Friday, 28 August 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 28 August 2020 Time 1.00 to 1.05pm Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 August 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ ऑगस्ट २०२० दुपारी १.०० वा.

****

येत्या ३० सप्टेंबरच्या आत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्याशिवाय राज्यं किंवा विद्यापीठं विद्यार्थ्यांना बढती देऊ शकत नाहीत, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोग - यूजीसीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायलयात सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयानं ही बाब नमूद केली. राज्य सरकारांना यूजीसीने ठरवलेल्या तारखेत परीक्षा घेणं शक्य नसेल, तर त्यांनी यूजीसीकडे संपर्क साधून परीक्षेच्या नवीन तारखा निर्धारित कराव्यात, असं न्यायालयानं म्हटलं आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यूजीसीच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयावर युवा सेनेसह काही याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला होता. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

****

अभियांत्रिकी तसंच वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या पात्रता प्रवेश परीक्षा जेईई आणि एनईईटी घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेस पक्षानं आज देशव्यापी आंदोलन पुकारलं आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी केली आहे. नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवाज उठवावा, असं काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी एका ट्विट संदेशात म्हटलं आहे. सरकारनं या परीक्षा घेण्याबाबत पुन्हा एकदा विचार करावा, असं आवाहन काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलं आहे.

****

अल्पसंख्याक समुदायाचं राज्यस्तरावर निर्धारण करण्याच्या मागणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारकडून उत्तर मागवलं आहे. देशातल्या दहा राज्यांमध्ये हिंदू समाज अल्पसंख्य आहे, मात्र अद्याप तसं जाहीर करण्यात आलेलं नाही, असं या याचिकेत म्हटलं आहे. यासंदर्भात केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. यासंदर्भात केंद्राचं म्हणणं जाणून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं केंद्रीय गृह मंत्रालय, विधी आणि न्याय मंत्रालय तसंच अल्पसंख्याक मंत्रालयाला नोटीस बजावली आहे.

****

देशात कोरोना विषाणूच्या संसर्गातून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७६ पूर्णांक २४ शतांश टक्क्यांवर पोहचलं आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये साठ हजार १७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आता देशात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २५ लाख ८३ हजार झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशात गेल्या चोवीस तासांमध्ये नऊ लाखंपेक्षा जास्त कोवीड नमुन्यांची चाचणी झाली असून आतापर्यंत तीन कोटी ९४ लाख नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. या संसर्गाने होणारा मृत्यू दर एक पूर्णांक ८३ शतांश टक्के झाला असल्याचंही केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

****

कोविडमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी राज्य सरकारांनी ठोस पावलं उचलावीत, असा सल्ला केंद्र सरकारनं दिला आहे. देशात गेल्या आठवड्यात कोविडमुळे झालेल्या मृत्यूंपैकी ८९ टक्के मृत्यू, महाराष्ट्रासह नऊ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधले असल्याचं आढळलं आहे. त्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट सचिवांनी आढावा घेऊन, हा सल्ला दिला आहे.

****

राज्यात अनेक भागात कोविड संसर्ग चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. ते आज पुण्यात बोलत होते. कोविड प्रतिबंधासंबंधात अद्याप समाधानकारक स्थिती नाही, असं फडणवीस यांनी नमूद केलं. अभिनेता सुशांतसिंह राजपुत मृत्यू प्रकरणात सीबीआय चौकशीनंतर समोर येत असलेले खुलासे आश्चर्यकारक असल्याचं फडणवीस म्हणाले

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज कोरोना विषाणू संसर्गाचे नवे ७८ रुग्ण आढळले. जिल्ह्यातील कोविड बाधितांची एकूण संख्या आता २हजार २६३ झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये महापालिका हद्दीतल्या ४५ तर ग्रामीण भागातल्या ३रुग्णांचा समावेश आहे.

****

पंतप्रधान जनधन योजनेतील ६३ टक्के बँक खातेदार हे ग्रामीण भागातील असल्याचं, माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी एका ट्विट संदेशात म्हटलं आहे. या योजनेला आज सहा वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्तानं त्यांनी ही बाब नमूद केली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ४० कोटी ३५ लाख बँक खाती उघडून त्यात एक लाख ३१ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेतून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून रविवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. या कार्यक्रम मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातला हा पंधरावा भाग आहे.

//***********//

 

 

 

 

No comments: