Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 August 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० ऑगस्ट २०२० सायंकाळी ६.००
****
*पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये
भीषण पूरस्थिती
*राज्य सरकारच्या भूमिकेमुळे
कोरोना विषाणुचे रुग्ण मोठ्या संख्येनं सापडले- मंत्री राजेश टोपे
*देशात कोरोना विषाणुचे रुग्ण
बरे होण्याचं प्रमाण ७६ पूर्णांक ६१ शतांश टक्के
आणि
*जालना नगरपालिकेच्या विकास
कामांना प्रारंभ
****
गेल्या दोन दिवसांपासून मध्य प्रदेश आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात सुरु असलेल्या जोरदार
पावसामुळे नागपूरसह पूर्व विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात भीषण
पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागपुर, चंद्रपुर, भंडारा आदी
जिल्ह्यात यापूर्वीच राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथकं
तैनात आहेत. पुण्याहून या भागात आणखी चार पथकं विशेष विमानानं दाखल झाली आहेत. गोसेखूर्द धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या
ब्रम्हपुरी तालुक्यातल्या नदीकाठच्या गावांनाही पुराच्या पाण्यानं वेढलं आहे. बचाव पथक गावांमध्ये अडकलेल्या नागरिकांना आवश्यक
साहित्यासह बोटीच्या आणि नावेच्या सहाय्यानं सुरक्षित स्थळी
पोहचवत आहेत. या पुरामुळे हजारो हेक्टर
जमीन पाण्याखाली आल्यानं, शेतकऱ्यांचं
मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नाशिकचं गंगापूर धरण ९७ टक्के भरलं असून, धरणातून १ हजार घनफूट
प्रतिसेकंद वेगानं गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात आलं आहे. नदीकाठच्या नागरिकांना
काळजी घेण्याचं आवाहन माहापालिकेनं केलं आहे.
****
कोरोना विषाणुचे रुग्ण शोधणं, त्यांच्या चाचण्या आणि उपचारांमधे
राज्य सरकारच्या अग्रेसर भूमिकेमुळे गेल्या महिनाभरात या संसर्गाचे रुग्ण मोठ्या संख्येनं
सापडल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. या संसर्गाबद्दल जागृती करणं,
सज्जता बाळगणं यावर सरकारनं लक्ष केंद्रित केलं असल्याची माहितीही त्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी
बोलताना दिली आहे. या विषाणू चाचणीसाठी ४०० प्रयोगशाळा कार्यरत असून दररोज ५० हजार
चाचण्या होत आहेत, असं त्यांनी नमुद केलं. गेल्या महिनाभरापासून निर्बंध उठवण्यात येत
असल्यामुळे या विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टाळेंबंदी हटवण्याच्या प्रक्रीयेसंदर्भात खूप दक्षता घेत
असून निर्बंध काढले जात असले तरी मागणी नंतरही धार्मिक स्थळं, चित्रटगृह, व्यायामशाळा
उघडण्यात आलेल्या नसल्याचं त्यांनी म्हटलं. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८०
टक्के असून मृत्यू दर दोन पूर्णांक चार दशांश आहे. गंभीर अवस्थेतील रुग्णांचं प्रमाण
दोन टक्के आहे. नव्या रुग्णांच्या संख्येएवढेच रुग्ण साधारणपणे बरे होत असल्यामुळे
खाटांच्या उपलब्धतेची अडचण येत नसल्याची माहिती मंत्र्यांनी दिली. राज्यात पाच लाखांहून
अधिक रुग्ण या संसर्गावर उपचार घेऊन बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली
आहे. या पार्श्र्वभूमीवर या क्षेत्रात आघाडीवर राहुन कार्यरत असलेले आरोग्य क्षेत्रातले
कर्मचारी प्रशंसेला पात्र असल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे.
****
देशात
कोरोना विषाणू संसर्गामुळे होणाऱ्या मृत्युंचा दर एक पूर्णांक ७९ शतांश टक्के पर्यंत
कमी झाला असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७६ पूर्णांक ६१ शतांश टक्के पर्यंत वाढलं
आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. कालपर्यंत या विषाणू संसर्गासाठी
चार कोटी १४ लाख ६१ हजार ६३६ नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या असून यातल्या दहा
लाख ५५ हजार २७ चाचण्या काल करण्यात आल्या आहेत.
****
नाशिक जिल्ह्यात सध्या ६ हजार ४८६ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.आतापर्यंत २७ हजार
९७८ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ८५६
रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
****
चंद्रपूर जिल्हा कारागृहातल्या एका कर्मचाऱ्यासह ७१ बंदींना
कोरोना विषाणुची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. दोन दिवसांपूर्वी एका कैद्याच्या पायाची शस्त्रक्रिया
करण्यासाठी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शस्त्रक्रिये आधी या कैद्याची तपासणी केली असता, त्याला
याचा संसर्ग झाल्याचं आढळलं होतं. त्यामुळे अन्य कैदी आणि कर्मचाऱ्यांची तपासणी
करण्यात आल्याची माहिती तुरुंग अधिक्षकांनी दिली आहे.
****
बृहन्मुंबई महापालिकेनं नामवंत गायिका लता मंगेशकर
रहात असलेली इमारत `प्रभू कुंज` कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर खबरदारीचा
उपाय म्हणून प्रतिबंधित केली आहे. दक्षिण मुंबईतल्या पेडर मार्गावरल्या या इमारतीमधे
अनेक ज्येष्ठ नागरिक रहात असल्यानं ही काळजी घेण्यात आली असल्याचं मंगेशकर कुटुंबानं
एका निवेदनाद्वारे नमुद केलं आहे. सामाजिक अंतराचं समर्थन आणि याला सहकार्यासाठी यंदाचा
गणेशोत्सवही कुटुंबानं साधेपणानं साजरा केला. तसंच आपण सर्व काळजी घेत असून कुटुंब
सुरक्षित असल्याचं मंगेशकरांनी म्हटलं आहे.
****
बेळगाव जिल्ह्यात मराठी भाषिकांवर झालेल्या लाठी
हल्ल्याचा राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी निषेध केला असून या प्रकरणी
कारवाईची मागणी केली आहे. पीरनवाडी गावामधे गेल्या २८ तारखेला शिवाजी महाराजांच्या
नियोजित पुतळ्यासमोरच स्वातंत्र्य सैनिक संगोल्ली रायन्ना यांच्या पुतळ्याला उभारण्यावरून
निर्माण परिस्थीती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला होता. महाराष्ट्र-
कर्नाटक सीमा वादासंदर्भातले समन्वयक मंत्री असलेल्या शिंदे यांनी या प्रकरणी कर्नाटकचे
मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली असून मराठी
भाषिक आणि कन्नड भाषिकांमधे अकारण वाद निर्माण केला जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
वैद्यकीय प्रवेशाचं ७०- ३० हे प्रमाण त्वरीत रद्द
करावं अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री
अमित देशमुख यांच्याकडे केली आहे. यामुळे मराठवाडा आणि विदर्भातल्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर मोठ्या
प्रमाणात अन्याय होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
महाविद्यालयांची संख्या आणि विद्यार्थी प्रवेश क्षमता यांचा विचार केला तर
मराठवाड्याच्या वाट्याला कमी जागा येत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. यावर
लवकरच बैठक आयोजित करून हा प्रश्न मार्गी लावला जाईल, अशी
ग्वाही देमशुख यांनी दिली असल्याचंही आमदार चव्हाण यांनी कळवलं आहे.
****
जालना नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या १६
कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमीजून आज पालकमंत्री राजेश टोपे यांच्या
हस्ते झालं. मस्तगड इथं झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल
यांची प्रमुख उपस्थिती होती. जालना शहराच्या विकासाठी आपण कटीबध्द असून, शहरातली सर्व विकास कामं दर्जेदार व्हावीत, अशी
अपेक्षा टोपे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केली.
****
हजरत इमाम हुसैन यांचा बलिदान दिवस
मुहर्रम आज सर्वत्र शांततेत आणि श्रद्धेनं साजरा होत आहे. कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर
देशभर मोजक्याच ठिकाणी ताजिया मिरवणूक काढायला न्यायालयानं परवानगी दिली आहे. हजरत इमाम हुसैन यांचं सत्यासाठी
आणि समानतेसाठी दिलेलं बलिदान सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुहर्रमनिमित्त
संदेशात म्हटलं आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातल्या कोकलगाव
इथं मोहरम सणानिमित्त सवारी काढणाऱ्या २० जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्वांनी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुहर्रम सण साजरा करण्याच्या प्रशासनानं
दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन न करता नियमांचं उल्लंघन केलं असल्यामुळे गुन्हा
दाखल करण्यात आला. दरम्यान, कोकलगावमधे कोरोना विषाणू संसर्गाचे सहा रुग्ण आढळून आले
आहेत.
****
बृहन्मुंबईमधील
कोरोना विषाणुच्या नव्या रुग्णांच्या संख्येत गेल्या महिनाभरामधे चार हजारांवरून नऊ
हजारांपर्यंत वाढ झाल्याची माहिती महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांनी दिली आहे. एक
दिवस नव्या रुग्णांची संख्या बारा हजारांपर्यंत पोहचली होती तर काल नऊ हजार ९८४ नवे
रुग्ण आढळल्याचंही आयुक्त चहल यांनी म्हटलं आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यामधल्या दुर्गम भागातल्या
७७७ कोटी रुपये किंमतीच्या पूल आणि रस्ते कामांना आज
प्रारंभ झाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री एकनाथ
शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून
ही कामं सुरू करण्यात आली. ****
वाशिम जिल्ह्यात अनेक विद्यार्थ्यांना इंटरनेट अभावी ऑनलाईन
शिक्षण घेण्यात अडचन येत असल्यानं शिक्षण विभागानं
एका वेळी
दहा विद्यार्थ्यांना शाळा, अथवा गावातलं समाज मंदिर किंवा मोकळ्या जागेत वर्ग घ्यायला परवानगी दिली आहे. संबंधित शिक्षकानं
सामाजिक अंतर राखण्याच्या सर्व नियमांचं पालन करत शिकवावं, असं या विभागानं सूचित केलं आहे.
****
रायगड
जिल्ह्यातल्या महाड इथल्या इमारत दुर्घटनेतला दुसरा आरोपी युनूस शेख याला काल अटक करण्यात
आली. त्याला माणगावच्या न्यायालयात हजर करण्यात आलं असता, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली
आहे. या प्रकरणातले तीन आरोपी अद्याप
पोलिसांच्या हाती लागले नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सातारा जिल्ह्यातल्या कराड
इथं कोरोना विषाणुचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन शहरातल्या व्यापाऱ्यांनी
१ ते ८ सप्टेंबर दरम्यान उत्स्फुर्त बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. बंदमधून अत्यावश्यक सेवांना
वगळण्यात आलं असल्याची माहिती व्यापारी संघटनेनं दिली आहे.
No comments:
Post a Comment