्ह्यात काल १२ बाधितांचा मृत्यू झाला.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या तीसगाव इथं हिंदू-मुस्लिम धर्मिय
एकत्र येऊन गेल्या ४० वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत आहेत. यंदा कोरोना विषाणू
संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तीसगावमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना तंसच आरोग्य
विषयक उपक्रम राबवले जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्यातली सर्व धार्मिक स्थळं विशेषत: मंदिरं सुरू
करावीत या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष आणि विविध धार्मिक संघटनांच्या वतीनं आज
मुंबई उपनगर, सांगलीमधील मिरज तसंच नाशिकमधे घंटानाद आंदोलन करण्यात आलं. नाशिकमधे
या आंदोलनात आमदार देवयानी फरांदे यांच्यासह शहरातले पुरोहित, वारकरी महामंडळाचे
सदस्य सहभागी झाले. मिरज इथं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या
नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment