Tuesday, 25 August 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 August 2020 Time 18.00 to 18.10 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 August 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ ऑगस्ट २०२० सायंकाळी ६.००

****

** येत्या सात आणि आठ सप्टेंबरला विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन

** प्रवासी तसंच मालवाहतुकीला गती दिल्याने अर्थव्यवस्था लवकरच पूर्ववत होईल - केंद्रीय अर्थमंत्र्यांना विश्वास 

** औरंगाबाद जिल्ह्यात दोन कोविडग्रस्तांचा मृत्यू; बाधितांची संख्या २१ हजार १७१

आणि

** महाड इमारत दुर्घटनेत आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू; मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी चार लाख मदत जाहीर

****

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या सात आणि आठ सप्टेंबरला मुंबईत होणार आहे. दोन दिवसांचं हे अधिवेशन विधानसभेच्या सभागृहात भरवण्याचा निर्णय आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरणाऱ्या या अधिवेशनात अतारांकित प्रश्न, पुरवणी मागण्या, विनियोजन विधेयके असं कामकाज होणार आहे. या दोन दिवसीय अधिवेशनापुर्वी सहा सप्टेंबरला सर्व सदस्यांची अँटीजन चाचणी केली जाणार आहे. ज्या सदस्यांना काही आजार असतील त्यांना त्यांच्या पक्षांच्या गट नेत्यांकडून काळजी घेण्याची सूचना दिली जाणार आहे. या अधिवेशनात मुख्य आसन व्यवस्थेसह प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीही शारीरिक अंतराचं नियम पाळून सर्व सदस्यांची आसन व्यवस्था तयार केली जाणार आहे. प्रत्येक सदस्यांना कोरोनापासून सुरक्षितता म्हणून सुरक्षा किट देण्यात येणार आहे.

****

फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएनं आरोपपत्र दाखल केलं आहे. यामध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर, त्याचे नातलग अम्मर अली, आणि अब्दुल रऊफ या तिघांसह १९ जणांविरोधात दोषारोप ठेवण्यात आले आहेत. यापैकी सात दहशतवादी आतापर्यंतच्या विविध कारवायांमध्ये मारले गेले आहेत, सात जणांना अटक करण्यात आली आहे, तर दोघे अद्याप फरार आहेत. फेब्रुवारी २०१९ मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल - सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या या आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० पोलीस हुतात्मा झाले होते.

****

लोक प्रशासन क्षेत्रात उत्कृष्ट कामकाजासाठी येत्या ३१ ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिनी, पंतप्रधान पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. जिल्हास्तरावर विविध क्षेत्रात प्रभावीपणे काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेचा परिघ वाढवण्यात आला असल्याचं, कार्मिक मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत लोकचळवळीला प्रोत्साहन देणाऱ्या तसंच प्राधान्य क्षेत्राला समावेशक कर्जपुरवठ्याची योग्य अंमलबजावणी करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनाही यावेळी पुरस्कार दिला जाणार आहे.

****

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत काहीही सुधारणा नसल्याचं, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या सैन्य रुग्णालयातल्या डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे. मेंदूत रक्ताची गुठळी झाल्यानं, मुखर्जी यांच्यावर गेल्या दहा ऑगस्टला शस्त्रक्रिया झाली होती, तेव्हापासून मुखर्जी कोमात असून, त्यांना कृत्रीम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आलं आहे. मुखर्जी यांना कोविडचा संसर्गही झालेला आहे.

****

देशभरात प्रवासी तसंच मालवाहतुकीला गती देण्याचा सरकारचा प्रयत्न असून, यामुळे अर्थव्यवस्था लवकरच पूर्ववत होईल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे. भारतीय उद्योग महासंघ - सीआयआयच्या वतीनं घेण्यात आलेल्या उद्योजकांच्या बैठकीत त्या दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होत्या. कोविड 19च्या प्रतिबंधासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांमध्ये पायाभूत सुविधांच्या सुधारणांचा समावेश असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. या उपाययोजनांमुळे उद्योग क्षेत्र मंदीच्या लाटेतून लवकरच बाहेर पडेल, असं अर्थमंत्र्यांनी नमूद केलं.

****

देशात कोविड -१९ च्या संक्रमणातून बरे होण्याचा दर ७६ टक्के झाला आहे. आतापर्यंत जवळपास २ लाख लोक या संक्रमणातून बरे झाले आहेत. मृत्यू दरातही घट झाली असून तो एक पूर्णांक ८४ शतांश टक्यांवर आला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासात देशात ६६ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर नवीन हजार रुग्ण आढळले. या सोबतच देशात आता या विषाणूनं संक्रमित लोकांची एकूण संख्या ३१ लाख ६७ हजार ३५४ झाली आहे. तर आतापर्यंत ५ हजार ३९० जणांचा मृत्यू झाला आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज दोन कोविड बाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये औरंगाबाद शहरातल्या गांधी नगर इथला ४० वर्षीय पुरुष आणि जवाहर कॉलनीतल्या ७५ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात या संसर्गामुळे मृतांची एकूण संख्या ६४० झाली आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी नवीन १०० कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात ग्रामीण भागातल्या ३९ आणि महानगरपालिका हद्दीतल्या ६१ रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आता कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या २१ हजार १७१ झाली आहे. त्यापैकी सोळा हजार १५३ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. तर सध्या चार हजार ३७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

रायगड जिल्ह्यात महाडमधील काजळीपुरा भागात कोसळलेल्या पाच मजली इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या आता ११ झाली आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडून बचाव कार्य सुरू आहे. दरम्यान, बचाव कार्य करत असतांना आपत्ती दलानं तब्बल १९ तास ढिगाऱ्याखाली दबलेल्या एका पाच वर्षाच्या मुलाला सुखरुप बाहेर काढलं. आणखी आठ जण या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती वर्तवली जात आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना प्रत्येकी चार लाखांची मदत देण्याची घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या पाच जणांविरोधात महाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, बिल्डर फारूक काझी आणि युनूस शेख हे दोघे फरार आहेत.

****

कृषी उत्पन्न बाजार समितीवरील उपकर आणि देखरेख खर्च कमी करावा, याबाबत कायदे सुटसुटीत करावेत आदी  मागण्यांसाठी आज राज्यभरातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. या एकदिवसीय लाक्षणिक बंदमधून भाजी-पाला, फळं आणि कांद्याच्या बाजारपेठा वगळण्यात आल्या होत्या. नवी मुंबईतल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातल्या पाचपैकी धान्य आणि मसाला बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा इथं एक गाव एक गणपती हा पर्यावरणपूरक सोहळा मोठ्या उत्साहात राबवला जात आहे. कुरुंदा नजीकच्या मातृतीर्थ टोकाई गडावर मागील चार वर्षापासून वृक्ष लागवडीचे काम सुरू आहे. याच गडावर पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली असून, सरपणाच्या लाकडांपासून ही गणेशमूर्ती साकारली आहे. विशेष म्हणजे या मूर्तीला फुल प्रसादाऐवजी झाडांची रोपटी वाहण्यात येतात. गेल्या दोन दिवसात भाविकांकडून शंभरापेक्षा अधिक झाडांची रोपं जमली असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

****

्येष्ठा गौरी अर्थात महालक्ष्मी पूजनाच्या सणाला आजपासून प्रारंभ होत आहे. आज दुपारनंतर घरोघरी ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं आगमन होऊन, सायंकाळच्या सुमारास प्रतिष्ठापना केली जात आहे. उद्या ौरी पूजनाच्या पार्श्वभूमीवर आज बाजारात हार फुलं भाज्या तसंच विविध पूजा साहित्य खरेदीसाठी महिलांची वर्दळ दिसत आहे. नागरिकांनी कोविड प्रतिबंधाच्या सर्व नियमांचं पालन करून, उत्सव साजरे करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

****

परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे महालक्ष्मीचा सण घरोघरी साध्या पध्दतीने साजरा होत आहे. हार-फुलांसह भाज्यांच्या वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्यांना आर्थिक अडचण निर्माण होत आहे. दरम्यान, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नियम आणि अटींचं पालन करून खरेदीला परवाणगी दिली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजित इमारतीचं भूमिपूजन आज करण्यात आलं. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची एकूण रुग्ण ७ हजाराच्या वर गेली आहे. आतापर्यंत २१५ रुग्णांचा या संसर्गामुळं मृत्यू झाला असून एकूण ५ हजार १८९ रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची उद्या आढावा बैठक घेणार आहे.

****

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांच्या रॅपिड अँटीजन चाचण्या करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिल्या आहेत. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यापाऱ्यांच्या अँटिजन चाचण्या कराव्यात अशी सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना केली होती.

****

व्हिडिओकॉन उद्योग समूहातल्या कामगारांच्या मागण्यांसाठी कर्मचारी संघटनेनं पुकारलेल्या साखळी उपोषणाला आज एक वर्ष पूर्ण झालं. मात्र कामगारांच्या मागण्या अद्यापही मान्य झालेल्या नाहीत. या कामगारांनी आज औरंगाबाद शहरातल्या अनेक चौकात हातात फलक घेऊन याचा निषेध केला. दरम्यान, संघटनेच्या नेत्यांनी आज दुपारी मुंबईत यासंदर्भात कामगार राज्य मंत्री बच्चु कडू यांची भेट घेऊन त्यांना याबाबतच्या मागण्यांचं निवेदन सादर केलं.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments: